फादर दिब्रिटो, 'ह्या' प्रश्नांची उत्तरे द्याच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |
an _1  H x W: 0
 


आनंद हर्डीकरांचे जाहीर पत्र


 

माझे जुने स्नेही आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना सुमारे काही महिन्यांपूर्वी मी एक पत्र पाठवले होते. मी त्या पत्रात फादर दिब्रिटो यांच्या साहित्यिक वैचारिक भूमिकेबद्दल काही गंभीर प्रश्न, काही परखड आक्षेप मांडले आहेत; त्यांच्या-माझ्यातील परस्परचर्चेत मी ते यापूर्वीही अनेकदा - काही वेळा जाहीरपणेसुद्धा - मांडले आहेत. त्या प्रश्नांबद्दलची त्यांची उत्तरे समजून घ्यायला मी तयार असतानाही त्यांनी सुमारे तेरा वर्षे मला ताटकळत ठेवले. त्यामुळे नाइलाजाने आणि 'विरोधकांशी वाद-प्रतिवाद-संवाद करायला मी तयार आहे,' अशा खुद्द फादर दिब्रिटो यांनीच दिलेल्या जाहीर आश्वासनाचा आधार घेऊन मी ते पत्र जसेच्या तसे आपल्यासमोर ठेवतो आहे. समाजमाध्यमांवर हे पत्र यापूर्वीच बर्‍यापैकी प्रसारित झाले असले, तरी खुद्द फादरनी किंवा त्यांच्या विरोधात टोकाची अतिरेकी भूमिका घेणार्‍या विघ्नसंतोषी अनामिक गटांचा 'यथेच्छ समाचार' घेणार्‍या आघाडीच्या प्रसारमाध्यमांनीही त्याची दखल घेतलेली नाही. म्हणूनच दै. 'मुंबई तरुण भारत'च्या सहकार्याने मी आता आपल्यापर्यंत ते पत्र पोचवतो आहे. कुणाला माझ्या या कळकळीच्या आवाहनात आव्हान दडले आहे, असे वाटले तर नाइलाज आहे. आपल्या या संदर्भातील प्रतिक्रिया समजल्या, त्या निमित्ताने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या संदर्भातील हा तिसरा पक्ष थोड्याफार प्रमाणात तरी चर्चिला गेला, तर समाजाला आवश्यक अशी थोडीफार वैचारिक घुसळण होऊ शकेल, अशी माझी माफक अपेक्षा आहे.

 
 

प्रिय मित्रवर्य फादर फ्रान्सिस दिब्रिटो,

 

सस्नेह नमस्कार...

 

आज मुद्दाम हे पत्र पाठवतो आहे.

तसे पाहिले, तर ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून आपली महामंडळातर्फे बिनविरोध निवड झाल्यानंतर आपण दोघे परस्परांना भेटलो आहोत. पुण्यात 'मसाप'तर्फे आपला सत्कार होता. त्या दिवशी 'राजहंस'च्या कार्यालयात दिलीप माजगावकरांना आपण आवर्जून भेटायला आला होतात. त्यावेळी आपली थोडीफार अनौपचारिक चर्चासुद्धा झाली. तथापि तेवढ्याने माझे समाधान झाले नाही म्हणून हे पत्र. आता आपण विविध ठिकाणच्या सत्कार-सोहळ्यांमध्ये किंवा वार्तालाप-कार्यक्रमांमध्ये दंग राहणार आणि प्रत्यक्ष संमेलन होण्यापूर्वी आपल्याशी सविस्तर भेट वा चर्चा होण्याची शक्यता धूसरच राहणार, हे गृहीत धरून मी हे पत्र पाठवीत आहे.

