मुंबई : “युरोपातील ‘रेनेसान्स’ हा ग्रीकमधील ज्ञानाच्या पुनर्जीविकरणातून झाला. तसा मूलभूत ‘रेनेसान्स’ भारताच्या मातीतून व्हायचा असेल तर संस्कृतज्ज्ञांनी आपल्यासमोरील आव्हानांना ओळखून त्यावर कार्यवाही करायला हवी,” असे प्रतिपादन राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये संस्कृत विभागाच्या वतीने शनिवार दि. ३१ आॅगस्ट रोजी संस्कृ दिन साजरा करण्यात आला. यंदाच्या संस्कृत दिनाला राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष व दै. ‘मुंबई तरुण भारत’ तथा ‘साप्ताहिक विवेक’चे प्रबंध संपादक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी वरील विचार मांडले. दरम्यान आजच्या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ.. सुचित्रा ताजणे, डॉ.. माधवी नरसाळे, डॉ.. शकुंतला गावडे यांच्यासह प्रेक्षकांत मोठ्या संख्येने विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित होते.
दिलीप करंबेळकर आपल्या संबोधनात म्हणाले की, “संस्कृत भाषेसमोर सध्याच्या काळात तीन आव्हाने असून संस्कृत अभ्यासकांनी, विद्वानांनी आणि संशोधकांनी त्यावर विचार केला पाहिजे. पहिले म्हणजे, संस्कृत आणि त्यापासून विकसित झालेल्या अन्य प्रादेशिक भाषांत केवळ एकाने दिले आणि दुसऱ्याने घेतले असे झाले नसून दोघांतही आदान-प्रदान झाले. कोणत्याही राजाने ते लादले नाही व त्यातून आपली संस्कृती परंपरा निर्माण झाली, जी युरोपीयनांपेक्षा वेगळी आहे. हा सांस्कृतिक प्रवाह अधिक स्पष्ट करण्याची व जगासमोर आणण्याची गरज आहे.”
“दुसरे म्हणजे, प्रादेशिक भाषेत जे ज्ञान संस्कृमधून येऊ शकले नाही ते आता आपल्याला युरोपीय-इंग्रजी भाषेतून आलेले दिसते. परिणामी, आपल्याकडे प्रादेशिक भाषांमध्ये मूळची गणिती, भौतिकशास्त्राची, रसायनशास्त्राची परंपरा नाही. आयुर्वेदाचा अपवाद वगळता अन्य ज्ञानशाखांच्या परंपरा नाही. त्यामुळे संस्कृमधील ज्ञानपरंपरांची ओळख प्रादेशिक भाषांतून करुन देण्याची आवश्यकता आहे. त्या उपयोगी-निरुपयोगी हा नंतरचा मुद्दा. परंतू, तत्पूर्वी ते ज्ञान आधी प्रादेशिक भाषांमध्ये आणणे गरजेचे आहे.”
“तिसरी गोष्ट म्हणजे, प्राचीन विज्ञानावर भाबडेपणाने विश्वास न ठेवता, प्रयोगशील विज्ञानाच्या कसोटीवर ते घासून पाहिले पाहिजे. संस्कृतमधील विज्ञान प्रयोगात्मक किंवा वैज्ञानिकांच्या आवाक्यात आणणे गरजेचे आहे. असे झाले तर संस्कृत भविष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत निभावू शकते. युरोपात ‘रेनेसान्स’ घडले, ते ग्रीकमधील ज्ञानाच्या पुनर्जीविकरणातून. तसा मूलभूत ‘रेनेसान्स’ भारताच्या मातीतून व्हायचा असेल तर संस्कृततज्ज्ञांनी आपल्यासमोरील या आव्हानांचा विचार केला पाहिजे,” असे आवाहन यावेळी दिलीप करंबेळकर यांनी केले.
भारतीयांची वृत्ती वंशविच्छेदाची नाही
दिलीप करंबेळकर यांनी यावेळी आर्य, द्रविड वाद तसेच वेद-पुराणे, हडप्पा संस्कृती आदी विषयांवरही आपले विचार व्यक्त तेले. तसेच, आर्य बाहेरुन आले हा सिद्धांत चिकीचा आहे असे सांगत, आर्यांचा मूळ ग्रंथ मानल्या जाणाऱ्या ऋग्वेदात केवळ पंजाब, सिंधू व सरस्वती खोऱ्याच्या परिसराचा उल्लेख येतो. जर ते बाहेरुन आले असते तर त्यात त्यांच्या पूर्वाश्रमीच्या प्रदेशाचा संदर्भ दिसायला हवा होता, पण तसे होत नाही. म्हणूनच आर्य बाहेरुन आले ही संकल्पना चुकीचा आहे, असे करंबेळकर म्हणाले. दरम्यान, जगातल्या अनेकांनी भारतासह कित्येक देशांवर आक्रमण केले व तेथील मूळच्या लोकांची संस्कृती नष्ट करत वंशविच्छेद केला. पण भारतीयांनी कधी आक्रमण केले नाहीच आणि जरी केले असते तरी आपली वृत्ती इतरांच्या वंशविच्छेदाची नाही, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.