लोकमान्य गजाआड झाल्यानंतर...(पूर्वार्ध)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2020
Total Views |


lokmanya tilak_1 &nb



राजद्रोहाच्या कलमाखाली टिळकांनी भोगलेला मंडालेचा कारावास तब्बल सहा वर्षांचा! टिळकांच्या उत्तरायुष्यातील महत्त्वाचा, वैशिष्ट्यपूर्ण आणि तेवढाच खडतरसुद्धा! मंडालेत टिळकांची प्रकृती बिघडली. दरम्यान, पुण्यात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. टिळकांनी दुःखाचे हे प्रहार सोसून मंडालेत गीतारहस्यलिहिले, हे सर्वश्रुत आहेच. मंडालेच्या कारागृहातले टिळकांचे वर्तन गीतेतील कर्मयोग्याला शोभेल असेच आहे.



मंडालेच्या शिक्षेपूर्वी दोन वेळा टिळक तुरुंगाची हवा खाऊन आले होते. कोल्हापूर प्रकरणाच्या वेळी झालेल्या शिक्षेत त्यांचे दोस्त सोबतीला होते
, ते म्हणजे आगरकर. पहिल्या कारावासाचा काळही तसा फार थोडा. (इतर दोन कारावासांच्या तुलनेत) नंतर पुण्यात प्लेगची महाभयंकर साथ आली आणि चापेकर बंधूंनी रॅन्डची हत्या केली आणि टिळकांना राजद्रोहाच्या कलमाखाली तुरुंगवास भोगावा लागला. यावेळी मात्र गुन्हेगार सापडले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून काही संशोधकांनी टिळकांची बाजू लावून धरल्याने शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधी त्यांची मुक्तत्ता करण्यात आली. त्यानंतर पुन्हा राजद्रोहाच्याच कलमाखाली झालेला मंडालेचा कारावास हा तिसरा! तब्बल सहा वर्षांचा! टिळकांच्या उत्तरायुष्यातील महत्त्वाचा, वैशिष्ट्यपूर्ण आणि तेवढाच खडतर!



टिळकांच्या खटल्याचे कामकाज मुंबईत झाले. टिळकांना शिक्षा सुनावली गेली. त्यावर टिळकांचे उत्तर प्रसिद्ध आहेच. सहा वर्षांची शिक्षा ऐकून टिळक म्हणाले होते
, “ज्युरीने कसाही निकाल दिलेला असला तरी मी पूर्णपणे निरपराधी आहे, असे मी पुनः निक्षून सांगतो. जगातील व्यवहाराचे नियमन करणार्‍या अधिक श्रेष्ठ प्रतीच्या शक्ती आहेत आणि मी मोकळा राहण्यापेक्षा माझ्या हालअपेष्टांनीच माझ्या अंगीकृत कार्याचा अधिक उत्कर्ष व्हावा, असा कदाचित ईश्वरी संकेत असेल.टिळकांचे हे विधान करारी आणि चिंतनीय वाटत असले तरी या इतकीच महत्त्वाची प्रतिक्रिया टिळकांच्या पत्नीची म्हणजेच सत्यभामाबाईंची आहे, त्याबद्दल पुढे बोलूच.



सुरुवातीला साबरमतीच्या तुरुंगात
६२ दिवस राहिल्यानंतर टिळकांची रवानगी मंडालेला झाली. मध्यंतरी कॉलराची साथ आल्यामुळे टिळकांना मेक्टीला इथे काही काळासाठी हलवण्यात आले. या प्रवासादरम्यान तेव्हाही टिळकांच्या स्वागतासाठी जमलेल्या भक्तांची संख्या हजारोंच्या घरात होती, असे सांगतात. मंडालेत टिळकांसाठी विशेष आचारी योजला होता, वासुदेव कुलकर्णी त्याचे नाव. मंडालेत टिळकांना ठेवले होते ती खोली दोन मजली होती. मंडालेत टिळक सकाळी लवकर उठत. संस्कृत श्लोक म्हटल्यानंतर सुमारे दीड तास टिळक ध्यानस्थ बसत. त्यानंतर नित्यकर्म आटोपून जेवणानंतर ते लेखन- वाचनात गढून जात. त्यांचे आचारी कुलकर्णी आपल्या आठवणीत लिहितात, “टिळक महाराजांनी कधी एक पळही आळसात वाया घालवल्याचे मी पाहिले नाही. ते आपल्या लिहिण्या-वाचण्यात इतके गुंग होत की, त्यांच्याकडे जाऊन काही बोलू लागलो तरी त्यांचे लक्ष जात नसे.मंडालेत संध्याकाळचे जेवण वाजता होई. त्यानंतर संध्याकाळी ते सकाळी तुरुंगातील खोल्या बंद केल्या जात. संध्याकाळी वरच्या माडीवर टिळक कुलकर्ण्यांना तुकाराम, ज्ञानोबा, एकनाथ, रामदासस्वामी, श्रीकृष्ण, राम, शिवाजी महाराज, कौरव-पांडव यांच्या गोष्टी सांगत. कधी दासबोध समजावून सांगत. कधी पेशवाई, तर कधी इंग्रजांच्या गोष्टी सांगत. मंडालेच्या तुरुंगात जगाचा एक नकाशा टिळकांनी सोबत ठेवला होता, तोही ते कधीतरी कुलकर्ण्यांना समजावून सांगत असत.



