नाद बागेश्री - परसातली ताजी भाजी

Total Views | 52


 

गेले दोन महिने अमरसिंग वळवी आणि त्याचा परिवार प्रयत्न करित होता. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं. नवीन वस्तू आणल्या. आजूबाजूचे काय म्हणतील याकडे दुर्लक्ष केल. आणि याला फळ मिळाल. जानेवारीच्या मध्यावर पहिली भाजी मिळाली आणि सगळ भरून पावलं. सगळा आठवडा रोज दोन्ही वेळेला भाजी मिळाली. तीही वेगवेगळी. बाजारातून पण फार काही आणावं लागल नाही.

 

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्याच्या सातपुडा भागातील ६० कुटुंबांनी हा प्रयोग सुरु केला २०१५ मध्ये. हिवाळ्यात आपल्याच परसात भाजी उगवायची. भाजीची बाग – परसबाग करायची. याला पाणी कस द्यायच ? हा मोठा प्रश्न. पण एकलव्य संस्थेने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मदतीने नवीन ड्रीप किट दिले होते. राहीलं फक्त कष्ट करायचे. त्याला तर हे परिवार विशेषतः या महिला कुठच मागे नव्हत्या.

 

यातून सुरु झाला स्वतःची भाजी स्वतः उगवण्याचा प्रवास. अडचणी आल्या. गाई-बकऱ्या घुसल्या, कोंबड्यानी उकरल रोग पडले तरी त्या मागे हटल्या नाहीत. यातून मार्ग काढून पाण्याची सोय करत त्या लढत राहिल्या. ज्यांनी कच खाल्ली ते मागे पडले. काहीना परिस्थितीने मजुरी साठी बाहेर जावे लागले. पण ज्या राहिल्या त्यांनी हिंमत सोडली नाही. आणि बघताबघता ४५ घरात पावसाळ्या नंतरचे काही महिने घरची भाजी मिळाली.      

 

परसात भाजी करायच छोटा ड्रीप हे या सगळ्या बदलात महत्वाचा होता. नंदुरबारच्या कृषि विज्ञान केंद्राने अगदी परसात येऊन प्रशिक्षण दिल. एकलव्य संस्थेनी त्याचा पाठपुरावा केला. मदत केली. काय आहे हे ड्रीप तंत्रज्ञान? रॉकेट सायन्स? नाही हो? अगदी सोप. याला वीज पण लागत नाही.

 

परसात जमिनीवर वाफे करायचे, त्यावर आडव्या उभ्या विशिष्ट आकाराच्या प्लास्टिकच्या नळ्या पसरायच्या. त्या एका पाणपिशवीला  किंवा ड्रम ला जोडायच्या. मग या वाफ्यामध्ये बियाण लावायचं. त्याला आडोसा करायचा. हो, लक्ष ठेवावं लागत मात्र. पण ते घरातलं कोणीही करू शकत. किती भाजी मिळाली? तंतोतंत नाही सांगता येणार पण १०-१५ किलो घरटी दर महिन्याला मिळाली,. काहीना कांदे मिळाले चांगले ६ महिने पुरतील एवढे. वांगे, टोम्याटो सारखे होतेच जोडीला कोथिंबीर, मेथी पण होती. पावटे, वाल अश्या वेळ वर्गीय भाज्यापण होत्या. एवढी विकत आणण हे दिवास्वप्नच असायच. परत मिळाली तिही आपल्याच परसात.  लांब शेतात पण जायची गरज पडली नाही. अजून नीट नियोजन केल तर विकता पण येईल बाजारात. या एकदा आल्या की देतच राहतात झोळी भरून. या वेगवेगळ्या भाज्या तून मिळतो जेवणाचा आनंद आणि शरीराला गरजेची जीवनसत्व. जोडीला जंगलातल्या रानभाज्या आहेतच, अगदी कमी लागणाऱ्या पण अति गरजेच्या जीवनसत्वानी भरलेल्या.



 

हे जितक लिहा – वाचायला सोप वाटतं तेवढ करायला पण आहे. बस एकदा ठरवलं पाहिजे. ड्रीप किट मिळवण हा एक प्रश्न आहे. पण गटानी मागणी केली तर कृषि केंद्र वाले भाऊ आणून देतात. अगदी नावाजलल्या ड्रीप कंपन्यांच पण मिळत. बर या सगळ्याचा खर्च सगळा मिळून ७०० – १००० रुपय प्रति घरटी. तो तर पहिल्या वर्षात वसूल होतो. मग हे किट ४ – ५ वर्षं तरी टिकत. बोनसच की.

शहरातील गच्चीत/ बाल्कनीत पण जमेल हे. तेवढा उत्साह हवा मात्र. कुपोषणा विषयी आपण कायच ऐकतो. कळवळतो सुद्धा. पण या परसबागेच्या रूपाने आपल्याला सुपोषणाच्या प्रसार करण्याच्या कामात खारीचा वाटा उचलता येईल . आपल्या वनवासी – जनजाती बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून या परसबागेची भेट देता येईल. उणीपुरी १००० रु किंमत आहे एका परसबागेची. त्यातून एका घराच्या फक्त भाजीचाच प्रश्न सुटणार नाहीये तर कुपोषणसारख्या मोठ्या प्रश्नाच्या मुळाशी पण जाता येईल. योग्य प्रमाणात जीवनसत्व न मिळणे हे एक प्रमुख कारण आहे. या भाज्या ही कमतरता दूर करतील. मग जे इतर ऊपचार आहेत ते सुद्धा अंगाला लागतील. मग आहे का कोणी तयार आपल्या बहिणींना एक नव आयुष्य  द्यायला.  यासाठी योजक ने महाराष्ट्राच्या वनवासी भागात स्वयंसेवी संस्थांचे जाळे तयार केले आहेत. याकामात त्यांनी सुरुवात पण केली आहे. आपली मदत त्यांचा उत्साह वाढवेल.


संपर्क – कपिल सहस्रबुद्धे
9822882011
kapil@yojak.org.in

 

  

 

कपिल रमेश सहस्रबुद्धे

कपिल सहस्रबुद्धे यांचे पर्यावरण शास्त्र पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. तसेच पत्रकारीतेचा डिप्लोमादेखील त्यांनी केला आहे. ते धारणाक्षम विकास विषयाचे अध्ययन करतात. त्याचप्रमाणे योजक संस्थेच्या माध्यमातून भारतीय विकास चिंतनाचा प्रसार करणे व त्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर एकत्रित कार्यक्रम राबविण्यामधे त्यांचा सहभाग असतो.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121