खेड्यापाड्यातील गरीब-गरजू मुलांपर्यंत ग्रंथालयाच्या माध्यमातून ज्ञानगंगा पोहोचविणार्या प्रदीप लोखंडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
ज्याच्या खिशात स्वत:च्या अभ्यासासाठी चार पैसेदेखील नव्हते, त्या माणसाने केवळ आणि केवळ आपल्या इच्छाशक्तीने देशभरात हजारो ग्रंथालये आणि अभ्यासक्रमासाठी शाळा सुरू केल्या. या कार्याचा आज तब्बल १० लाख मुलांना फायदा होत आहे. पुण्यात राहणारे प्रदीप लोखंडे मूळचे सातारा जिल्ह्यातील वाईचे. ते 'रुरल रिलेशन' नावाची एक स्वयंसेवी संस्था चालवतात. प्रदीप हे वाणिज्य शाखेतील पदवीधर असून 'मार्केटिंग' विषयात त्यांनी पदविका संपादन केली आहे. 'जॉन्सन अॅण्ड जॉन्सन'सारख्या कंपनीमध्ये त्यांनी काम केले आहे.
पुण्यातील एका नामांकित संस्थेत ते 'व्यवस्थापन' विषयातील पदविकेसाठी प्रवेश घ्यायला गेले, तेव्हा त्यांच्या अशुद्ध भाषेमुळे आणि पैसे नसल्याकारणाने प्रवेश नाकारण्यात आला. पण, प्रदीप यांनी आपली जिद्द न सोडता, सतत त्या संस्थेत प्रवेशासाठी खेपा मारल्या आणि अखेरीस त्यांना प्रवेश मिळालाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी 'जॉन्सन अॅण्ड जॉन्सन' कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली. खरंतर या नोकरीतूनच या समाजकार्याचा जन्म झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
त्याचे झाले असे की, प्रदीप यांचे मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये कामानिमित्त येणे-जाणे होते. या कामाच्या दरम्यान त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी गावातील विविध स्तरांवरील प्राथमिक माहिती संकलित केली. जशी की, गावात एकूण किती दुकाने आहेत, त्या दुकानांमध्ये काय विकले जाते, गावात किती दूरदर्शन संच आहेत किंवा गावात इंटरनेट आहे की नाही, त्यानुसार मग ग्राहकांचे वर्तन आणि बाजारातील खरेदी, अशी सर्वेक्षणाधारित महत्त्वाची माहिती त्यांनी गोळा केली. संकलित माहितीचे विश्लेषण करताना प्रदीप यांच्या लक्षात आले की, ग्रामस्थांना बर्याच गोष्टींची किमान माहितीही नाही. म्हणूनच मग त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असा विचार प्रदीप यांच्या मनाला स्पर्श करून गेला आणि त्यांनी 'ज्ञान सुरुवात'अंतर्गत गावातील माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथालयांची सुरुवात केली. २००१ साली गावातील पहिल्या ग्रंथालयाचा शुभारंभही झाला. या प्रत्येक ग्रंथालयाचे व्यवस्थापन करणार्या मुलीला 'मॉनिटर' या नावाने ओळखले जाते.
गावातील अनेक गरीब-गरजू मुलांना या पुस्तकांची खूप मदत होते. गावातील मुलांना अनेक शैक्षणिक अडचणी येतात. त्यांच्याकडे नेमकी माहिती प्राप्त करण्यासाठी किंवा शिक्षणासाठीही पुस्तके नसतात. या मुलांना प्रदीप लोखंडे यांनी सुरू केलेल्या ग्रंथालयांचा खूप फायदा झाला. गावोगावी आपल्या आई-वडिलांसोबत फिरतीवर असलेल्या मजुरांच्या मुलांनादेखील रीतसर शिक्षण घेता येत नाही. या मुलांना या ग्रंथालयातून मोफत शिक्षण दिले जाते, जेणेकरून ती मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत.
प्रत्येक ग्रंथालयात साधारण १८० ते २०० पुस्तके आहेत. या ग्रंथालयांना सुमारे ६ लाख, २५ हजार पुस्तके देण्यात आली आहेत. त्यांची किंमत दोन कोटी रुपये आहे. त्यापैकी प्रबंधन, आपत्ती व्यवस्थापन, शारीरिक प्रशिक्षण, भारतीय संविधान, नाटक, संगीत, सामाजिक आणि लैंगिक शिक्षण या विषयांवर आधारित पुस्तकांचाही समावेश आहे. आतापर्यंत देशभरातील ग्रामीण शाळांमध्ये चार हजार 'ज्ञान'आधारित ग्रंथालयांची स्थापना करण्यात आली असून साडेआठ लाख मुले लाभान्वित आहेत.
प्रदीप लोखंडे आपल्या संस्थेविषयी म्हणतात की,”भारतात १९९१ साली आर्थिक उदारीकरण सुरू झाले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी मी 'रुरल रिलेशन्स' ही कंपनी सुरू केली. गेल्या २० वर्षांच्या काळात मी महाराष्ट्रातील दीड हजारांच्या आसपास आणि देशातील गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तरांचल, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील सुमारे साडेतीन हजार खेडी पालथी घातली आहेत. तिथे काम केले आहे आणि अजूनही करतो आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जे काही सकारात्मक आणि चांगले बदल होत आहेत, ते मी अतिशय जवळून अनुभवत आलो आहे.”
ग्रामीण भागांत आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सर्वत्र उपलब्ध झाले आहे. उच्च शिक्षणासाठी शहरांपर्यंत रोज ये-जा करणे किंवा तिथे राहून शिक्षण घेणे ग्रामीण भागातील मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही शक्य होत आहे. आज ग्रामीण भागातील साधारण १५ कोटी मुले प्राथमिक शिक्षण घेत आहेत. त्यापैकी साधारण दहा कोटी विद्यार्थ्यांना मध्याह्न जेवणाचा लाभ मिळतो. या संस्थेने २००१ पासून विविध कंपन्यांशी संपर्क साधून त्यांचे जुने, वापरात नसलेले संगणक गोळा केले आणि ग्रामीण मुलांना शिक्षणाच्या, तंत्रज्ञानाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी गावातील शाळांमध्ये त्याच संगणकांचा सदुपयोग केला.
प्रदीप लोखंडे यांनी आतापर्यंत देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेशी जोडले आहे. त्यांना हे काम आणखी वाढवायचे आहे. त्यांच्या 'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' या पत्त्यावर लाखो मुले शैक्षणिक मदतीसाठी आजही पत्रे पाठवितात. या संस्थेने आपल्या कामातून गाव-खेड्यातील मुलांना शिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल भविष्य दिले आहे. समाजासाठी झटणार्या या व्यक्तीला पैशांच्या अभावी शिक्षण घेता आले नाही. मात्र, त्यांनी समाजातील मजूर, गरिबांच्या मुलांपर्यंत शिक्षण नेले. त्यांच्या संस्थेचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रवासाला सलाम...!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat