
बीड - कोरोना संक्रमणाची तिसरी लाट घोंगावत असतानाच महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेला भोंगळ कारभार समोर आला आहे. कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांना राज्य सरकारकडून ५०,००० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. अशातच कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या यादीतून दोन जीवित व्यक्तींची नावे समोर आली आहेत. या कृत्यास निष्काळजीपणा म्हणावा की घोटाळा. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मृतांच्या यादीत सामान्य व्यक्तीबरोबरच एका सामाजिक कार्यकर्त्याचे देखील यात नाव असल्याचे अंबेजोगाई नगर परिषदेचे तहसिलदार विपिन पाटील यांनी सांगितले. हे दोघेही जिवंत असून त्यांची नावे यादीत कशी आली; यासंदर्भात चौकशी सुरू आहे. जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे महसूल विभागाने मृतांची यादी तयार केल्याचे तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले.
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या मृत व्यक्तींच्या यादीत एकूण ५३२ जणांची नावे आहेत. कोरोना बाधितांची यादी बनवण्याचे काम सुरू असून उर्वरित यादी पडताळणीसाठी नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीकडे पाठवण्यात आली आहे. त्यातील चूका सुधारल्यानंतर अंतिम यादी तयार होईल असे विपिन पाटील यांनी सांगितले.