शब्दांचा जादूगार...

    30-Jan-2021
Total Views |

Jagdish khebudkar_1 
 
 
देवघरात म्हणायची गाणी आणि लावणी, या दोन्हीही गोष्टी एकाचवेळी तेवढ्याच ताकदीने ज्यांची प्रतिभा पेलू शकते, अशा मोजक्या प्रतिभावंतांपैकी एक म्हणजेच प्रसिद्ध गीतकार, कवी जगदीश खेबुडकर...
 
पेशाने शिक्षक असलेले आणि पाहताक्षणी किरकोळ वाटणारे, हे तसे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. सर्वांच्याच लक्षात राहावी, अशी मराठी साहित्याची सेवा त्यांच्या हातून झाली आहे. त्यामानाने त्यांचे ‘वजन’ वाढावे असे काही भारदस्त, त्यांच्या पदरात पडलेले नाही. अर्थात, त्याबद्दल त्यांची तक्रारही कधीच नव्हती. “माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी संपत्ती,” असे ते प्रथमपासूनच म्हणत आले असून, त्या अर्थाने कधीही न संपणारी संपत्ती त्यांनी खजिन्यात जमा करून ठेवली आहे. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगम यांच्यापर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. त्यांचे गाणे लावल्याशिवाय आजही आकाशवाणीचा दिवस संपत नाही. साडेतीन हजारांच्यावर कविता, अडीच हजार चित्रगीते, २५ पटकथा- संवाद, ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका, चार टेलिफिल्म, पाच मालिकागीते त्यांच्या नावावर जमा आहेत. एवढी साहित्यसंपदा नावावर असणारा हा भारदस्त माणूस ‘मृत्युंजय’ पुरस्काराने सन्मानित झाला आहे. अगदी बालगीत ते प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, देशभक्तिपर गीते, गणगौळण, गौरीगीते, वासुदेव गीत, माकडवाला, कोळीगीते, सवाल-जवाब, एकतारी भजन, डोंबाऱ्याचे गीत, कुडबुडा जोशी गीत, वारकरी भजनापर्यंत असा एकही गीताचा प्रकार शिल्लक न ठेवता विपुल अशी रसिकमान्य गाणी लिहिणारे प्रसिद्ध गीतकार म्हणजेच जगदीश खेबुडकर...
 
 
जगदीश गोविंद खेबुडकर यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १० मे, १९३२ रोजी करवीर तालुक्यातील हळदी गावात सामान्य कुटुंबात झाला (नंतर खेबवडे गावी सुरुवातीचे आयुष्य). वडील इंग्रजी राजवटीत १५ रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचे बाळकडू घरीच मिळाले. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्याने १२ बलुतेदारांची लोकप्रिय गीते ऐकल्याने ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतांतून अजरामर केले. अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेमगीतांपासून बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणाऱ्या मोजक्याच गीतकारांमधील एक म्हणजे जगदीश खेबुडकर होय. वयाच्या १६व्या वर्षी १९४८ मध्ये महात्मा गांधी यांचा खून झाल्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलीत खेबुडकर यांचे घरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आपले जळते घर पाहताना ‘मानवते तू विधवा झालीस’ ही पहिली कविता त्यांनी केली. येथून त्यांच्या काव्यप्रवासाला प्रारंभ झाला. कविवर्य जगदीश खेबुडकर हे कोल्हापूरजवळच्या खेबवडे या गावाचे. गावी थोडीफार शेती व गाईगुरे अशा वातावरणात ते वाढले. खेबुडकर १९५३ मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन एका औषधाच्या कंपनीत नोकरी करू लागले. १९५६ मध्ये एस.टी.सी. होऊन ते शिक्षक झाले. पुढे आयुष्यभर त्यांनी शिक्षकाचीच नोकरी केली. त्यादरम्यान कविता लिहिणे चालूच होते. सांगली आकाशवाणीसाठी त्यांनी काही गाणी लिहिली. संगीतकार वसंत पवार यांनी त्यांची काही गाणी स्वरबद्ध केली. ती गाणी चित्रपटासाठी नव्हती.
 
