सुविख्यात संग्रहालयशास्त्रज्ञ डॉ. सदाशिव गोरक्षकर यांचे मार्गदर्शन आणि सहवास लाभलेल्या आणि त्यांना पितृस्थानी मानणाऱ्या मनिषा नेने यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
भारतीय संग्रहालय क्षेत्रात कीर्तिमान प्रस्थापित केलेल्या डॉ. सदाशिव गोरक्षकर यांचा जन्म दि. ३१ मे, १९३३ रोजी झाला. भारतात 'संग्रहालयशास्त्र' संकल्पनेचा सखोल परिचय करून देणारे असे सदाशिव गोरक्षकर यांचे व्यक्तिमत्त्व व कार्य होते. १९६४ साली गोरक्षकर तत्कालीन 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम'मध्ये (आताचे नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) असिस्टंट क्युरेटर (आर्ट) या पदावर रुजू झाले. तद्नंतर १९७५ साली डॉ. मोती चंद्रा यांचे उत्तराधिकारी म्हणून संग्रहालयाच्या संचालकपदी गोरक्षकर विराजमान झाले आणि १९९६ साली सेवानिवृत्त झाले. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील आम्हा सर्वांचीच त्यांच्या निधनामुळे मोठी हानी झाल्याचे वाटते. आम्हा सर्वांसाठीच ते एक मार्गदर्शक होते, मग तो कोणताही विषय असो, अगदी संग्रहालयाच्या प्रशासनाशी संबंधित किंवा संदर्भविषयक. ते एक चालते-फिरते ज्ञानपीठच होते. तुम्ही त्यांना कोणत्याही विषयाचा संदर्भ विचारला की, ते क्षणाचाही विलंब न करता त्याचे उत्तर देऊन तुमचे समाधान करत असत. सदाशिव गोरक्षकर यांना त्यांच्या विधीशाखेच्या पार्श्वभूमीची संग्रहालयातील कारकिर्दीतही मदत झाली. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व तर होतेच, पण, त्यांनी या दोन्ही भाषांमध्ये सखोल लेखनही केले.
'मृग - अॅनिमल इन इंडियन आर्ट,' 'लावण्य दपर्ण,' 'मेरिटाईम हेरिटेज ऑफ इंडिया,' 'इस्टर्न इंडियन ब्राँझेस'ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांनी अल्पाकृती भारतीय चित्रे, शिल्प, कांस्य मूर्ती या विषयावरदेखील असंख्य लेखही लिहिले आहेत. जपान, स्वीडन, अमेरिका या देशांत सदाशिव गोरक्षकर यांनी भारतविषयक अनेक प्रदर्शनेही आयोजित केली. 'डॉन ऑफ सिव्हिलायझेशन इन महाराष्ट्र,' 'चेहरा - द पोर्ट्रेचर इन इंडियन आटर्र्,' 'हवेलीज ऑफ राजस्थान,' 'तिबेटियन आर्ट,' 'वनश्री - कन्झर्व्हेशन ऑफ नेचर इन इंडिया' ही त्यांची काही गाजलेली आणि निराळी प्रदर्शने. संग्रहालयविषयक कोणतीही माहिती नसलेल्या मी १९८९ साली पदवीनंतर संग्रहालयात कामाला सुरुवात केली. परंतु, गोरक्षकर यांनीच मला संग्रहालयातील काम शिकवले आणि मार्गदर्शन केले. साहजिकच, गोरक्षकर यांच्यासारख्या प्रचंड अनुभवी आणि ज्ञानी व्यक्तीबरोबर काम करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. उंचीने कमी असले, तरी त्यांची उपस्थिती मात्र नेहमीच प्रेरणादायक, प्रोत्साहन देणारी, बलशाली अशीच असे. आपल्या मराठीतील 'मूर्ती लहान, पण कीर्ती महान' या म्हणीचा प्रत्यय त्यांच्याकडे बघितल्यावर येत असे. गोरक्षकर यांची नजर मात्र ससाण्यासारखी काही ना काही शोधत असे. शिवाय त्यांना कोणत्याही गोष्टीत कसलीही तडजोड चालत नसे. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी, याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असे.
आज गोरक्षकर आपल्यात नसले, तरीही त्यांच्यासोबत काम केलेल्या आठवणी अजूनही स्मृतिपटलावर तितक्याच ताज्या आहेत. मला आठवते की एकदा त्यांनी मला संग्रहाची काळजी कशी घ्यावी, समिक्षा कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले होते. खरं तर संग्रहालयाशी संबंधित प्रत्येक गोष्ट मी त्यांच्याचकडून शिकले. ते माझ्यासाठी अगदी वडिलांसारखेच होते. कारण, भारताबाहेर गेले की, ते नेहमी काहीना काही भेटवस्तू माझ्यासाठी हमखास घेऊन येत. माझ्याच नव्हे, तर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येकाच्याच कारकिर्दीला कलाटणी देण्यात गोरक्षकर सरांचा मोठा वाटा आहे. भारत सरकारने २००३ साली 'पद्मश्री' पुरस्काराने त्यांचा गौरव केला. तसेच त्यांना सांस्कृतिक मंत्रालयाची 'टागोर राष्ट्रीय फेलोशिप'ही मिळाली होती. सोबतच २०१६ साली त्यांना 'चतुरंग'चा 'जीवनगौरव पुरस्कार'ही प्रदान करण्यात आला होता. आज, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय देशातील प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्था म्हणून ओळखले जाते. अर्थातच, याचे श्रेय गोरक्षकर यांसारख्या आमच्या पूर्वाश्रमीच्या लोकांनी घातलेल्या बळकट पायालाच द्यावे लागेल. भारतीय संग्रहालयशास्त्राच्या क्षेत्रात सदाशिव गोरक्षकर यांचे नाव सदैव स्मरणात राहील.
- मनिषा नेने
(लेखिका छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या गॅलरी आणि सामान्य प्रशासन विभागाच्या संचालिका आहेत.)
(अनुवाद : महेश पुराणिक)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat