संजय राठोड शक्तीप्रदर्शन करून कुणावर दबाव आणताहेत ?
मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव बंजारा समाजातील पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आल्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूने विरोधकांनी टीका सुरू केली आहे. पूजाच्या मृत्यूची आता सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पूजा प्रकरणात अद्याप १३ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरही कारवाई झालेली नाही. यामुळे आता या प्रकरणी निःपक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार लाड यांनी केली आहे.
लाड म्हणाले, "बीडच्या पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी संशयित असलेले मंत्री संजय राठोड हे आज प्रसिद्धीमाध्यमांपुढे बोलत असताना चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे वारंवार सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, असे ते सांगत होते. मात्र, त्यांनी आज ज्या प्रकारे शक्तिप्रदर्शन करून पोहरा देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे निःपक्ष चौकशी होईल का, याबद्दल साशंकता आहे. म्हणून सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मी करत आहे."
सीबीआय चौकशी शक्य आहे का ?
सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत असताना तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यावेळी बिहार पोलीसांकडे सुशांतच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे बिहार पोलीसांनी सांगितले होते. यावेळी मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस व सीबीआय, असा सामना सुरू होता. पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार का हा देखील प्रश्न आहे.