सुखना नदीला मोठा पूर
औरंगाबाद: गुलाब चक्रीवादळाच्या तडाख्यांनांतरही औरंगाबादेत पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी मध्यरात्री शहरात पहाटे ढगफुटी सदृश्य पावसाने पुन्हा एकदा औरंगाबादला झोडपले आहे. त्यामुळे सुखना नदीला मोठा पूर आला असून गावांत पाणी शिरले आहे.
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे औरंगाबादला मुसळधार पावसाने झोपडले आहे. मुसळधार सतत कोसळत असलेल्या पावसामुळे नदी- नाले दुधडी भरुन वाहत आहेत. तर, जायकवाडीसह अन्य धरणदेखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत. अनेक भागात नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याना नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र शहरात शनिवारी पहाटे पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे तीन- चारच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह शहरात मुसळधार पाऊस कोसळला. अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसाने संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत.
मुसळधार पावसामुळे महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नूर कॉलनी परिसर येथे आणीबाणी सारखी परिस्थती निर्माण झाली होती. नाल्याला पूर आल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.घरांमध्ये चार - पाच फूट पाणी साचले होते त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. या मुसळधार पावसाने सुखना नदीने रुद्ररूप धारण केले आहे. सईनगर मधील अनेक घराची पडझड होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहिल्यामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. शहरातील नारेगाव आणि पिसादेवी परिसरात पावसाचे पाणी घुसले. यामुळे दुकानांचे मोठे नुकसान झाले. रात्रीतून अचानक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने येथील वस्तू आणि मालाचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी गावात आणि रस्त्यावर साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यमार्ग बंद पडला होता. सोयगाव तालुक्यातील तिडका नदीला आलेल्या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यामर्ग बंद पडला. त्यामुळे औरंगाबाद जळगाव या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला. सध्या नदीच्या काठावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.