मंडालेच्या कारावासात पहिल्या दीडदोन वर्षांनंतर त्यांचा मधुमेह जास्तीचा वाढू लागला. लघवीतील साखरेचे प्रमाण प्रचंड वाढले. शरीर अशक्त झाले आणि पथ्यपाणीही वाढले. मंडालेचा महाभयंकर उकाडा टिळकांना सहन होईना. त्यांच्या अंगावर या काळात फोड येत असत. उष्णतेमुळे जीव घाबरा होत असे. या उकाड्यातून सुटका व्हावी
, म्हणून टिळकांनी मला अंदमानला पाठवा,” असेही अर्ज करून पाहिले. अंदमानात उकाडा कमी असावा, या आशेने त्यांनी हे अर्ज केले खरे; पण शेवटी पदरी निराशाच आली. अस्वस्थ होऊन कुलकर्ण्यांना टिळक म्हणाले, “ठीक आहे, मी कैदेतच मारावे अशी भगवंताची इच्छा दिसते!


तुरुंगातून महिन्याला एक पत्र घरी पाठवण्याची मुभा टिळकांना मिळाली. पण
, त्यात राजकीय विषयांवर लिहिण्याला सक्त मनाईच होती. तुरुंगातून टिळकांनी पहिले पत्र लिहिले ते त्यांच्यासोबत सावलीसारखे असणार्‍या दादासाहेब खापर्डे यांना. दादासाहेब टिळकांच्या सुटकेसाठी नंतरची तब्बल दोन वर्ष विलायतेत जाऊन खटपट करत होते, हे विशेष. आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी टिळकांनी लगेचच पाठवली. पहिल्या यादीत सुमारे २८ पुस्तकांचा समावेश होता. सोबत त्यांनी पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल विशेष नोंदही करून ठेवली होती. समुद्राच्या किंवा पावसाच्या पाण्यामुळे पुस्तके व वस्तू खराब होऊ नयेत, म्हणून एका मेणकापडात व्यवस्थित गुंडाळून मग कार्डबोर्डाच्या पेटीत घालाव्यात.मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीतारहस्यलिहिले आणि त्याची प्रत सरकारने जप्त जरी केली, तरी मी पुन्हा जसेच्या तसे गीतारहस्यलिहून काढेन,” असा आत्मविश्वास टिळकांनी दाखवला, हे बहुतेकांना ठाऊक आहे. गीतारहस्यलिहिताना विविध भाषेतील ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी मंडालेत टिळकांनी केलेला आणखी एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे, त्यांनी घेतलेले विविध भाषांचे शिक्षण. जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकण्याची पुस्तके त्यांनी मागवली आणि सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पाच महिन्यांतच पूर्ण केला. फ्रेंच भाषासुद्धा टिळक पाचव्या महिन्यात व्यवस्थित वाचू लागले. टिळकांच्या सुटकेसाठी विलायतेत धडपडणार्‍या दादासाहेब खापर्ड्यांना टिळकांनी आग्रहाचा सल्ला दिला, “तिकडे तुम्हीही फ्रेंच भाषा शिकून घ्याच.विलायतेत परकीय भाषा कुठे आणि कशी शिकता येईल, याचे पत्तेही टिळकांनी मंडालेहून लिहिलेल्या पत्रात पाठवलेत, हे वाचून आश्चर्य वाटेल.