 

आपल्या अध्यक्षतेखालील संमेलन उधळू पाहणार्‍या किंवा आयोजकांना हिंसाचाराच्या धमक्या देणार्‍या गटाचा मी प्रतिनिधी नाही, हे आपण जाणता. 'संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची, 'पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा', 'सृजनाचा मळा' या आपल्या पुस्तकांच्या निर्मितीत थोडाफार संपादकीय भार उचलणारा मी 'सुबोध बायबल' या सांस्कृतिक सेतुबंधनाच्या 'राजहंसी' प्रकल्पात प्रदीर्घ काळ आपल्या बरोबर सहभागी झालो होतो, तो आपल्या लाघवी लेखनशैलीचा आणि स्वागतशील गुणग्राहकतेचा प्रभाव पडल्यामुळे. त्याच जोडीला आपली अध्ययनशीलता तर मला अनुकरणीयही वाटत आली आहे. त्या सार्‍याच प्रक्रियेत अकृत्रिम स्नेहाच्या धाग्यांनी आपल्यातल्या वैचारिक मतभेदांवर केव्हाही मात केली. उत्तर भारताच्या तीर्थयात्रेत हरिद्वारला असताना आपण माझ्यासाठी प्रभू येशूकडे प्रार्थना केली होती आणि एक जपाची माळही मला आणून दिली होतीत. ही आपली स्नेहभरली आठवण आज मुद्दाम करून द्यावी, असे एवढ्याचसाठी वाटते की, आपल्या वैचारिक भूमिकेबद्दल यानंतर जे मी लिहिणार आहे, ते अनुत्तरित ठेवू नये. जो वाद-प्रतिवाद-संवाद करायला तयार असल्याचे आपण ताज्या संदर्भातील विरोधकांना सांगता आहात, तो माझ्यासारख्या वैचारिक आक्षेपकाशी करायचे यापुढे तरी टाळू नये. थातुर-मातुर उत्तरे देऊन किंवा सोयीस्कर मौन बाळगून माझा अपेक्षाभंग करू नये!
 

प्रिय फादर,

एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, वसईत आणि परिसरात पर्यावरणरक्षणासाठी आपण जो लढा दिलात, त्याबद्दल तूर्त मला काहीच म्हणायचे नाही. मात्र, त्या चळवळीत आपल्याला 'माफिया'ने त्रास दिला होता, याचे भांडवल करून आणि आपल्या प्रत्येक आक्षेपकालाही त्याच पठडीत बसवून वैचारिक-साहित्यिक क्षेत्रात विनाकारण सहानुभूती खेचून घेऊ नये. असो. 'ओअ‍ॅसिसच्या शोधात' या आपल्या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात (तुकोबाची माळ) आपण अमेरिकेतल्या वास्तव्यामधील एक प्रसंग वर्णन केलेला आहे.

 

दि. ६ ऑगस्ट हा दिवस 'हिरोशिमा दिन' म्हणून तिकडे साजरा केला जातो. त्या निमित्ताने एका चर्चमध्ये आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत प्रवचन करताना आपण म्हणाला होतात की, “हिरोशिमावर बॉम्ब टाकण्याचे पाप अमेरिकेने केले, आता त्याच दिवसाचे निमित्त करून 'हिरोशिमा दिन' पाळला जातो आहे. हा दांभिकपणा नाही का?“ त्याबद्दल एका अमेरिकन महिलेने आपल्या वरिष्ठ धर्माधिकार्यांकडे लेखी तक्रार नोंदवली होती. साहजिकच आपल्याला समज दिली जाणार, अशी आपली अपेक्षा होती; पण वरिष्ठ धर्मोपदेशकांनी उलट आपल्याला शाबासकीच दिली होती. दांभिकपणाला असणारा आपला विरोध आपण किती प्रभावीपणे व्यक्त केला आहात!

 

'त्या' प्रसंगामुळे आपली जी प्रतिमा एक वाचक म्हणून माझ्या मनात निर्माण झाली, तिच्यामुळेच तर मी आपल्याशी आपल्या पुस्तकांच्या आशयाच्या संदर्भात खडाजंगी चर्चा करण्यात पुढाकार घेतला. 'राजहंस'मधील वैचारिक स्वातंत्र्य आणि दिलीप माजगावकरांनी उपलब्ध करून दिलेली संपादकीय स्वायत्तता यांच्या जोरावर तर मी अनेक वेळा ख्रिस्ती धर्मशास्त्रापासून आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत विविध विषयांवर आपल्याशी साधकबाधक चर्चा केली आहे. त्याआधारे आपण संहितेत काही बदल, दुरुस्त्या वा सुधारणासुद्धा केल्यात. तथापि आता अनेक वर्षांच्या आपल्याबरोबरच्या चर्चेतून पुढे आल्यावर फादर, मला आपल्याच दांभिकपणाबद्दल प्रश्न पडू लागला आहे.

