मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्य या विषयातील तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा जन्म वारकरी परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या ‘देगलूरकर’ या घराण्यात झाला. त्यांच्यातल्या चिकित्सक आणि संशोधक वृत्तीला जोड मिळाली, ती संतसाहित्याचं सिंचन झालेल्या संस्कारित मनाची आणि आध्यात्मिक वृत्तीची. लहानपणी झालेल्या संस्कारांची जोड त्यांच्या पुढील आयुष्यात केलेल्या संशोधनाला, अभ्यासाला उपयोगी ठरली. डॉ. देगलूरकर यांनी मूर्तिशास्त्र, मंदिरस्थापत्त्य यांचा अभ्यास करून इथल्या पुरातत्त्वशास्त्रात मोलाची भर घातली. मूर्तींकडे, मंदिरांकडे पाहाण्याची नवी दृष्टी दिली. जी सर्वसामान्य माणसं ईश्वरभक्तीसाठी मूर्तिपूजेचा मार्ग चोखाळतात ते यासाठी मंदिरांमध्ये जातात. त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचविण्यासाठी त्यांना समजतील अशा भाषेत त्यांनी लेख लिहिले. डॉ. देगलूरकर आपल्या भाषणात म्हणाले होते की,“मूर्तिशास्त्र हा विषय खूप दुर्लक्षित, उपेक्षित राहिला आहे. प्रत्येक धर्मामध्ये परमेश्वराचे अव्यक्त रूप असते. या रूपाची उपासना होते, याचा अर्थ मूर्तीचीच पूजा होते. भारतातील लोक दानवांचीसुद्धा पूजा करतात, असे इंग्रजांनी म्हटले होते. पण, देवाला इतके हात व तोंडे का दिलीत? याचा अभ्यास कोणी करत नाही. त्यामागे काहीतरी विचार आहे. कारण, मूर्तिशास्त्राबाबत खूप अनास्था आहे. ही अनास्था आता समाजाला परवडणार नाही. मूर्तीचा अभ्यास करताना मी त्यांच्याशी समरस झालो. त्या माझ्याशी बोलत असतात. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी परिष्कृत करताना माझे हात पुण्यवान झाले. मूर्तिशास्त्राचे अभ्यासक अनेक आहेत; पण अभ्यास करून मूर्ती परिष्कृत करणारा मीच आहे. आता हे ज्ञान सर्वत्र पसरत आहे. मला अजून खूप अभ्यास करायचा असून, या पुरस्कारामुळे आणखी ऊर्जा मिळाली आहे.”
पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासासाठी केवळ भारतातच नव्हे, तर जगातही ज्या डेक्कन कॉलेजचं नाव आदराने घेतलं जातं, त्या कॉलेजमधून डॉ. देगलूरकर यांनी पीएच.डी. पूर्ण केली. १९९३ पर्यंत तिथे अध्यापनही केलं आणि या कॉलेजला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यावर पहिले कुलपती होण्याचा मान त्यांना मिळाला. दोन वेळा डी.लिट. ही सन्मान्य पदवी मिळवणारे ते डेक्कन कॉलेजमधले पहिले प्राध्यापक. बालपणापासून झालेल्या संतसाहित्याच्या संस्कारांमुळे, संतांनी त्यांच्या साहित्यातून मांडलेल्या विचारांचा आणि मूर्तिशास्त्र व मंदिरस्थापत्य यांचा परस्परसंबंध आहे का? हे तपासण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. उत्सुकतेपोटी, जिज्ञासेपोटी ते पुरातत्त्वशास्त्राकडे वळले आणि मग या विषयात आपल्याला काही नवं संशोधन करता येईल का, या विचाराने त्यांनी अभ्यास सुरू केला. पुरातत्त्वशास्त्र विषय घेऊन एम.ए. झाले. डॉ. शांताराम भालचंद्र तथा शां. भा. देव हे त्यांचे या विषयातले गुरू होते.
