विज्ञाननिष्ठ सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 

 
की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने

जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे

बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे...
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका काव्यातील या ओळी आहेत. आपल्यापैकी बहुतांश लोकांना विनायक दामोदर सावरकर हे एका नायकाच्या रुपात समोर आलेले दिसतात. छोट्याशा भगूर गावापासून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी तसेच नंतर जपान अशा विविध देशांत केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटन, त्यांनी उभ्या केलेल्या ‘मित्रमेळा’, ‘अभिनव भारत’ या गुप्त सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघटना यातून तात्याराव एक कुशल संघटक म्हणून दिसतात. हुतात्मा मदनलाल धिंग्रा तसेच कर्वे, कान्हेरे, देशपांडे हे तात्यांमुळे निर्माण झालेले क्रांतिकारक आपल्याला अवगत असतात. त्यांनी मार्सेलिसला मारलेली उडी, त्यानंतर झालेली अटक आणि हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात चाललेला अभियोग हा सुपरिचित आहे. दोन जन्मठेपींची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला झालेली पाठवणी आणि तेथील यातना देणारे प्रसंग हेदेखील आपल्याला माहीत असतात. त्यांनी निर्माण केलेले काव्य, नाटके, ग्रंथ या सगळ्यांबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे.
 
आजच्या परिस्थितीचा विचार करता शतपैलू सावरकरांपैकी सर्वांत महत्त्वाचे जे पैलू आहेत आणि ज्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले गेले नाही ते म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद आणि त्यांनी केलेली समाजक्रांती.
 
आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टी सर्व प्राणीमात्रांत दिसून येतात. पण, मनुष्य श्रेष्ठ ठरतो तो त्याच्या ठायी असलेल्या बुद्धी या गुणविशेषाने, पण हाच गुणविशेष मानवाने जर एखाद्या जुन्या धर्मग्रंथाला वा पोथीला, एखाद्या देवतेला वा प्रेषिताला, गहाण ठेवला आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचेच सोडून दिले तर त्याचा परिणाम म्हणून धार्मिक कट्टरता अंगी भिनली जाते. व्यक्ती-समाज या न्यायाने ती वाढत जाते आणि अंती राष्ट्रघातकी ठरते. तात्यारावांनी हेच मर्म जाणले आणि अत्यंत मूलगामी विचार करून आपली खर्‍या अर्थाने पुरोगामी मते मांडली. “धर्मग्रंथांवर समाज उभा करण्याचे दिवस आता गेले, समाज उभा करायचा असेल आणि टिकवायचा असेल तर तो विज्ञाननिष्ठ विचारांनीच,” असे आग्रही प्रतिपादन केले.
 
लेखाच्या सुरुवातीला मी ज्या चार ओळी लिहिल्या आहेत, त्यात सावरकरांनी ’एक व्रत बुद्ध्याची’ हाती घेतलंय असं दिसून येईल. काय होतं हे व्रत? या हिंदुभूमीस स्वातंत्र्य मिळवून देण्याचं! पण, हे स्वातंत्र्य केवळ परकीय शत्रूंपासून नव्हे, तर स्वकीय सनातनी, धर्माचा दुष्प्रभाव असलेल्या मंडळींकडून जे आपल्याच बंधूंचे सामाजिक शोषण आणि दमन करीत होते, त्यापासून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा यशस्वी प्रयास तात्यारावांनी केला. अंदमानमध्ये असताना सतत स्वदेशाबद्दल चिंतन आणि त्यायोगे चिकित्सा तात्याराव करीत. सर्वच धर्मांच्या शिकवणी आणि त्याप्रमाणे त्या त्या धर्माच्या अनुयायांची वागणूक ही अत्यंत परस्परविरोधी आणि एकूणच माणुसकीला धरून कशी नव्हती, हा अभ्यास तात्यारावांनी केला. उदाहरणार्थ मुसलमान बंदी हिंदू बंदिवानांना सहजतेने बाटवायचे. याचे कारण शोधण्यासाठी तात्यांनी इस्लामचा अभ्यास केला, तसेच हिंदूंच्या वेगवेगळ्या धर्मांचा-चालींचा-जातिभेदाचा-अस्पृश्यतेचा अभ्यास केला. तिथे असताना या बाटवाबाटवीच्या प्रकारावर उपायही शोधले, पण संपूर्ण भारताचा विचार करता ते उपाय तात्कालिक होते.
 