 

आपण इतके कसे बदललात? उदाहरण म्हणून आपले अगदी ताजे, मुंबईच्या पत्रकार संघातल्या वार्तालापाच्या वेळच्या वक्तव्याचेच घ्या! 'धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ धोकादायक' असल्याचे मत आपण व्यक्त केलेत आणि 'धर्माचा राजकीय शिडी म्हणून वापर नको,' असा सल्लाही दिलात. कुठल्याही पक्षाचे वा नेत्याचे आपण नाव घेतले नसले, तरी आपला रोख कुणावर आहे, हे कुणालाही सहज समजू शकते. आणि पुढे जाऊन आपण असेही म्हणालात की, 'तशी सरमिसळ झाल्यास, राजकारणात धर्माचा वापर झाल्यास धर्माचे अवमूल्यन होते.'

 

'पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा' हे पुस्तक लिहिणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो किती वेगळे होते? त्या पुस्तकाची निम्म्याहूनही अधिक म्हणजे जवळजवळ शे-सव्वाशे पाने 'त्या' पोपमहाशयांच्या जागतिक राजकारणात - विशेषत: पोलंडसारख्या त्यांच्या मायदेशात साम्यवादी सरकार उलथवून टाकण्याच्या ऐतिहासिक प्रक्रियेतसक्रिय सहभागाबद्दलच्या तपशीलवार वर्णनाने भरलेली आहेत. त्या पुस्तकाच्या निमित्ताने साम्यवादी राजवटींत, प्रामुख्याने सोव्हिएत युनियनमध्ये स्टालिनची राजवट असताना, कॅथलिक चर्चला कसा आणि किती छळ सोसावा लागला होता, हे मी आपल्याला ऐकवले होते. 'इन गॉड्स अंडरग्राउंड' आणि 'टॉर्चर्ड फॉर ख्रिस्त' ही फादर रुम्ब्राण्ड्ट यांची पुस्तके मी वाचली-अभ्यासली होती, हे समजल्यावर आपल्याला आश्चर्य वाटले होते. माझ्यासारखा एक हिंदुत्ववादी, धर्मस्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ तुरुंगवासातील यमयातना भोगणार्‍या ख्रिश्चन धर्मोपदेशकांबद्दल भरभरून बोलतो आहे, याचा अनपेक्षित अनुभव घेतल्यामुळेच आपल्या दोघांमधील त्यानंतरच्या खुल्या चर्चेला वाव मिळावा म्हणून आपणही प्रयत्न केलेत. 'त्या' पुस्तकाच्या मनोगतामध्ये माझ्या अल्प-स्वल्प 'व्यासंगा'चा आपण उल्लेखसुद्धा केलात.

 

'सॉलिडॅरिटी'सारख्या कामगार संघटनेमागे चर्चची ताकद उभी करून सोव्हिएत युनियनला शह देण्यापासून दक्षिण अमेरिकेतील ब्राझील-अर्जेंटिना यांच्यासारख्या दोन ख्रिश्चनबहुल देशांमधील विकोपाला गेलेल्या वादात मध्यस्थी करण्यापर्यंत चर्चने जी भूमिका बजावली होती, ती आपण त्या पुस्तकात गौरवास्पद मानली होती. त्यामुळे कॅथलिक चर्चचे किंवा ख्रिस्ती धर्माचे अवमूल्यन झाले, असे आपण दूरान्वयानेसुद्धा म्हटले नव्हते.
 

एवढेच नव्हे, तर साम्यवादी चीनबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या व्हॅटिकनच्या इच्छेला चिनी नेते प्रतिसाद देत नाहीत, या संदर्भातील 'त्या' पुस्तकातला आपला मजकूर ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या राजकीय हस्तक्षेपाचे समर्थन करणाराच होता. व्हॅटिकनच्या धर्मोपदेशक नेमण्याच्या अनिर्बंध सर्वाधिकाराला चिनी नेते जुमानत नाहीत; तो त्या देशातल्या सरकारचा अधिकार असला पाहिजे, असा आग्रह धरतात; बायबलच्या चिनी भाषेतील अनुवादाच्या प्रतींची चोरटी आयात रोखून धरतात...

