नाद बागेश्री - ऐश्वर्य

    16-Aug-2017
Total Views | 11

 


मला बागेविषयी केव्हा आवड आणि आपुलकी निर्माण झाली हे नक्की नाही सांगता येणार. थोडा विचार केल्यानंतर हे मात्र जाणवलं की, अश्या बऱ्याच गोष्टी आहेत.. लहानपणी घडलेल्या, अनुभवलेल्या, बघितलेल्या की ज्याच्यामुळे निसर्ग, बाग, बागकाम याविषयी कमालीची घट्ट आवड मात्र निर्माण झाली.

लहानपणीची गोष्ट; मी तिसरी किंवा चौथीत असेन. आम्ही भाड्याच्या घरात राहत असू. घराच्या बाजूला एक छोटीशी बाग होती. बाग कमी आणि काही झाडे, फुल झाडंच खरं तर! शाळेतून आल्यावर अभ्यास झाल्यावर वेळ घालवायला म्हणून मी आपला झाडांजवळ फतकल घालून बसायचो. मातीत खेळ, खोदकाम कर असे उद्योग चालायचे. असेच एकदा दोन झाडांमध्ये खोदताना काही मोठ्या आणि सुबक बिट्ट्या सापडल्या. खजिनाच जणू हाती लागला. मग काय बिट्ट्या जमवण्याचा छंदच जडला आणि कोणाला त्या सापडू नयेत म्हणून बागेतील झाडांजवळ बीळ करून त्या पुरायची सोय केली. बिट्ट्या लपवायला यापेक्षा उत्तम जागा कोणती असणार!!

अशीच काहीशी दुसरी आठवण म्हणजे उन्हाळ्यात जमवलेल्या आंब्याच्या कोयी. त्या वेळेला आमच्या आसपास बैठी घरच जास्त. प्रत्येकाच्या अंगणी आंब्याची आणि इतर फुलझाडे मुबलक, घरात आंब्याचा रस तर रोज ठरलेला. गोट्या जश्या जमवायच्या तश्याच आम्ही मुलांनी कोयी जमवण्याचा उद्योग सुरु केला. अगदी घरच्यांचा विरोध न जुमानता!! नुसत्या जमावायच्याच नाहीत तर गोट्यांसारख्या खेळून दुसऱ्यांजवळच्या कोयी जिंकायच्या ! किती आनंदाचे आणि मस्तीचे दिवस होते ते. अश्या ह्या छंदांमुळे निसर्गाची, बागेची, फूल झाडांची ओळख होत गेली आणि आपुलकी निर्माण झाली.

घरासमोरील बाग आणि झाडे घराची एक वेगळीच ओळख निर्माण करतात नाही? माझे बालपण भंडारा, नागपूर अश्या शहरांमध्ये गेलं असल्याने बैठी स्वतंत्र घरं आणि त्यात फुलणाऱ्या बागा ह्यांनी खूप आनंद दिला. मला अजूनही आमच्या भंडाऱ्याच्या घरासमोर लावलेला संक्रांत वेल आठवतो. हिवाळ्यात फुलणारा तो वेल अबोली रंगाच्या फुलांनी बहरलेला असायचा. दुरूनच आमच्या घराची ओळख पटवणारा आणि आमच्या घराचं सौन्दर्य वाढवणारा. तीच ओळख नागपूरच्या घराची. ओळीने लावलेली अशोकाची झाडे ! दुरून आपले घर दर्शवणारी. एक पक्की ओळख.


बागेविषयीच्या अश्या काही घटना कालानुरूप जागेनुसार घडत असतात आणि म्हणूनच वेगळेपण जपणाऱ्या असतात. आठवणींच्या खजिन्यात एक वेगळा कप्पा निर्माण करतात. कितीही आवडणारा असला तरी तो संक्रांत वेल दुसऱ्या कुठल्याही घरी लागला नाही. भंडाऱ्याच्या घराची गोड़ आठवण म्हणून समरणात राहिला. असो..

पुढे नोकरीनिमित्त अमेरिकेत जाण्याची आणि काही काळ तिथे राहण्याची संधी मिळाली. तेथील वास्तव्यात बागकामाची आवड असणाऱ्या अनेक लोकांच्या ओळखी झाल्या. असही लक्षात आले की, बागकाम हा अमेरिकन लोकांचा आणि भारतातून तेथे स्थायिक झालेल्यांचा अगदी आवडता छंद आहे. घरी आलेल्या पाहुण्याला आपल्या बागेविषयीचा, झाडांविषयीचा तपशील किंवा कुंडली अगदी मायेने सांगणारे लोक बघितले की मी पण नकळत माझ्या आठवणींमध्ये रमून जायचो.

पुण्यात स्थायिक झाल्यावर बैठी घरं सुटली आणि अपार्टमेंट हेच घर बनलं. तरीही गच्ची मध्ये छोटीशी का होईना बाग असावी ही मनीषा कायम राहिली. दहा बारा कुंड्या मावतील एव्हढीशी ती जागा शोभेच्या झाडांनी, हिरवळ राखणाऱ्या झाडांनी सजली. नुसतं त्या झाडांच्या सहवासात काहीही न करता वेळ घालवणे किंवा निवांत वेळी कॉफी घेत गप्पा मारणं ह्यात काय सुख आहे... अहाहा !!!

दिवसेंदिवस उंच इमारतींच्या गराड्यात; माणसांचे पाय जमिनीपासून दूर जाताहेत अश्या काळात एखादं बैठे स्वतंत्र घर असणं सभोवताली छोटी बाग असणे आणि एखादी बारमाही पाण्याची विहीर असणे या सारखं दुसरे ऐश्वर्य नाही..

 

- आशिष जोशी

 

 

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121