गोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवन येथे गोंदिया जिल्हा आढावा बैठकीत ‘वेलकम टू गोंदिया’-२०१८ या नववर्षाच्या ‘टेबल कॅलेंडर’चे प्रकाशन केले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा पर्यटन समितीच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या टेबल कॅलेंडरमध्ये जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थस्थळांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. यामध्ये काळविटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मानेगाव, आदिवासींचे दैवत असलेली कचारगड गुफा, श्रमाचे प्रतिक असलेले अर्धनारेश्वरालय मंदीर, सारस व स्थलांतरीत व विदेशी पक्षांचा अधिवास असलेला परसवाडा तलाव, वन पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हाजराफॉल धबधबा, कामठा येथील लहरीबाबाचे देवस्थान, निसर्गरम्य नवेगाव बांध, इटियाडोह प्रकल्प, चूलबंद प्रकल्प, बोदलकसा प्रकल्प, चोरखमारा प्रकल्प, नागरा येथील प्राचीन मंदीर, नागझिरा अभयारण्य, राज्यातील एकमेव तिबेटीयन वसाहत असलेले तिबेटीयन कॅम्प येथील बुद्ध विहार, मांडोदेवी देवस्थान, प्रतापगड येथील महादेव मंदीर यांचा या कॅलेंडरमध्ये सहचित्र समावेश करण्यात आला आहे. सचित्राखाली गोंदियापासूनचे अंतर दर्शविण्यात आले आहे. सन २०१८ या वर्षातील १२ महिन्यात येणाऱ्या महिनावार शासकीय सुट्टयासुद्धा नमूद करण्यात आल्या आहेत.