 

या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केली होती. 'टाइम', 'न्यूजवीक', 'एशियावीक' या साप्ताहिकांनी चीनमधील भूमिगत कॅथलिक चर्चबद्दल बरेच काही प्रसिद्ध केले होते. मी ती कात्रणे आपल्याला वाचायला दिली आणि 'याबाबत चिनी सरकारची भूमिका सर्वार्थाने पटत नसली, तरी बहुतांशी समर्थनीय वाटते,' असे सांगितले. 'चीनमधील ख्रिश्चनांच्या निष्ठा दुहेरी असू नयेत; व्हॅटिकन हे केवळ एक धर्मपीठ नाही, तर ते एक स्वतंत्र राज्यही आहे; पोपमहाशय हे निव्वळ धर्माचार्य नाहीत; तर ते राज्यप्रमुखही आहेत; अशा परक्या राज्यप्रमुखाने आमच्या देशातील धार्मिक व्यवहारात ढवळाढवळ केलेली आम्ही खपवून घेऊ इच्छीत नाही... हे चिनी सरकारचे म्हणणे रास्तच आहे. भारतातल्या ख्रिश्चन समाजाच्या केवळ आध्यात्मिक आकांक्षांची पूर्ती करणारे धर्मपीठ कधीही स्वागतार्ह आहे; तथापि, त्या समाजाच्या बारीकसारीक बाबीसुद्धा नियंत्रित करणारे परके राज्यप्रमुख वा त्यांचे प्रतिनिधी मात्र नकोसे आहेत, ही भूमिका आपल्या देशातही बहुसंख्य समाजाची आहे,' असे मी आपल्याला सांगितले.

 

'चिनी सरकार आपल्या देशातले ख्रिस्ती धर्मोपदेशक नियुक्त करण्याचा अधिकारही आपल्याच हातांत राहावा, असा आग्रह लावून धरते. भारतात मात्र तशी व्यवस्था अस्तित्वात यावी, असे हिंदुत्ववाद्यांना वाटत नाही; त्याबाबत देशी धर्मयंत्रणेला पूर्ण स्वायत्तता मिळावी, असाच त्यांचा विचार आहे,' हेसुद्धा मी आपल्याजवळ अनौपचारिकपणे बोललो होतो. साम्यवादी चीनबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित व्हावेत, म्हणून व्हॅटिकनतर्फे केले जाणारे राजकारण आपल्याला खटकले नव्हते आणि 'लिबरेशन थिऑलॉजी' ही लॅटिन अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी सुरू केलेली डाव्या विचारांची चळवळसुद्धा आपल्याला आक्षेपार्ह वाटली नव्हती. एका हातात बायबल आणि दुसर्‍या हातात कार्ल मार्क्स या विचारवंतांचे 'दास कॅपिटल' हे पुस्तक घेऊन सुरू झालेल्या त्या राजकीय चळवळीमुळे ख्रिस्ती धर्माचे अवमूल्यन झाले, असे आपण खरोखरच मानता का? आणि जर तसे मानत नसाल, तर आपल्या ताज्या वक्तव्याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ स्पष्ट आहे की, कॅथलिक चर्चने जर राजकारणात विशिष्ट भूमिका पार पाडली, तर त्याबाबत आपला आक्षेप नाही. मात्र, हिंदुत्ववादी धार्मिक संघटनेने मात्र राजकारणातून चार हात दूरच राहिले पाहिजे, असा आपला आग्रह आहे. आपली ही भूमिका एकांगी तर आहेच, पण दांभिकपणाचीही आहे, असे जर मी म्हटले तर फादर, आपण काय म्हणाल? आपले म्हणणे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.