कारावासातील पत्रांमधून कुटुंबवत्सल टिळक दिसतात. पत्नीच्या प्रकृतीची तळमळीने काळजी करणार्‍या निराळ्याच पतीचे दर्शन घडते. खरं तर सार्वजनिक आयुष्यात प्रचंड व्याप टिळकांनी मागे लावून घेतलेले असल्याने त्याच्या झळा सत्यभामाबाईंना सोसाव्या लागल्याच. तरीही त्यांनी कधीही कुरकुर केल्याचे ऐकिवात नाही
, उलट समर्थपणे त्यांनी संसाराचा भार सांभाळला. बाई खंबीर होत्या. टिळकांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच रात्रीच्या गाडीने निघून तेव्हाचे केसरीचे संपादक खाडिलकर पुण्याला आले. टिळकांना झालेल्या शिक्षेचा जबरदस्त धक्का त्यांना बसलेला होता. गायकवाडवाड्याच्या (आताचा केसरी वाडा’) दारावर डोके ठेवून धाय मोकलून खाडिलकर रडूच लागले. शिपायाला त्यांना सावरता येईना. कसेबसे ते आत आले, तोच टिळकांच्या धर्मपत्नी सत्यभामाबाई माजघरातून बाहेर आल्या. त्यांना पाहून खाडिलकरांचा अश्रूंचा बांध पुन्हा फुटला. हुमसून हुमसून ते रडू लागले. टिळकांच्या शिक्षेची वार्ता कशीबशी त्यांनी सत्यभामाबाईंना सांगितली. अनेकांना वाटेल सत्यभामाबाई कोसळल्या असतील. आपल्या पतीला सहा वर्षं शिक्षा झाल्यावर कुठल्या पत्नीला धक्का बसणार नाही.



पण छे! दुःखाचा वज्राघात परतवून लावताना एखाद्या तपस्विनीप्रमाणे सत्यभामाबाई गरजल्या
, “खाडिलकर, अहो यांना जी शिक्षा झाली, ती त्यांनी चोरी केली म्हणून नाही. छीनाली केल्याच्या आरोपावारूनही नाही. राजद्रोहाच्या खटल्यात शिक्षा झाली ना? सहा वर्षं! मग तुम्ही असे रडताय काय? देशासाठी ही शिक्षा आहे.सत्यभामाबाईंची तब्येत अधूनमधून बिघडत असे. त्यांनाही मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्या आजारावर काही औषधे टिळकांनी मंडालेतून आपल्या पत्रातून सुचवलेली आहेत. टिळकांनी लिहिलेली सगळी पत्रे त्यांचे भाचे धोंडोपंत यांच्या नावे लिहिली. धोंडोपंत जी पत्रे घरच्यांना वाचून दाखवत, जवळपास प्रत्येक पत्रात टिळकांनी आपल्या पत्नीबद्दल उत्कट काळजीने लिहिलेले दिसेल. धोंडोपंतांना टिळक सांगतात, “माझ्यापेक्षा मला त्यांची (पत्नीची) अधिक चिंता वाटते. सौभाग्यवतीला उत्साह वाढवणार्‍या आशादायक बातम्या सांगाव्यात, त्याचा खरा अर्थ त्यांना माहित असला तरी! संकटात किंवा दु:खात आशेवरच माणूस जगू शकतो.टिळकांना स्वतःला सुटकेची आशा नसली तरी घरच्यांना मात्र टिळक सतत प्रोत्साहित करत. मंडालेहून मी लवकरच परतणार,’ याबद्दल त्यांच्या आशा जागवत. टिळक लिहितात, “हे दुर्दैव एक दिवस संपेल. पण, तोपर्यंत आनंदात राहावे आणि शांतपणे धैर्याने वाट पाहावी, असे तिला सांगावे. कोणाला तरी पराभव पत्करावा लागतोच आणि आपण जर तो पत्करला नाही, तर दुर्दैवाला पत्करावाच लागेल.




सत्यभामाबाईंची काळजी करणारे बळवंतरावांचे शब्द वाचून काळजाला खरोखर घरे पडतात.
मी सुटून येईपर्यंत धीराने राहा,” असे ज्या पत्नीला टिळक सांगत होते, तिच्याच मृत्यूची वार्ता दुदैवाने टिळकांना मंडालेत ऐकावी लागली. सत्यभामाबाईंच्या मृत्यूनंतरच्या भावना टिळकांच्याच शब्दात - मृत्यूची तार म्हणजे वज्राघातच वाटला. संकटांचा शांतपणे स्वीकार करण्याची सवय मला आहे. पण, या घटनेचा जबरदस्त धक्का मला बसला आहे, हे मान्य करावयासच हवे... मला सर्वात जास्त दु:ख कशाचे झाले असेल, तर शेवटच्या क्षणी मला तिच्यापासून दूर राहणे भाग पडले याचे... माझ्या आयुष्यातील एक प्रकरण संपले आणि दुसरे संपावयासही फार काळ लागणार नाही असे वाटते.

(क्रमशः)

- पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@