बहुतांश हिंदू समाज हा एका विचित्र धार्मिक पगड्याखाली जगत होता, पोथीनिष्ठ काल्पनिक जातीपातींत विभागला गेला होता. माणसासारख्या माणसाला पशूपेक्षा हीन वागणूक देणारा होता, हे तात्यांच्या लक्षात आले. रत्नागिरीतील स्थानबद्धता ही एक इष्टापत्ती ठरली आणि तात्यांनी समाजक्रांती आरंभली!
समाजक्रांतिकारक सावरकर
तात्याराव हे समाजक्रांतिकारक होते. ‘समाजसुधारक’ आणि ‘समाजक्रांतिकारक’ यांत अंतर आहे. समाजसुधारक हे समाजाचा जो पाया आहे तो तसाच ठेऊन, त्यावर समाजाची सुधारित रचना करतात. पण, समाजक्रांतिकारक मात्र जो समाजाचा रूढ पाया आहे तो मोडून, नवीन पायावर समाजाची निर्मिती करतात. तो रूढ पाया म्हणजे धर्मग्रंथप्रामाण्य, तर नवीन पाया म्हणजे विज्ञानप्रामाण्य!
 
प्रामाण्य म्हणजे एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरविण्याचा निकष. पूर्वी धर्मग्रंथ हेच प्रमाण मानायचे दिवस होते, त्यात अजूनही विशेष असे बदल झाले नाही आहेत. या धर्मग्रंथांचा पाया म्हणजे धर्म! तात्यारावांनी ‘धर्म’ या शब्दाची चिकित्सा केली आहे. त्यांनी चार प्रकारचे धर्म सांगितले -
 
१. नैसर्गिक धर्म - इंग्रजीमध्ये ज्याला ‘Natural Law' म्हणता येईल तो म्हणजे ‘नैसर्गिक धर्म’ किंवा गुण वा नियम. उदाहरणार्थ पाण्याचा धर्म (गुण) द्रवत्व, गुरुत्वाकर्षणाचा धर्म (नियम) म्हणजे Law of gravity, अग्नीचा धर्म (गुण) ज्वलन इ. म्हणजे पाणी, अग्नी, पृथ्वी यांच्या ठायी नैसर्गिकरित्या आढळणारे जे काही गुण आहेत, त्यांना त्या त्या वस्तूचे ‘धर्म’ म्हणता येईल. हे नैसर्गिक नियम किंवा गुण अपरिवर्तनीय आहेत. माणसाला ते बदलता येणे शक्य नाहीत म्हणूनच त्या गुणांना ‘शाश्वत धर्म’ असेही म्हणता येईल.
 
२. तत्त्वज्ञान - धर्माचा दुसरा अर्थ म्हणजे तत्त्वज्ञान. स्वर्ग, नरक, जन्म, मृत्यू, मृत्युपश्चात जीवन, इ. बाबी या तत्त्वज्ञान या श्रेणीत येतात. आपण इंग्रजीमध्ये ज्याला ‘Religion' म्हणतो त्या गोष्टीचा पाया म्हणजे तत्त्वज्ञान.
 
३. रिलीजन - धर्म या शब्दाचा तिसरा अर्थ होतो रिलीजन किंवा पंथ. परलोकी जे पुण्य पदरी पाडून घ्यायचे असते ते करण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात माणसाने इथे कसे वागावे याबद्दलच्या उपासनापद्धती ज्या चौकटीत बसविल्या आहेत ती चौकट म्हणजे पंथ होय. उपासना पद्धतीचे एकत्रीकरण करून एक वा अनेक धर्मग्रंथ निर्माण झाले आहेत. ही उपासना कशी करावी, कुणी करावी, किती करावी, कशासाठी करावी या सर्व गोष्टी किंवा नियम त्या त्या धर्मग्रंथात विदित आहेत. तशी उपासना न केल्यास परलोकी जे पुण्य मिळणार आहे त्यात अधिक उणे होते असे धर्मग्रंथ सांगतात.
 