 

प्रिय फादर,

आपल्या दुटप्पीपणाचे आता एक जुने उदाहरण पुन्हा एकदा आपल्यासमोर विचारार्थ ठेवतो. 'जुन्या करारा'त मोझेसने ज्या दहा आज्ञा दिल्याचे वर्णन आहे, त्या जगप्रसिद्ध आहेत. त्या आज्ञांमध्ये 'मूर्तिपूजकांना धोंडमार करून ठार मारा!' या आज्ञेचाही समावेश आहे, हे आपण जाणताच. 'सुबोध बायबल'च्या महाप्रकल्पावर आपल्याबरोबर मी जेव्हा काम करीत होतो, तेव्हा याबाबत आपल्या दोघांमध्ये खूप खडाजंगी चर्चा झाली होती. मूर्तिपूजा हा चोरीमारी, दरोडेखोरी, व्यभिचार अशा दंडनीय गुन्ह्यांसारखाच एक गुन्हा मानून त्याबद्दल तशी पूजा करणार्‍या व्यक्तीलाच नव्हे, तर तिच्या कच्च्या-बच्च्यांनाही दगडधोंड्यांनी ठेचून ठार मारा! अशी आज्ञा देणार्‍या मोझेसचा 'राष्ट्रपुरुष' म्हणून आपण गौरव केला होता. मोझेस चरित्राला लिहिलेली आपली प्रस्तावना वाचून मी आपल्याला थेट प्रश्न विचारला होता की, “आपण अनेकदा विनाकारण हिंदुत्ववाद्यांना 'मनुवादी' ठरवून त्यांच्यावर टीका करता आणि धोंडमार करण्याची आज्ञा देणार्‍या मोझेसचा मात्र 'राष्ट्रपुरुष' म्हणून गौरव करता, हा दुटप्पीपणा का?' मूर्तिपूजेला विरोध असणे मी समजू शकतो; तथापि, मूर्तिपूजा हा व्यभिचारसदृश गुन्हा समजून त्यासाठी मृत्युदंड ठोठावणे हा घोर अन्याय नाही का?

 

आपण दिलेले थातुरमातुर उत्तर समाधानकारक वाटले नाही म्हणून मी 'सुबोध बायबल'च्या वसईत झालेल्या जाहीर प्रकाशनसमारंभातही त्याबद्दलची माझी खंत बोलून दाखवली होती. आपल्यालाही हे चांगले आठवत असेल की, मी आर्चबिशप यांच्या उपस्थितीत एका ख्रिश्चनबहुल मेळाव्यात मूर्तिपूजक हिंदू समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून अशी जाहीर विनंती केली की, 'खुद्द ख्रिश्चनांकडून माता मेरी, बाल जीझसपासून क्रूसावर मरण पत्करणार्‍या येशूपर्यंत अनेक मूर्तींबद्दल श्रद्धाभाव बाळगला जात असताना, जुन्या करारातील 'ते' विधान आक्षेपार्ह मानून धर्मग्रंथातून काढून टाकण्यात यावे. मूर्तिपूजा म्हणजे व्यभिचारसदृश दंडनीय गुन्हा ठरवणारे ते आक्षेपार्ह विधान रद्द करणे, हे सांस्कृतिक सेतुबंधनासाठी आवश्यक मानले जावे. दुसर्‍या व्हॅटिकन धर्मपरिषदेने जसे अनेक सुधारणावादी विचार मांडले, तसेच या बाबतीतही केले जावे.'

 

