भेंडवळची भविष्यवाणी : देशात सत्ता स्थिर राहणार

    08-May-2019
Total Views | 199





बुलडाणा : शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहणार आहे तसेच देशातील सत्ताही स्थिर राहील, असे भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीतून वर्तवण्यात आले आहे. यावेळी देशाच्या सुरक्षेबद्दलचे भाकितही वर्तवण्यात आले आहे. भारतीय सुरक्षा भक्कम राहील. परकीय घुसखोरी होत राहणार असून, भारतीय संरक्षण खाते त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असेही सांगण्यात आले आहे.

 

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी करण्यात आली होती. गेली साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या घटमांडणीत धान्याच्या आधारे पीक, पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय भाकित वर्तवण्यात येते. या भविष्यवाणीकडे बळीराजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. अखेर भेंडवळची भविष्यवाणी जाहीर झाली.

 

यंदा राज्यात पाऊस सर्वसाधारण राहणार आहे. पहिल्या महिन्यात साधारण पाऊस असेल. कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस पडेल. दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिसऱ्या महिन्यात कमी-जास्त पाऊस पडेल. मात्र, पहिल्या महिन्याच्या तुलनेने नक्कीच अधिक असेल, असे सांगण्यात आले आहे. चौथ्या महिन्यात पाऊस थोडा लहरी राहणार असून अवकाळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

राज्यावर नैसर्गिक आपत्ती येण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भूकंपाचे धक्केही बसू शकतात, असे भाकित व्यक्त करण्यात आले आहे. अंबाळी मोघम असेल. रोगराई नसेल. कापसाचे उत्पादन मोघम असेल आणि भाव मध्यम राहील. ज्वारीचे पीकही सर्वसाधारण असेल. भावात तेजी नसेल. गव्हाचं पीक मोघम स्वरुपाचं असेल. तांदळाचं उत्पादनही मोघम राहील. तुरीचे उत्पादन चांगले होणार आहे,. मुग मोघम तर उडदाचे उत्पादन सर्वसाधारण असणार आहे. तीळ उत्पादन मोघम, भादलीवर रोगराईची शक्यता आहे. बाजरी उत्पादन सर्वसाधारण असलं तरी भावात तेजी असेल. हरभऱ्याचे उत्पादन सर्वसाधारण असेल, असे भाकित वर्तवण्यात आले आहे


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121