४. इहलौकिक धर्म - या जगात माणसाने परस्परांशी कसे वागावे त्याचे जे नियम आहेत त्याला इहलौकिक धर्म किंवा विधी. ऊर्दूत कायदा, इंग्रजीमध्ये ‘Law' असे म्हणता येईल.
 
आता प्रश्न येतो की, ज्या वर ‘धर्म’ म्हणून उल्लेखिलेल्या गोष्टी आहेत त्यापैकी कोणता धर्म माणसाने मानावा? पहिला जो नैसर्गिक धर्म आहे त्याबाबतीत मानवी हस्तक्षेपाला अजिबात जागा नाही. उदा. आपण असा काही निर्बंध संमत करू शकत नाही की, सूर्याच्या उष्णतेऐवजी चंद्राच्या शीतल प्रकाशामुळे बाष्पीभवन व्हावे आणि जरी असा निर्बंध संमत केलाच तरीही त्याचा परिणाम ना सूर्यावर होणार ना चंद्र आणि पृथ्वीवर! त्यांचे त्यांचे म्हणून जे काही नियम ठरले आहेत, त्याप्रमाणेच सर्व गोष्टी घडणार, म्हणून धर्म म्हणून पहिला धर्म अंगीकारता येणार नाही. दुसरा धर्म म्हणजे तत्त्वज्ञान. तात्याराव म्हणतात, “जे तत्त्वज्ञान म्हणून धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे ते संपूर्ण सत्य नव्हे तर तो सत्याभास आहे. ते ज्ञान हे व्यक्तिसापेक्ष आहे, जसे की अमुक दिवशी उपवास केल्यास त्याचा लाभ होऊन स्वर्गप्राप्ती होते असे वर्णन जर धर्मग्रंथात असेल तर त्याचा पुरावा काय? पुन्हा एखाद्या व्यक्तीलाच जर उपवास करून स्वर्गप्राप्ती होत असेल, पण दुसर्‍या व्यक्तीला ती होत नसेल, तर ते संपूर्ण सत्य आहे का? याचे सरळ उत्तर नकारार्थी आहे. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य या संकल्पना अजूनही पूर्णपणे सिद्ध झाल्या नाहीत. ते रान आहे की वैराण आहे, पूर्वेस आहे की उत्तरेस आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. त्यामुळे ‘तत्त्वज्ञान’ या अर्थी ‘धर्म’ म्हणून बाजूला जाते. एकदा तत्त्वज्ञान बाजूला गेले की त्यावर जे धर्मग्रंथ उभे आहेत आणि त्यातील शिकवणी आहेत त्याही आपोआप बाजूला जातात. मग राहता राहिला तो इहलौकीक धर्म! माणसाने माणसाशी कसे वागावे याचे नियम हे माणसाने ठरवायचे आहेत. परस्पर संमतीने ठरवायचे आहेत. ज्यामुळे पृथ्वीवरील जीवन सुसह्य होणार आहे असे नियम हे अर्थातच धार्मिक पायावर नाही, तर विज्ञानाच्या पायावर उभे केले पाहिजेत! म्हणूनच प्रयोगसिद्ध विज्ञान हाच आधुनिक भारताचा वेद झाला पाहिजे,” असे ठाम प्रतिपादन तात्याराव करतात.
 
