आज ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी डे’ आहे. ‘आयपीआर’ म्हणजे आपल्या बुद्धीमधून निर्माण केलेल्या कोणतीही एखादी कलात्मकता किंवा एखादी नवीन गोष्टींची नोंदणी. आजची पिढी आधुनिक असून अनेक शासकीय योजनांच्या मार्गावर काम करत आहे. आपल्या देशात ‘मेक इन इंडिया’ यांसारखे अनेक प्रकल्प राबवले जात आहेत.
मग अशा काळात ज्याने ‘इन्व्हेंशन’ किंवा ’डिस्कव्हरी’ केली आहे, त्याला त्याचे संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. तसेच अनेक उद्योजक आपल्या ब्रॅण्ड मागे अथक परिश्रम घेतात, पैसा गुंतवतात. अशा वेळी जेव्हा ब्रॅण्ड लोकप्रिय होऊ लागतो, तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी लगेच त्याचे ‘लोगो’ किंवा ‘ब्रॅण्डनेम’ कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. असे होऊ नये म्हणून ‘ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन’ अनिवार्य ठरते.
‘ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन’ हे दहा वर्षांसाठी असते. तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट जर का ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जसे की, ‘अॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’सारख्या माध्यमातून विकायचे झाले असल्यास किंवा त्यावर अपलोड करायचे असतील, तर आजकाल ‘ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन’ हे अनिवार्य झालेले आहे. ‘ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन’ हे इतर व्यावसायिक लायसन्सप्रमाणे महत्त्वाचे लायसन्स आहे. जसे आपण आपल्या फ्लॅटचे किंवा प्लॉटचे व्हॅल्युएशन करतो, तसेच ‘ट्रेडमार्क’चेही करता येते. फायलिंग आणि रजिस्ट्रेशन यामध्ये खूप तफावत आहे.
आपण पैसे फायलिंगसाठी भरले म्हणजे रजिस्ट्रेशन झाले असे नाही. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ब्रॅण्ड हा ‘ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन’साठी उपलब्ध आहे की नाही, हे पाहायला हवे. त्यासाठी तुम्हाला ‘पब्लिक सर्च ऑप्शन’मध्ये जाऊन तुमचा ‘ब्रॅण्डनेम’ आणि तुमच्या ‘लाईन ऑफ बिझनेस’चा क्लास अपलोड केला की, तुम्हाला सर्च रिपोर्ट मिळतो. हा रिपोर्ट क्लियर आला म्हणजे तुम्ही ‘ट्रेडमार्क’साठी फायलिंग करू शकता आणि तुम्हाला ऑब्जेक्शन किंवा हेअरिंग्स अशा पातळ्या लागण्याची शक्यता कमी असते.
‘आमची शाखा कुठेही नाही’ या बाळबोध कल्पनेला फुली मारून आता तुम्ही जागतिक पातळीवर स्पर्धा करत आहात. जिथे तुमच्या एका क्लिकवर अनेक गोष्टी तुम्ही अपलोड करू शकता. आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही तुमच्या वस्तू विकू शकता. मग अशा काळात आमची शाखा कुठेही नाही, या संकल्पनेला बाजूला करण्याची गरज आहे. तुम्हाला जर फ्रँचाईजी मॉड्यूल हे रुजू करायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या ब्रॅण्डच्या ‘ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन’ करुन घेणे अत्यावश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला ‘रॉयल्टी’ मिळू शकत नाही. नोंदणीची हा प्रक्रिया अगदी सोपी आहे.
त्यामुळे ‘ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन’ हे अत्यावश्यक व्यावसायिक क्षेत्राच्या लोकांसाठी झालेले आहे. शेवटी ‘जो दिखता है वो बिकता है’ जो ब्रॅण्ड मार्केटमध्ये लोकप्रिय आहे, सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, त्याची कॉपी होण्याची शक्यता जास्त आहे. आजकाल डिजिटल मीडिया, सोशल नेटवर्किंग, सोशल प्लॅटफॉर्ममुळे तुमचा ब्रॅण्ड अनेकांपर्यंत एका क्लिकवर पोहोचतो. त्यामुळे तुमचे प्रतिस्पर्धक अगदी क्षणाक्षणात जन्माला येत असतात. त्यामुळे ‘ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन’ करणे हे प्रत्येक उद्योजकासाठी गरजेचे आहे.
- अॅड. मनाली चिटणीस