नाद बागेश्री - इनोरा

    27-Jul-2017
Total Views | 6


नाद बागेश्री या सदराच्या निमित्ताने पर्यावरण प्रेमींशी संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळाली. काळे, ऑरगॅनिक गार्डन ग्रुपच्या सदस्य पंचपोर मॅडम, बापट काका, शहरात जंगल वसवणाऱ्या नारगोळकर मॅडम अश्या व्यक्तींची आपापल्या स्तरावर निसर्गाचा समतोल राखण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. या मंडळींबरोबरच पुर्णम इको व्हिजन, डॉ. कर्वे मॅडमची समुचित एन्विरोटेक या सारख्या मोठ्या संस्था पर्यावरण पूरक उत्पादनांची निर्मिती करण्यात अग्रेसर आहेत. या मध्ये "इनोरा" (इन्स्टिटयूट ऑफ नॅचरल ऑरगॅनिक ऍग्रीकल्चर ) चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.

डॉ. आर. टी. दोशी आणि एम. आर. भिडे यांनी स्थापन केलेल्या ह्या संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तृत आहे. इनोराने वर्मीकंपोस्टिंगचा उपक्रम खडकी , सिकंदराबाद, बेळगाव, बंगलोर येथील मिलिटरी डेअरी फार्ममध्ये सुरु केला.

इनोरानी दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसाठी पहिल वर्मीकंपोस्टिंग युनिट उभारलं जे दिवसाला गार्डन आणि स्वयंपाकघरातला १०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया करू शकते. आत्तापर्यंत इनोराने ४५ NGO मध्ये कसदार जैविक खते व कीटकनाशके यांच्या उत्पादनाविषयी मार्गदर्शन केले आहे. तसचं वर्मीकंपोस्टिंग हे प्रमुख उद्धिष्ट ठेवून ८००० शेतकऱ्यांसाठी ४० मार्गदर्शन सत्र आयोजित केली आहेत.

इनोराने निर्माल्यावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम चिंचवड आणि चतुःशृंगी देवस्थान येथे चालू केला. आदिवासी भागांपासून ते शाळा कॉलेज पर्यंत सर्व थरातील लोकांसाठी कचरा व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करणारे वेगवेगळे उपक्रम राबवले. तसेच पुणे महानगर पालिकेच्या १२ बागांमधल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी इनोराने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. 


इन्फोसिस, कोका कोला, पेप्सिको, गोदावरी शुगर्स, पांडुरंग सहकारी सहकार कारखाना येथे इनोराची औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया करणारी युनिट्स सध्या कार्यरत आहेत.. इनोराच्या निरनिराळ्या उत्पादनांपैकी कंपोस्टर प्लांटर हे घराघरात वापरता येण्याजोगे युनिट आहे. साधारण २०० लीटरचा ड्रम किंवा कुठल्याही मोठ्या प्लास्टिक ड्रमचा पुनर्वापर आपण कंपोस्टिंगसाठी करू शकतो.. याला जागा कमी लागते, कमीतकमी देखभाल खर्च येतो. स्वयंपाक घरातला रोजचा १ किलो कचरा यात सामावला जातो. ड्रमला वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेल्या छिद्रांमुळे ओल्या कचऱ्यातील अतिरिक्त पाणी वाहून जाते. हे पाणी गोळा करण्यासाठी ड्रम खाली ट्रे ठेवावा. हे पाणी सुद्धा झाडांना घालता येते. दुग्धजन्य पदार्थ, जास्ती पाणी असलेले अन्न, कणिक, प्लास्टिक इ यामध्ये टाकू नये. यामध्ये ५ - ६ दिवसातून एकदा इनोराचे फक्त १ चमचाभर डिक्पोझिशन कल्चर टाकले तरी पुरते. हा कंपोस्टर सावलीच्या ठिकाणी व सारखा हलवावा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावा.


या कंपोस्टरमध्ये निरनिराळ्या औषधी वनस्पती, गवती चहा, लिंबू, चिकू, पपई अशी झाडे लावता येतात. कमीत कमी जागेत खत निर्मितीचा उत्तम पर्यंत आपल्याला इनोराने दिला आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर प्रत्येक जण पर्यावरणाचा समतोल राखण्यात आपापला खारीचा वाटा उचलू शकेल.

 

अधिक माहिती साठी : www.inoraindia.com

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121