आज, दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचा हा दिवस भारतभरात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. कारण, स्वामीजींचे विचार हे तरुणांच्या सळसळत्या रक्तात राष्ट्रनिर्माणाचे, सकारात्कतेचे स्फुल्लिंग चेतवणारे होते. तेव्हा, आज स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने त्यांचे विचारचिंतन करुया आणि त्याला कृतिशीलतेची जोड देऊया...
हिंदू धर्माचीच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या उत्कर्षासाठी विश्वबंधुत्वाची, विश्वधर्माची शिकवण देणार्या भारतीय मानवधर्माची महती आपल्या जाज्वल्य विचारातून साता समुद्रापार पोहोचविणार्या स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी मकरसंक्रांतीच्या दिनी कोलकाता येथे झाला.
एक हाती गीतेचे तत्त्वज्ञान आणि दुसर्या हाती भगवान श्रीरामकृष्ण परमहंस ठाकूरजी यांचे, मातेची (भारतमातेची) सेवा करावी, हे विचार आणि मुखामध्ये प्रेम घेऊन स्वामीजी जागतिक व्यासपीठावर प्रकट झालेत. त्यातून त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाचा, उत्कर्षाचा मार्ग सांगितला. विवेकानंदांनी सर्वांच्या उन्नतीचा मार्ग सांगितला आणि त्यामध्ये सर्वात जास्त भर दिला तो युवकांवर!
एका ठिकाणी ते युवकांना उद्देशून म्हणतात, “नक्षत्र-तारकांसहित आकाश तुमच्यावर कोसळून तुमचे चूर्ण करून टाकेल. अशा मंत्राच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहू नका. त्यांना, थोड्याच वेळात ते तुमच्या पायाखाली आल्याचे तुम्हाला दिसून येईल. जरा धीर धरा, तुम्हाला दिसून येईल की पैशाने, नावलौकिकाने, विद्येने कशानेही काही साधता येत नाही. एकमात्र प्रेमानेच सारे साधता येते, संकटांच्या अभेद्य भिंती चारित्र्याच्या बळाने पाडून टाकता येतात व मार्ग मोकळा करता येतो.”
विवेकानंदांच्या जीवन वाङ्मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते. प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करून तेवढ्यावरच न थांबता, त्यांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला होता. समस्त भारतीयांच्या दुःख, कष्ट, प्रश्न, समस्या त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतल्या होत्या. भारतभ्रमण यात्रेत देशाचे विकलांग स्वरूप पाहून विवेकानंद व्यथित झाले होते. त्यामुळे त्यांचे मिशन हे ‘माणूस घडविणे’ (मॅन मेकिंग) हे होते. मनुष्यनिर्माणातूनच राष्ट्राचे पुनरुत्थान, राष्ट्र निर्माण (नेशन बिल्डिंग) होऊ शकते, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
आधुनिकता आणि वेदांताची आध्यात्मिक बैठक यांचा अपूर्व मिलाफ त्यांच्या शिकवणुकीत होता. भारतभ्रमणाच्या शेवटी २५ ते २७ डिसेंबर, १८९२ ला त्रिसागरांनी वेष्टीत (हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्राच्या त्रिवेणी संगमावर) जेथे असे प्रमाण मानले जाते की, माता पार्वतीने (दक्ष प्रजाती राजाची कन्या माता कन्याकुमारीच्या अवतारात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी याच शिळेवर एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली होती.) तेथेच कन्याकुमारीस्थित त्या शिळेवर स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस तीन रात्र तपश्चर्या केली होती. त्यांना येथेच जीवन साक्षात्कार झाला.
भारताचा सुवर्णमयी भूतकाळ, खडतर असा वर्तमानकाळ आणि उज्ज्वल भविष्यकाळ त्यांच्यापुढे उभा राहिला. राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या तरुणाचे एका युगप्रवर्तक योद्धा संन्याशात रूपांतर झाले. पुढे शिकागो धर्म परिषदेत जगाला भारतीय संस्कृतीची ओळख झाली. विवेकानंद हे पहिले संन्यासी होते की, ज्यांनी आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही, तर भारतमातेला पुन्हा तिचे गतवैभव कसे मिळवता येईल, हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता.
एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भारत परिक्रमेच्या काळात पाहिले होते. पाश्चात्त्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती, तेव्हा भारतात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती, हेही त्यांना माहीत होते. परंतु, आज मात्र भारत परकीयांच्या गुलामगिरीत खितपत पडला आहे, हे शल्य त्यांच्या हृदयाला वेदना देत होते.
विवेकानंद म्हणतात की, “एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसते. उठा आणि कामाला लागा. हे जीवन आणखी किती दिवस टिकणार आहे? जन्माला आलाच आहात, तेव्हा जगात काहीतरी खूण सोडून जा, काहीतरी महत्त्वाचे कार्य करून जा. नाहीतर तुमच्यात व वृक्षपाषाणांत काय भेद आहे? तीदेखील अस्तित्वात येतात, झिजतात आणि शेवटी नष्ट होतात.”
संघटित कार्य करण्याचा मंत्र विवेकानंदांनी दिला आहे. संघटित कार्यात सहभागी झाल्याने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा वेग अधिक वाढतो. स्वामीजी म्हणतात, “करावयास लागा म्हणजे कळून येईल की, तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य, प्रचंड ऊर्जा आहे. व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तिदायी विचारांची सोबत आवश्यक असते.”
विवेकानंद संबोधतात, “युवकांनो झेप घ्या, दिशा तुम्हाला शरण येतील.” ब्रिटिशांच्या गुलामगिरीत देश असताना विवेकानंद या तरुण योद्धा संन्याशाने एकट्याने सारे जग आपल्या विचाराने जिंकले होते. आजच्या तरुणाला विवेकानंदांचे विचार अंगीकारावे लागतील. कारण, विवेकानंद ही केवळ व्यक्ती नसून, ती एक वृत्ती आहे. म्हणून तिची पुनरावृत्ती शक्य आहे. राजयोग + भक्तियोग + कर्मयोग यांचा त्रिवेणी संगम म्हणजे विवेकानंद होय. हे तीन योग जीवनात आले की, विवेकानंद ही वृत्ती जागृत होणारच! हे तीन योग आपल्या जीवनात बनवायचे असतील, तर विवेकानंदांच्या चरित्राचा अभ्यास करावा लागेल.
राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी, समाजहितासाठी वापरायची नैतिकता ज्यांच्यात असते, तो खर्या अर्थाने देशाचा आदर्श युवक होय. भविष्यातील देशाचा आधारस्तंभ होय. असे युवक ज्या देशात, ज्या समाजात राहतात, तो देश तो समाज बलवान होतो. आपला भारत देश हा जगातील सर्वात तरुण युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. कारण, आपल्या देशातील युवकांची संख्या जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. कदाचित, याच आत्मविश्वासाच्या जोरावर माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता होण्याचे एक आशादायी स्वप्न पहिले होते. ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी विवेकानंदांच्या विचारांचे पाईक होऊ या.
- प्रा. अमोल अहिरे
(लेखक विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शाखा-नाशिकचे नगरप्रमुख आहेत.)