नाद बागेश्री - Trust Bin - कचरा ते खत

    05-Jul-2017
Total Views | 22

 

प्रथमच घरच्या घरी खत तयार केलं ते Trust Bin आणून. घरातल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करणे इतके सोपे असेल असे वाटलेच नव्हते.

Trust Bin चे दोन डबे विकत आणले. आपला रोजचा हिरवा कचरा, अंड्यांची टरफलं, चहाचा गाळ ह्यात टाकला. पहिला डबा भरल्यावर तो बाजूला ठेवाला आणि कचरा दुसऱ्या डब्यात टाकलायला सुरवात केली. एका आठवड्यानंतर, पहिल्या डब्यातील आंबलेला कचरा मातीमध्ये मिसळला. १५ दिवसांनी खत तयार झाले!

लहान घरात देखील वापरायला अतिशय सुटसुटी. ओल्या कचऱ्याचे रूपांतर उत्तम काळ्या खतात होते! या प्रकारे खत तयार करायचे असल्यास, ही माहिती वाचकांसाठी उपयुक्त ठरेल असे वाटते. जरूर करून पहा.

 

खतासाठी डबे कुठून घेतले?

www.trustbasket.com या वेबसाईट वर हे डबे विकत मिळतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येप्रमाणे १, २ किंवा ३ डब्यांचे संच निवडावा. सोबत खत निर्मितीसाठी आवश्यक ते साहित्यही दिलं जातं. डब्यांच्या किंमतीसकट संपूर्ण माहिती त्या वेबसाईटवर मिळू शकेल. मला दोन डब्यांचा संच पुरेसा होता म्हणून मी तोच विकत घेतला.

अशाच प्रकारचे Bokashi Bin सुद्धा मिळते, जे घरातल्या ओल्या कचऱ्याचे खातात रूपांतर करण्यासाठी वापरू शकतो.  

 

हे डबे कसे वापरायचे?

डब्याच्या तळाशी थोडा गुळ टाकायचा. वर जाळी ठेवायची. आपला नेहमीचा हिरवा कचरा ह्यात टाकायचा. त्यावर थोडी कंपोस्ट पावडर टाकायची. दुसऱ्या दिवशी पण कचरा टाकला की वर थोडी पावडर असे करत डबा भरला, की तो बाजूला ठेवायचा. मग दुसऱ्या डब्यामध्ये कचरा टाकायला सुरवात करायची.

या दरम्यान पहिल्या डब्याच्या तळाशी कचऱ्यातलं पाणी, बाष्प गोळा होत राहातं. ते पाणी नळाद्वारे एका भांड्यात घेऊन त्यात आणखी तीन भाग पाणी मिसळून ते पाणी झाडांना घालावं. जर झाडांना घालायचं नसेल तर बाथरूम, शौचालय स्वच्छ करताना आधी ओतून टाकावं.

दुसरा डबा भरला, की पहिल्या डब्यातील मिश्रण मातीत घालून झाकून ठेवायचे. १५ दिवसात खत तयार होते.

डबा कसा वापरावा ह्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका सोबत मिळते.

शिवाय हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरू शकतो. 

 

 

ह्या डब्यात कोणकोणता कचरा टाकता येईल?

कोणताही हिरवा कचरा टाकता येईल. त्याचबरोबर निर्माल्य, भाज्यांची साले, देठे, अंड्यांची टरफलं, चहाचा गाळ, हाडे टाकता येतात. अंड्यांची टरफलं चुरून टाकावीत. नारळाची किशी चालेल पण करवंट्या टाकू नयेत. तसंच ताक, आमटी, आंबलेलं वरण ह्यासारखे पूर्ण द्रवरूपी पदार्थ टाकू नयेत. मी ड्ब्यामध्ये हिरवा कचरा, अंड्यांची टरफलं व चहाचा गाळ टाकला होता. कलिंगडाची, केळ्याची सालं हा कचरा तुकडे करून टाकावा असं पुस्तिकेत लिहिलेलं आहे पण मी तुकडे न करताच साली टाकल्या होत्या. त्यांचंही व्यवस्थित विघटन झालं. अंड्यांची टरफल मात्र वेळ घेतात म्हणून चुरा करणंच योग्य!

 

ह्या कचऱ्याला वास येतो का?

अर्थातच येतो! शेवटी ही आंबवण्याची क्रिया आहे. इडलीचं एक दिवसाचं पीठ सुद्धा आंबलेलं असतं म्हणून त्याला वास येतो. आपण तर कचरा आंबवतो, मग त्याला वास हा येणारच. फक्त डब्याला झाकण लावलेलं असल्याने तो वास घरभर पसरत नाही. डबा वारंवार न उघडता फक्त कचरा टाकण्यापुरताच उघडल्यास कचरा लवकर आंबतो. डबा खतासाठी रिकामा करतानाही वास येतोच. मात्र १५ दिवसांनी खत तयार झालं की त्याला अजिबात वास येत नाही.

 

असा डबा विकत न घेता घरच्याघरी तयार करू शकतो का?

साध्या कचऱ्याच्या डब्याचाही उपयोग खताच्या डब्यासारखा करता येऊ शकतो. ह्या डब्याची रचना इडलीपात्र आणि पाण्याचा माठ / टाकी यांसारखे आहे. पाण्याच्या माठाला लावून मिळतो तसा नळ डब्याला तळाशी नळ लावून घ्यायचा. माठ, हंडा किंवा कळशीखाली जसा स्टेनलेस स्टीलचा गाडा ठेवतो तसा गाडा डब्याच्या आत ठेवून त्यावर स्टिलची चाळण डब्याच्या आत लागून बसेल अशी ठेवायची. बाकी कृती आधी प्रमाणेच.

फक्त composting करण्यासाठी लागणारी Bokashi पावडर विकत आणावी लागते.

 

ह्या खताचे गांडूळखतामध्ये रूपांतर करता येईल का?

होय. मात्र ह्यात गांडूळ सोडण्यापूर्वी किंवा आयतं वर्मिकल्चर मिसळण्यापूर्वी हे खत निदान चार-पाच दिवस उघड्यावर राहू द्यावं व दिवसातून दोन वेळा तरी ढवळून वरखाली करावं म्हणजे खतामध्ये असलेले विषारी वायू मोकळी हवा मिळाल्याने नाहीसे होतील. अन्यथा विषारी वायूंमुळे गांडूळ मरू शकतील.

मी तयार केलेलं खत कोरडं नसून ते किंचीत दमट आहे. खतावर माश्या बसू नयेत म्हणून एक टोपली झाकली आहे.

ह्या कामासाठी मी जी माती वापरली ती स्थानिक नर्सरीमधून न आणता नर्सरी लाईव्ह (nurserylive.com) ह्या वेबसाईटवरून मागवली होती. इथून १-१ किलो मातीचे स्वतंत्र पुडे मिळतात. शिवाय ह्यात मोठमोठाले दगड टाकून उगाच वजन वाढवलेलं नसतं. त्यामुळे वापरायला सुटसुटीत पडतं आणि मोजलेल्या पैशांचंही चीज होतं.

वरील लेखामध्ये दिलेल्या कुठल्याही वेबसाईटचं मी प्रतिनिधीत्व करत नाही अथवा जाहिरातही करत नाही. हा संपूर्ण लेख स्वानुभवावर आधारीत असल्याने आवश्यक तिथे संदर्भ म्हणून साईट्सची माहिती दिलेली आहे.

- कांचन कराई

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121