माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

vishnu sawara_1 &nbs
 
 



जव्हार :
माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सावरा यांचे बुधवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. सवरा यांच्यावर मुंबईच्या कोकिला बेन रुग्णालयात उपचार सुरू होता. दीर्घकाळापासून ते आजारी होते. अखेर बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास रुग्णालयात उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांचे वाडा येथील निवासस्थानाहून निघणार आहे.



संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले विष्णू सावरा यांनी तीस वर्षे वाडा भागाचे प्रतिनिधित्व करीत असताना विधानसभेत शेकडो कपात सूचना, लक्षवेधी, तारांकित प्रश्न, तसेच त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने आदिवासी भागातील अनेक समस्या मार्गी लावण्यात यश मिळवले. सत्तेपेक्षा सेवा समाधानकारक मानणा-या विष्णु सवरा यांनी आमदार निधी, डोंगरी विकास निधी, विशेष घटक योजना, नाबार्ड, हडको, विशेष दुरुस्ती, वैज्ञानिक विकास, कोकण विकास व बजेटच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यामध्ये त्यांनी यश मिळवले.



१९८० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधील नोकरी सोडून ते भारतीय जनता पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत झाले. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने वाडा मतदार संघात उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून पुन्हा वाडा मतदार संघातून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांचा निसटता पराभव झाला. दोन वेळा पराभव पत्करुनही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले होते. सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाने वाडा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी दिली. यावेळी मात्र त्यांनी विजय प्राप्त करुन आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. या निवडणुकी नंतर झालेल्या सन २०१४ पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवून सातत्याने सहावेळा विजयी होण्याचा सन्मान मिळविला.


सन १९९५ च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात १ फेब्रुवारी १९९९ रोजी आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला. अवघे सहा महिने मिळालेल्या मंत्रीपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली.राज्यातील शंभरहून अधिक आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला. विक्रमगड तालुक्याची निर्मिती, वाडा येथील २२० के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र, वाडा एसटी आगाराची निर्मिती, वाडा, विक्रमगड मध्ये आयटीआय काॅलेज, निंबवली, केळठण, तिळसा, ब्राम्हणगांव, उंबरखांड, शिरगाव येथील पुलांची कामे अशा अनेक कामांसोबत आदिवासी भागात प्रत्येक गावाला जोडणा-या रस्त्यांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजना, समाजगृहे अशी अनेक कामे त्यांनी केली. सन २०१४ मध्ये भाजपा सरकार मध्ये त्यांच्यावर पुन्हा आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. 



@@AUTHORINFO_V1@@