फादर,

आपण माझी ती जाहीर विनंती आजपर्यंत अनुत्तरितच ठेवली आहे. 'धर्माधर्मात पूल बांधू या!' असे आपले ताजे आवाहनअंतःकरणापासूनचे आहे, असे मी कसे मानू? मङूपलहळपसफ या इंग्रजी शब्दाचे दोन प्रकारे भाषांतर केले म्हणजे असा पूल बांधला जाईल का? मोझेसने 'लिंचिंग'ची आज्ञा दिली, असे सांगताना त्याने शत्रूच्या निर्दालनाची आज्ञा दिली, असे म्हणायचे आणि देशात घडणार्‍या अलीकडच्या 'लिंचिंग' गुन्ह्यांचा उल्लेख मात्र 'झुंडहत्या' या शब्दाने करायचा, ही अनुवादामधील चलाखी सांस्कृतिक सेतूची पायाभरणी करू शकेल, असे आपल्याला वाटते का? 'चलाखी' हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो आहे. 'सुबोध बायबल'च्या प्रस्तावनेत आणि 'नाही मी एकला' या आपल्या आत्मचरित्रामध्येही आपण या संदर्भातील अनर्थाचा उल्लेख केला आहे. 'जुन्या करारा'तल्या एका स्तोत्रात 'शत्रूचा नाश व्हावा, त्याची मुले पोरकी व्हावीत,' अशी शापवाणी उच्चारलेली असे, ती आपण उल्लेखिली आहे आणि त्याबद्दलची सारवासारव करीत असा खुलासा केला आहे की, 'पूर्वी संहितेची नक्कल हाताने तयार करीत असत. तशी नक्कल करताना 'हराम' या शब्दाऐवजी 'हराग' असा शब्द लिहिला गेला. 'हराम' या शब्दाचा अर्थ आहे - 'मूर्तिपूजकांना बहिष्कृत करावे!' आणि 'हराग'चा अर्थ आहे - 'मूर्तिपूजकांचा संहार करा!' असा हा 'ध'चा 'मा' झाल्यामुळे हत्याकांडे होऊन अनेकांना हकनाक प्राणाला मुकावे लागले आहे. बायबल-अभ्यासकांनी या गोष्टीची प्रांजळ कबुली देऊन योग्य दुरुस्ती केली आहे.'

 

तथापि प्रिय फादर,

आपल्या या खुलाशानंतरही - जरी तो पूर्ण समाधानकारक नसला, तरीही तो ग्राह्य मानून - मूळ प्रश्नाला उत्तर मिळत नाही ते नाहीच. 'मूर्तिपूजकांना बहिष्कृत करा!' अशी आज्ञा देणारा मोझेस 'राष्ट्रपुरुष' म्हणून आपण गौरवता, त्याचे काय? एखादा धर्मविचार वा धर्मरीत पटत नाही म्हणून ती अनुसरणार्‍या व्यक्तीला तिच्या कुटुंबासह बहिष्कृत करणे हे जर आपल्याला अपेक्षित असणार्‍या सहिष्णू संस्कृतीत बसत नसेल, तर तसे करण्याचा आपल्या असंख्य अनुयायांना आदेश देणारा 'तो' आदर्श म्हणून गौरवण्याचे कारणच कायमनूची निंदा आणि मोझेसचा गौरव अशा दुहेरी मांडणीच्या आधारे आपण सांस्कृतिक सेतू कसा काय उभारणार, हा माझा प्रश्न आपण आता तरी अनुत्तरित ठेवू नये. या पत्रात आणखी एकच मुद्दा मांडतो आणि तोसुद्धा आपल्याच अलीकडच्या एका वक्तव्याच्या अनुषंगानेच मांडतो. घटनेने दिलेल्या आविष्कारस्वातंत्र्याचा उल्लेख करून 'मी ते वापरणारच!' अशा राणा भीमदेवी थाटात आपण मुंबईच्या वार्तालापात बोलल्याचे वृत्त आहे.

 

पण फादर, खरे सांगा, आजपर्यंत आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आली आहे का? पर्यावरणरक्षणाचा आपला लढा तूर्त बाजूला ठेवू या. आपल्या लेखनावर वेळप्रसंगी कडक टीका झाली असेल; मे. पुं. रेगे यांच्यासारख्या तत्त्वचिंतकाने आपल्या लेखनातील मुद्द्यांचा प्रतिवाद करताना 'आपण कालकूट विष ओकता आहात,' अशा जळजळीत शब्दांचा भडिमार केला असेल; पण आपल्या 'तशा' लेखनानंतरही या महाराष्ट्राने आपल्या लेखनकर्तृत्वाचा यथोचित सन्मानच केला आहे. ज्या विचारसरणीवर आपण वर्षानुवर्षे टीका करीत आलात, त्याच विचारसरणीच्या पक्षाचे सरकार असताना आपण 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारा'ने गौरवले गेले आहात आणि त्या समारंभातही हाडीमाशी खिळलेल्या सवयीनुसार आपण त्या विचारसरणीवरच आडूनआडून टीका करू लागल्यानंतरही आपले भाषण कुणी बंद पाडले नाही, हे लक्षात असू द्या!

 

तथापि मला मनापासून असे जाणवते आहे की, आपल्या अभिव्यक्तीवर बंधने आहेत, असे जे आपल्याला वाटते आहे, त्यात थोडेफार तथ्य आहे. फक्त गंमत अशी आहे की, जी बंधने आपल्याला जखडून ठेवत आली आहेत, त्यांचे स्वरूप आपल्याला पुरते जाणवलेेले नाही. ख्रिस्तप्रेमापोटी चर्चची जी बंधने आपण स्वीकारली आहेत, ती आपल्याला काचत नाहीत, जाचत नाहीत आणि त्यामुळेच ती तोडून टाकावीशीही वाटत नाहीत.

 

प्रिय फादर,

आपण भारतीय संविधानाचा वेळोवेळी अभिमानाने उल्लेख करता, त्या संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा उपयोगही करता. तथापि आपण आणखी एका संविधानकाची दखल घ्यायला हवी. दि. 7 डिसेंबर १९६५ रोजी पोप सहावे पॉल यांच्या स्वाक्षरीनिशी जारी झालेले कॅथलिक चर्चचे संविधानक! ते सर्व कॅथलिकांना बंधनकारक असणारे संविधानक आपल्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधन घालत आले आहे. आपल्याला जे पटले असेल, ते सारेच्या सारे लिहायला-बोलायला आपण मोकळे नाही. आपण जे लिहिता, ते प्रसिद्ध होण्यापूर्वी चर्चमधील कुणीतरी 'सेन्सॉर' ते वाचून मंजूर वा नामंजूर करतात.

 

ही वस्तुस्थिती जगजाहीर नाही आणि म्हणूनच डॉ. गणेश देवींपासून डॉ. कौतिकराव ढाले-पाटील यांच्यापर्यंतच्या आपल्या ताज्या समर्थकांनाही ठाऊक नाही. पण, मला ती चांगली ठाऊक आहे. 'सुबोध बायबल'च्या निमित्ताने 'त्या' सेन्सॉरशिपचा परिणाम मला प्रत्यक्ष जाणवला आहे. 'त्या' महाप्रकल्पाच्या अधिकृत संपादकपदावरून मी घेतलेली सपशेल माघार ही त्या सेन्सॉरशिपचीच तर माझ्याकडून व्यक्त झालेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. मी तसा निर्णय ऐकवल्यानंतर आणि आपल्या 'मनोगता'मधून माझ्यासंबंधीच्या भावना व्यक्त करणारा परिच्छेद काढून टाकल्यानंतर आपल्याला मनापासून दुःख झाले होते आणि तरीही आपण ते दुःख जवळ केलेत, कारण चर्चचा शब्द प्रमाण मानण्यात आपले आयुष्य गेले होते.

 

त्या सार्‍या पार्श्वभूमीवर फक्त मी आणि मीच आपल्याला एक आवाहन करू शकतो आणि मला असे वाटते आहे की, हीच ती वेळ आहे. कदाचित काल मी हे आवाहन केले असते, तर ते योग्य वेळेपूर्वी केले, असे मानून आपण दुर्लक्षित केले असते आणि उद्या जर मी हे आवाहन केले, तर कदाचित उशीर झाला म्हणून आपण दोघे हळहळत बसू!

 

फादर,

माझे आपल्याला कळकळीचे आवाहन आहे की, चर्चची तशी बंधने द्या झुगारून आणि त्या धर्मसंस्थेच्या या देशातील इतिहासाचे चिकित्सक वृत्तीने परखड विश्लेषण करा. जर काही हिणकस आढळले, तर ते जाहीरपणे मान्य करा. 'तांडव'सारख्या कादंबरीतले ऐतिहासिक वास्तव जर खरोखरच आपल्या मनाचा थरकाप उडवणारे ठरले असेल, तर ते स्वीकारून पुढे त्याबद्दलची खंत व्यक्त करताना कचरू नका! 'होलीयर दॅन दाऊ' ही आजवरची भूमिका सोडून खर्‍याखुर्‍या संवादाला सिद्ध व्हा! 'त्या' तशा स्वातंत्र्यलढ्यासाठी आपल्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहांकित,

आनंद हर्डीकर


pasting

@@AUTHORINFO_V1@@