धार्मिक रूढी विरुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन
गेल्या शतकात तात्यारावांनी समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यास आरंभला केला. बुद्धिप्रामाण्यवादातून त्याकाळी जन्मलेले विचार आजही कुणी इतक्या धाडसी पद्धतीने मांडू शकेल, याबद्दल शाश्वती देता येत नाही. सनातनी विचारांचा प्रभाव प्रचंड असलेल्या त्याकाळी किती चुकीच्या कल्पना होत्या? चातुर्वर्ण्य संस्थेवर गाढा विश्वास, पोथीजात जातीभेद, त्यातून जन्माला आलेल्या विविध प्रकारच्या बंदी उदा. स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, इ. एक ना दोन किती किती अंधश्रद्धा! हे पोथीनिष्ठ जुनाट आचार पाहून, सावरकरांची लेखणी परजली. लेखांमधून या सर्व खुळचट आचारांवर घणाघात सुरू केला. काय म्हणतात सावरकर ते त्यांच्याच शब्दांत पाहूया-
 
चातुर्वर्ण्यासंबंधी भगवद्गीतेतल्या ‘चातुर्वर्ण्य मया सृष्टं।’ या वचनाचा आधार घेत तात्याराव युक्तिवाद करतात की, “या वचनाप्रमाणे जर वर्ण हा गुणकर्मावर आधारलेला आहे, जन्मावर नव्हे; तर मग आजचे चातुर्वर्ण्य हे जन्मजात कसे? आणि त्यामुळेच जातीभेद हा खरे पाहता त्या गीतेतल्या गुणकर्मावर आधारलेल्या चातुर्वर्ण्याचा उच्छेद आहे,” हा त्यांचा विचार युक्तिवादासाठी आहे. पण, याचा अर्थ असा नव्हे की, तात्यारावांना गुणनिष्ठ चातुर्वर्ण्य हवे होते, कारण पुढे तात्याराव म्हणतात, “मुळात चार वर्ण असोत की पाच, त्याच्याशी आपल्याला काय कर्तव्य? त्या चार वर्णांच्या आज झालेल्या चार हजार जाती कशा नष्ट कराव्यात,” हे आपले मुख्य कर्तव्य हीच तात्यारावांची भूमिका होती.
 