गाण्यावर अदाकारी करून पोट भरणाऱ्या कोल्हापूरच्या गरीब कलावंतिणींना ही गाणी पवारांनी फुकट देऊन टाकली होती. पण, वसंत पवारांनीच त्यांना चित्रपटासाठी गाणी लिहायची पहिली संधी लवकरच दिली. १९६२ मध्ये निघालेल्या ‘रंगल्या रात्री अशा’ या संगीतप्रधान चित्रपटासाठी पवारांनी खेबुडकरांकडून प्रथमच तीन लावण्या लिहून घेतल्या. वसंत पवारांचे बोट धरून खेबुडकर चित्रपटसृष्टीत आले खरे. पण, त्यांचे खरे सूर जमले ते पवारांचे शिष्य संगीतकार राम कदम यांच्याशीच! ‘नका सोडून जाऊ रंगमहाल’ अशा ओळी लिहिणाऱ्या खेबुडकरांनी अष्टविनायक दर्शन घडविणारे पाच मिनिटांचे ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, हे गाणेही लिहिले. भालजींच्या ‘साधी माणसं’ चित्रपटासाठी ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गीत लिहिणारे नाना हे दादा कोंडकेंच्या चित्रपटासाठी ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला’, असे गीतही लीलया लिहून गेले. चित्रपटातील प्रसंग उभा केला की, त्यांच्या डोक्यात गाणं आपोआप भिनायचं. एवढा मोठा गीतकार. पण, साधा माणूस होता याचे सर्वांनाच अप्रूप होते आणि तोच माझा सर्वात मोठा सन्मान असल्याचेही खेबुडकर अभिमानाने सांगत. १९६० साली त्यांचे पहिले चित्रगीत प्रेक्षकांसमोर आले. विशेष म्हणजे, ती लावणी होती... ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’! आजही ती रसिकांच्या ओठांवर असते. संगीतकार राम कदम व गीतकार खेबुडकर यांच्या ‘शब्दसुरां’च्या मिलाफाने मराठी रसिकांना जवळजवळ दोन दशके मनमुराद आनंद दिला. या काळातील बहुतेक मराठी चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीचे असल्यामुळे त्यातील गाणी ही अस्सल मराठमोळी-ग्रामीण समाजजीवनाची, सणांची, चालीरीतींची, रूढी-परंपरांची अशी होती. त्यात गणगौळण, सवालजवाब, झगडे, भूपाळी, भारूड, विराणी, वासुदेव, कीर्तन, नागोबाची-हादग्याची, मंगळागौरीची-हळदीची-लग्नाची गाणी, मोटेवरची गाणी, कोळीगीते, धनगराची गाणी, डोंबाऱ्याची गाणी, लेझीम, शेतकरी गीत असे अस्सल मराठी मातीचे असंख्य गीतप्रकार होते. खेबुडकरांनी हे सारे गीतप्रकार अतिशय समर्थपणे शब्दबद्ध केले.
 
‘तमाशा’ हा मराठी मातीचा वारसा. तो जपण्यासाठी खेबुडकरांनी अथकपणे असंख्य लावण्या लिहिल्या. ग. दि. माडगुळकरांनंतर तेवढ्याच समर्थपणे आणि ताकदीने खेबुडकरांनी लावण्या लिहिल्या. माडगुळकरांप्रमाणेच त्यांनीही लावणी लिहिताना लेखणीचा आब व तोल साधला. अभिजाततेचा व कलात्मकतेचा स्पर्श असलेल्या लावण्या खेबुडकरांनी लिहिल्या. आयुष्यात तमाशा कधीही न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक फर्मास व फाकडू लावण्या लिहिल्या, ही वैशिष्ट्यपूर्ण देणगी त्यांना लाभली होती. गदिमा, सुधीर फडके व राजा परांजपे या त्रिकुटाप्रमाणेच राम कदम, अनंत माने व जगदीश खेबुडकर हे त्रिकूटही मराठी चित्रपटसृष्टीत गौरवास्पद ठरले.
 
शांतारामबापू, भालजी यांच्यापासून अगदी लहान-सहान निर्मात्यापर्यंत अनेक चित्रपटांची गाणी त्यांनी कुशलपणे लिहिली. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी ६० वर्षे अव्याहतपणे ३५० चित्रपटांसाठी सुमारे २ हजार ७५० गाणी लिहिली. ६० हून अधिक संगीतकारांसाठी गाणी लिहिणारे ते एकमेव गीतकार होते. व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ची गाणी सर्वाधिक गाजली. अनेक चित्रपटांचे कथा-पटकथा-संवाद त्यांनी लिहिले होते, तर ‘देवघर’ नावाच्या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. गेल्या तीन पिढ्यांचे ते लोकप्रिय गीतकार होते. ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘आम्ही जातो अमुच्या गावा’, ‘गणगौळण’, ‘भोळीभाबडी’, ‘सुगंधी कट्टा’, ‘बायकांनो नवरे सांभाळा’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ आणि ‘झेड. पी.’ या सर्व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे उत्कृष्ट गीतलेखनाचे पुरस्कार लाभले होते. राज्य शासनातर्फे दिला जाणारा ‘व्ही.शांताराम पुरस्कार’, ‘गदिमा पुरस्कार’, ‘पी. सावळाराम पुरस्कार’ व ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ या अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले होते.
 
