नवी दिल्ली: ( India positive about bilateral trade deal with USA S. Jaishankar ) “भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी केले आहे.
“भारताची रणनीती अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार पूर्ण करण्यासाठी सहभागी होण्याची आहे. आमची रणनीती अगदी स्पष्ट आहे. भारताने या मुद्द्यांवर ट्रम्प प्रशासनाशी आधीच चर्चेचा निर्णय घेतला होता. या वर्षाच्या अखेरीस द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करण्याचे आम्ही मान्य केले आहे,” असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले.
ते म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दुसर्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारत हा एकमेव देश आहे, ज्याने तत्त्वतः अशा प्रकारचा करार केला आहे. प्रत्येक देशावर कर आकारला जात असल्याने, प्रत्येक देश अमेरिकेशी व्यवहार करण्यासाठी स्वतःची रणनीती आखत आहेत. भारताच्या धोरणाचे एक ध्येय आहे, जे द्विपक्षीय व्यापार करार करून या परिस्थितीला प्रत्यक्षात सामोरे जाणे शक्य आहे का, हे पाहाणे आहे. त्यानुसार अमेरिकेसोबत द्विपक्षीय कराराची प्रक्रिया सुरू आह,” असेही त्यांनी नमूद केले आहे.