नाद बागेश्री - प्राजक्त माझा वेगळा

    30-Aug-2017
Total Views | 12


 

आयुष्याच्या प्रत्येक वेगवेगळ्या वळणावर प्राजक्ताचं झाड मला नेहमी भेटत आलंय. ‘ ती फुलराणी ‘ ही कविता आपण शाळेत पण शिकतो आणि पदवी परीक्षेसाठीही शिकतो. ती जशी, शब्द तेच असूनही आशय गर्भ होत जाते ना! तसंच  प्राजक्ताचं झाड मला उमगत गेलंय प्रत्येक टप्प्यावर!

फुलपाखरी वयात त्याच्याकडे बघताना जे वाटायचं ते स्वाभाविक पणे  एक कविता होऊन उतरलं –

 

ते फूल पाहता शुभ्र पारिजाताचे, हे नमते मस्तक मलाच नकळत माझे

भगव्या वृत्तीच्या आधारावर फुलल्या, निष्कलंक या पावित्र्याच्या पाकळ्या

साक्षीने चंद्राच्या फुलते ना फुलते, तो वरी जनास्तव धरणीवर झेपवते

निर्व्याज त्याग, जाणीवही त्याला नाही, हव्यास कीर्तीचा नाही गन्धातुनही

हे फूल भासते रूप बालयोग्याचे, अन म्हणून नमते मस्तक नकळत माझे

ते फूल पाहता शुभ्र पारिजाताचे, ते फूल पाहता शुभ्र पारिजाताचे.

 

बालयोग्याचे रूप भासलेल्या त्या फुलांची पखरण दारात गालीचा अंथरायची पण त्याच्यावर पाऊल ठेवायला मन धजायचं नाही. वंदनीय प्राजक्ताचं ते रूप होतं.

 

संसारी झाल्यावर, त्या रामरगाड्यात स्वतः चं अस्तित्वच नाहीसं होतंय कि काय अशी शंका येऊन खूप अस्वस्थता यायची. अशा वेळी ‘ उमललेली फुलं ज्यांना हवी असतील त्यांनी यावं आणि तोडावी ‘अशा वृत्तीच्या सर्व झाडांमध्ये, स्वतः च अलगदपणे अंगणाच्या ओंजळीत, सर्वांसाठी आपल्या फुलांची उधळण करणारा प्राजक्त, मला माझ्या खूप जवळचा वाटायचा. सर्व फुललेली फुलं अर्पण करून, दुसऱ्या दिवशीच्या बहरासाठी तत्पर! निदान तेवढ्या क्षणापुरतं तरी मन शांत व्हायचं. प्रतिबिंब प्राजक्त होता तो.

 

आपण मानवाचे पुत्र म्हणून पराधीनतेचा अनुभव आला. जीवनाला प्रवास, पहेली, उंच सखल रस्ता अशा उपमा का देतात याचा थोडा थोडा प्रत्यय आलेल्या या वळणावर प्राजक्त पुन्हा भेटला. एका अनोख्या रूपात. नेहमी झाडाखाली उभे राहून, वरून खाली टप टप पडणारी त्याची फुले पाहिली होती, वेचली होती. यावेळी खाली लावलेल्या झाडाच्या बहरलेल्या फांद्या, पहिल्या मजल्यावरच्या माझ्या बाल्कनीत मस्त पसरल्या होत्या. फुले चक्क हातानी खुडता यायची! 

 

एकही चांदणी दिसत नसलेल्या, तिन्ही सांजेच्या आकाशात, थोडासा अंधार होताक्षणी जसं चांदणं फुलत, तसंच रात्र पडू लागली की हळू हळू प्राजक्त, चांदण फुलांनी बहरून जायचा, पानं दिसायचीच नाहीत. जशा विस्मृतीत गेलेल्या कित्येक सुगंधी आठवणी अचानक आपल्याला आठवतात आणि मनाचं आकाश त्या स्मृतींच्या चांदण्यांनी व्यापून जातं! स्मृतीपुष्प प्राजक्त!

 

झिमझिम पडणाऱ्या पावसात प्राजक्ताची पानं चिंब चिंब होतात आणि जाणवतं, प्राजक्ताची फुले देठातून सुटली तर आहेत पण ओल्या पानांवर चिकटून बसली आहेत. झाडानं त्यांना सोडलंय पण पानांनी धरून ठेवलंय! नको असलेल्या दुःखद आठवणी डोक्यातून, विचारांमधून काढून टाकल्या तरी मनाच्या पानांवर अशाच चिकटून बसतात जशी ही फुलं! मग वार्याच्या झुळुका येतात, पानांवरून घसरून काही फुलं खाली पडतात, काही तरीसुद्धा पडत नाहीत, हट्टी आठवणींसारखी, मग वार्याचा वेग वाढतो, वाढतच रहातो पानावर चिकटलेलं प्रत्येक फूल पडेपर्यंत!

 

मनाला चिकटलेल्या आठवणींसाठीही असाच  एक वारा लागतो. वारा नाहीच आला तर मीच प्राजक्त हलवते गदागदा, सर्व फुलं खालीपडेपर्यंत. नवी फुले येण्यासाठी जुन्या फुलांनी झाड सोडावंच लागतं.

 

या वळणावर प्राजक्त माझा गुरु आहे आणि सखाही. घराभोवती  जागा नव्हती तेंव्हा कुंडीत लावला होता त्याला आणि मोसम नसताना सुद्धा फुले आली होती. पुन्हा काळ्याशार मातीत लावलाय तो. मला खात्री आहे कि या पुढेही मला तो भेटत राहणार आहे. मला उत्सुकता आहे त्याच्या पुढच्या भूमिकेची, माझ्याशी जुळणाऱ्या नवीन नात्याची!  मी प्रतीक्षा करतीये आणि मला माहिती आहे की प्राजक्त मला निराश नाही करणार!

 

– शुभांगी पुरोहित

अग्रलेख
जरुर वाचा
जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरलेल्या शहरी माओवाद आणि नक्षली चळवळीविरोधात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ प्रस्तावित आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आणि प्रस्तावदेखील राज्य सरकारच्यावतीने सार्वजनिक स्वरूपात मागवण्यात आले असून, त्या सूचनांचाही कायद्याचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी विचार केला जाईल. परंतु, या कायद्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्मिती नक्षली संघटनांकडून सुरु आहे. त्यानिमित्ताने या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आणि कायद्याविरोधातील अपप्रचाराचे षड्यंत्र, याविषयी ‘विवेक विचार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121