मूर्तींचा अभ्यास करताना त्यांच्या असे लक्षात आले की, काही मूर्तींचा उलगडा नीटपणे झालेला नाही. उदाहरण द्यायचे झाले, तर ‘विठ्ठलाची मूर्ती कशी आहे?’ ‘केव्हाची आहे?’ हे प्रश्न महाराष्ट्राला सतत पडत आलेलेआहेत. त्यावर चर्चाही खूप झाल्या. ‘आता पंढरपुरी असलेली विठ्ठलाची मूर्तीच मूळातच असे आहे का? की आक्रमणाच्या काळात आणखी कुठे नेली गेली?’ यावर पुण्यात विद्वानांच्या चर्चाही झाल्या आणि जिज्ञासेपोटी ते या अभ्यासाकडे वळले. या अभ्यासाच्या वेळी अध्यात्माचा पाया असल्याचा त्यांना खूप उपयोग झाला. ‘ती मूर्ती कशी आहे ते उलगडायला हवे. शास्त्राच्या दृष्टीने तिचा अभ्यास करायला हवा,’ असं वाटायला लागलं. संशोधनांती त्यांनी असं अनुमान काढलं की, ती विठ्ठलाची मूर्ती ही योगस्थानक मूर्ती आहे. योग, भोग, वीर आणि अभिचारिक हे मूर्तींचेचार प्रकार असतात. त्यापैकी भोग मूर्ती असते, ती ऐहिक प्राप्त करून देणारी, समृद्धी देणारी असते. उदाहरणार्थबालाजी-व्यंकटेशाची मूर्ती. वीरमूर्तीची उपासना सामर्थ्याचे उपासक करतात, जशी मारुतीची किंवा महिषासुरमर्दिनीची मूर्ती. योगमूर्ती भारतातउपलब्ध आहेत. विष्णूच्या मूर्ती आहेत. विठ्ठलाची मूर्तीही योगशास्त्राप्रमाणे आहे. विठ्ठलाच्या या मूर्तीला दोनच हात आहेत. एका हातात शंख आहे, तर दुसऱ्या हातात कमळ आहे. म्हणजे गदा आणि चक्र ही शस्त्रं त्याच्या हातात नाहीत. कारण तो योगी आहे. ‘चित्तवृत्ति निरोध:’ असं पतंजलींनी म्हटलं आहे. योग करताना, छाती, मान आणि डोकं एका ओळीत पाहिजे. तेही विठ्ठलाच्या या मूर्तीचं आहे आणि ती मूर्ती उभी आहे, म्हणून तिला ‘स्थानक’ म्हणतात. ज्ञानेश्वरांच्या एका अभंगात तसा उल्लेख सापडला आहे. ते म्हणतात,
ऐसा हा योगिराजु, तो विठ्ठल मज उजु।
‘उजु’ म्हणजे ‘आवडणे.’ हा योगिराज आहे म्हणून मला आवडतो, असं कोणी म्हणावं? तर स्वत: योगी असलेल्या ज्ञानदेवांनी. याशिवाय आणखी काय पुरावे सापडतात. असा शोध घेताना शंकराचार्यांच्या पांडुरंगाष्टकामध्ये
महा योगपीठे, तटे भीमरथ्याम
वरं पुंडरिकाय धातुमुनिंद्रै।
अशी सुरुवात आहे. म्हणजे, हे महायोगपीठ आहे. तिथे हा ‘योगी विठ्ठल’ आहे. ज्ञानेश्वरही त्याला ‘योगी’ म्हणतात. वास्तुब्रह्म आणि बिंबब्रह्म अशा दोन संकल्पना त्यांनी मंदिरं आणि मूर्तींच्या संदर्भात मांडल्या. मंदिरशास्त्र आणि मूर्तिशास्त्र यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी महत्त्वपूर्ण उत्खननही केलं आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपर शोधनिबंधांचे वाचन केले आहे. या संशोधनासाठी त्यांनी इटली, इंडोनेशिया आदी देशांचे दौरे केले आहेत. ‘कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा’ , ‘टेम्पल आर्किटेक्चर अॅण्ड स्कल्पचर ऑफ महाराष्ट्र’, ‘पोर्ट्रेयल ऑफ दी वुमन इन दी आर्ट ऑफ दी डेक्कन’, ‘मेगॅलिथिक रायपूर’, ‘बिंबब्रह्म’ आणि ‘वास्तुब्रह्म’, ‘सूरसुंदरी’, ‘देवगिरी’, ‘मरकडी मंदिरे’ आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांना ‘स्नेहांजली पुरस्कार’ तसेच ‘चतुरंग संस्थेच्यावतीने ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.
दि. १७ व १८ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या‘,भारतीय इतिहास संकलन समितीच्यावतीने आयोजित कार्यकर्ता अभ्यासवर्गासाठी आदरणीय डॉ. गो. बं. देगलूरकर उपस्थित राहणार आहेत.त्यांच्या ज्ञानाचा फायदा जास्तीत जास्त नाशिककरांनी घ्यावा, असे भारत इतिहास संकलन समितीमार्फत आवाहन केले आहे.त्याचबरोबर भारतीय इतिहास संकलन समिती, नाशिक यांच्यावतीने ‘सिन्नर, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक यथादर्शन’ या इतिहासपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १७ ऑगस्ट रोजी, शंकराचार्य संकुल, नाशिक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता आदरणीय डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते होत आहे. अध्यक्षपदी डॉ. तेजस गर्गे, संचालक, पुरातत्व विभाग, मुंबई हे असणार आहेत. तरी नाशिककर व सिन्नरकर यांनी यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
-अंजली वेखंडे