‘केसरी’त १९३०-१९३१ साली लिहिलेल्या लेखमालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मजात जातीभेदाचा उच्छेद आणि गुणजात जातीभेदाचा उद्धार हे सूत्र मांडतात. पण यांत अडथळा ठरते ती एक खुळचट समजूत अनुवंश! मनुष्यातील गुण आणि प्रवृत्ती रक्ताबरोबर त्या मनुष्याच्या वंशजांमध्ये उतरत जाते आणि त्यायोगे आपोआपच वंशविकसन होते हे मानणे म्हणजे अनुवंश. तात्यारावांच्या मते, “अनुवंश हे विकासाचे अनन्य कारण नाही, म्हणजे अनुवंश हे विकासाचे एकमेव कारण नाही.” ही गोष्ट अधिक स्पष्ट व्हावी यासाठी तात्याराव लिहितात, “मोठा दशग्रंथी ब्राह्मणाचा मुलगा, पण काही उपजतच ’हरी ओम’ म्हणून वेदपठण करु लागत नाही. त्याला जन्मभर काही शिक्षणच दिले नाही, तर तो अगदी निरक्षर भट्टाचार्यच राहणार. तेच एखाद्या शूद्राचा मुलगा उपजत शंख, पण त्याला काहीतरी शिकवत राहिल्यास तो त्या दशग्रंथी ब्राह्मणाच्या मुलापेक्षा अधिक बोलका निघेल.” पुढे जाऊन ते लिहितात, पितरांचे गुण संततीत यथावत उतरण्यास केवळ अनुवंशावरच व बीजांतील अंतर्हीत गुणांवरच अवलंबून राहता येत नाही. यास्तव एकाच आईबापांची अगदी जुळी मुले देखील सर्वदा आणि सर्वांशी सारखी असत नाहीत. जन्म त्या जातीत झाला, म्हणजे तो गुण त्या व्यक्तीत असलाच पाहिजे, ही धारणाच अत्यंत निरर्थक आहे,” हे सांगताना तात्याराव लिहितात, “अनुवंशाने गुणविकसन होते याचा अर्थच हा की, सद्गुणाप्रमाणेच दुर्गुणविकसनसुद्धा होते. त्याचमुळे जेव्हा पिढी दर पिढी अनुवंश जपला जातो, तेव्हा त्या जातींतील सद्गुणांसोबतच दुर्गुणही संक्रमित होतात आणि काही कालखंडानंतर गुणांचाही क्षय होऊ लागतो.” वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे तात्याराव उपायही सुचवतात. गुणांचा क्षय थांबवून पुन्हा निरोगी आणि बुद्धिमान संतती निर्माण करावयाची असेल, तर संकरच हितावह ठरतो इतका स्पष्ट आणि परखड विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेला आहे! हा संकर म्हणजे अर्थातच बेटीबंदीचे निर्मूलन! ही संकराची कल्पना मांडतांना तात्याराव म्हणतात, “खरे तर मानव जातींत संकर हा नसतोच कारण नैसर्गिक जात ही एकच - मानव. त्यामुळे कोणत्याही ’पोथीजात’ जातींमध्ये झालेले संबंध हे मुळात हापूस-रायवळ आंब्यांप्रमाणे अथवा बटाटा-टोमॅटोप्रमाणे झालेला शास्त्रशुद्ध संकर नसून, पूर्णपणे नैसर्गिकच आहे.” एवढा जात्युछेदक आणि क्रांतिकारी विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे! या बीजशुद्धी आणि अनुवंशाच्या चुकीच्या समजुतींवर पुढे प्रहार करतानाच, पांडवांचे कुळ, गौतम बुद्धाचे कुळ, उद्दालक ऋषींचा काळ असे अनेक वर्णसंकराचे ऐतिहासिक दाखले तात्याराव देतात. ‘पितृसावर्ण्य,’ ‘मातृसावर्ण्य,’ ‘अनुलोम-प्रतिलोम विवाह,’ ‘गुप्तसंकर’ अशा अनेक संकल्पना स्पष्ट करुन, हिंदूंच्या चारही वर्णांत ‘संकर’ हा अगदी शास्त्रोक्तपणे इतिहासात होत आलेला आहे. “आमच्या शेकडो जाती संकरोत्पन्नच असून, त्या सर्वांमध्ये एकच रक्त खेळत आहे,” असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर समुच्चय हिंदूंमधील संपूर्ण जातीभेदाला एका वाक्यात नष्ट करतात! या सर्व विषयांपलीकडे जाऊन ते म्हणतात, ”निसर्गाच्या तात्त्विक नि व्यापक अर्थी हे कृत्रिम आणि ते स्वाभाविक असा भेदच उरत नाही. जे कृत्रिम, जे मनुष्यकृत, फार काय तर जे जे घडू शकते ते ते वास्तविक नैसर्गिकच आहे! तत्वतः अनैसर्गिक असे काही असूच शकत नाही!”
 
अशाप्रकारे जो माणूस अगदी विज्ञानाच्या आणि इतिहासाच्या उपनेत्रांतून देखील कित्येक दाखले देऊन जन्मजात चातुर्वर्ण्य व जातीभेद कसा निरर्थक आहे हे लिहून ठेवतो आणि त्याच विचारांप्रमाणे अतिशय अचाट असे सुधारणा कार्यही घडवून आणतो. त्या तात्यारावांना उच्चवर्णीय म्हणून, जातीवादी आणि सनातनी म्हणून अपकीर्त करण्यात येते. त्यांचे सर्वार्थाने पुरोगामी, तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ विचार समोर येऊच दिले जात नाहीत हा केवळ आपला करंटेपणा होय.
 
तात्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे हे विज्ञाननिष्ठ विचार सर्वांनी अभ्यासावे, जातीभेदाचे वेड, बीजशुद्धीचे खुळ आपल्या डोक्यातून काढून टाकावे आणि सकल हिंदू समाज ‘सम’ आणि ‘समरस’ व्हावा हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
 
 

- सात्यकी सावरकर, पुणे (लेखक सावरकरांचे नातू आहेत.)
9822111456
@@AUTHORINFO_V1@@