कविवर्य खेबुडकर यांना राज्य शासनाचे ११, ‘रसरंग फाळके’, चित्रपट महामंडळाचे दोन, ‘गदिमा जीवनगौरव’, ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’, ‘कोल्हापूरभूषण’, ‘मृत्युंजय’, ‘सूरसिंगार संसद’, ‘पुणे फेस्टिव्हल’, ‘छत्रपती शाहू पुरस्कार’, ‘करवीरभूषण’, ‘साहित्य पुरस्कार’, ‘मार्मिक गौरवचिन्ह’, ‘लावणीरत्न’, ‘नटराज’, केंद्र शासन, ‘कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार’, ‘यशवंतराव चव्हाण साहित्यगौरव’ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १९६३ साली, भालजी पेंढारकर निर्मित ‘साधी माणसं’ या सिनेमात खेबुडकरांना एक गाणं लिहायची संधी मिळाली. भालजी म्हणाले, “लोहारकाम करणाऱ्या एका जोडप्यावर आधारलेली ही कथा. हे लोहार जमातीचं जोडपं कसं राहतं, काय खातं, काय पितं, नवऱ्याबद्दल तिला काय वाटतं आणि त्या लोहार जमातीचा देव कोणता आणि त्याला फुलं कोणती वाहतात, आपल्या धंद्याचा त्यांना अभिमान कसा वाटतो, गरिबीतसुद्धा ते आनंदानं कसे राहतात, हे सगळं वर्णन गाण्यात आलं पाहिजे; आणि जगदीश मुद्दाम सांगतोय, लोहार होणार आहे सूर्यकांत. त्याची बायको लोहारीण आहे जयश्री गडकर. नवऱ्याबद्दल तिच्या भावना ती कशा शब्दांत प्रकट करते, हे सगळं या गाण्यात आलं पाहिजे आणि हे ‘थीम साँग’ म्हणून वर्षानुवर्षं गाजलं पाहिजे. केव्हा आणून देशील?” भालजींनी सारांश सांगून संपवला. यावर खेबुडकर म्हणाले, “बाबा, तुम्ही सांगत असतानाच डोक्यात ओळी तयार झालेल्या आहेत. मी मोकळाच आलोय. मला एक कागद आणि पेन द्या.” त्यांनी नोकराला कागद आणि पेन द्यायला सांगितले. ते गाणे होते, ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुजी आम्हांवरी राहु दे’ हे गाणेही तुफान गाजले आणि चित्रपट-गीतलेखनात प्रस्थापित अशा ग. दि. माडगुळकर, पी. सावळाराम आणि शांता शेळके यांच्या पंक्तीत जगदीश खेबुडकर जाऊन बसले. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटासाठी लिहिलेली त्यांची सगळीच गाणी गाजली; पण ‘देहाची तिजोरी’ने ते थेट प्रत्येकाच्या देवघरात पोहोचले.
 
खेबुडकरांना सिनेमासृष्टीत सगळे जण ‘नाना’ म्हणत. नाना हे सिद्धहस्त कवी आणि गीतकार तर होतेच. खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे ‘पिंजरा’ चित्रपटातील गाणी होय. व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटासाठी खेबुडकरांनी तब्बल ११० गाणी लिहिली. त्यातली ११ गाणी निवडण्यात आली. याच चित्रपटातील ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल’ या लावणीविषयी सांगताना खेबुडकर म्हणतात, “त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून ४९ लावण्या लिहून घेतल्या. त्यातील एकही न आवडल्याने मी निराश होऊन घरी परतलो. झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार घोळत होते आणि रात्री २ वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’. लगेच फोन करून मी ती बापूंना ऐकवली. ‘व्वा! झक्कास, खेबुडकरजी, गाणं खास जमलं बरं का’ अशा शब्दात बापूंनी मला शाबासकी दिली. अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.” ११ लोकप्रिय गीते असलेला पिंजरा त्यांचा शंभरावा चित्रपट. येथून पुढेही त्यांच्या चित्रपटांचा ओघ चालूच राहिला. ‘माहेरची साडी’ चित्रपटाने यशाचे शिखर गाठले. त्यातील सर्वच गाणी गाजली. विशेषत: ‘सासरला ही बहीण निघाली’ या गाण्याने तर रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला.
 
 
अनेक कलाकृतींवर जगदीश खेबुडकरांचा अस्सल गावरान ठसा उमटला. अजय-अतुलनं संगीतबद्ध केलेलं ‘मोरया, मोरया’ या गणेशस्तुतीने तमाम आबालवृद्धांना वेडे केले. त्यांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते. मात्र, त्यांनी पान व विडा यांच्याशी संबंधित २००हून अधिक गाणी लिहिली. तसेच अष्टविनायकाची एकदाही वारी न करता ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे खास गणेशभक्तांसाठी दिलेले अप्रतिम गाणे म्हणजे खेबुडकरांचा अजब महिमाच होय. खेबुडकरांच्या लावणीच्या तालावर मराठी चित्रपटसृष्टी अक्षरश: नाचली. ३ मे, २०११ रोजी या थोर कवीची प्राणज्योत मावळली. अशा अफाट व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा....
 
 
- आशिष निनगुरकर