कबड्डीची आवड, मात्र आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक पाठबळ न मिळाल्याने, त्यांची संधी हुकली. पण, तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. अशा या शासकीय सेवेत आपल्या कर्तृत्वातून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय गिरविणार्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याविषयी...
हेमा मुंबरकर यांचा जन्म मुंबईतला. त्यांचे बालपण धारावीत गेले. त्यांचे शालेय शिक्षण सायन येथील साधना विद्यालयात झाले, तर रुपारेल महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. महाविद्यालयीन शिक्षणात अभिनेत्री निशिगंधा वाड आणि सुकन्या कुलकर्णी यांची त्यांना मोलाची साथ लाभली. त्यांचीच पुस्तके वाचून हेमा यांनी अभ्यास करत पदवीपर्यंतचे यश गाठले. आईवडील, पाच बहिणी आणि एक भाऊ असे त्यांचे कुटुंब. त्यांचे वडील नरसिंग शिंदे हे पोस्टमन होते, तर आई राधा यांनी शिक्षिका म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि मुख्याध्यापिका पदावरून त्या निवृत्त झाल्या. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. हेमा या भावंडांमध्ये मोठ्या असल्याने कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी साहजिकच त्यांच्यावर आली. हेमा यांना शिक्षणाची आवड होती, पण त्यांनी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खासगी शिकवणीवर्ग सुरू केले. या शिकवणीतून येणार्या पैशातील काही भाग त्या आपल्या शिक्षणासाठी वापरत असत.
बारावीनंतर त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यामुळे त्यांना मंत्रालयात काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी दोन वर्षे कामही केले. दुसर्या बाजूला त्यांचे पदवी शिक्षणही सुरू होते. हेमा यांचा प्रवास जितका संघर्षमय तितकाच प्रेरणादायीही. दरम्यानच्या काळात कडोंमपामध्ये भरतीची जाहिरात त्यांच्या नजरेस पडली. आईवडील आणि मैत्रिणींच्या आग्रहाखातर हेमा यांनी मुलाखत दिली. कल्याणला जाण्यासाठी त्यांना रेल्वेचे तिकीटही मैत्रिणीनेच काढून दिले होते. ही नोकरी मिळेल, अशी त्यांना त्यावेळी खात्री नव्हती. संघर्षमय जीवनात एखादी हवेची झुळुक येऊन सारे काही बदलून जावे, तसे हेमा यांचे आयुष्यही पुरते बदलून गेले. हेमा यांनी महानगरपालिकेत लिपिक या पदावरून काम करण्यास सुरुवात करून आता त्या साहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत.
साहाय्यक आयुक्तपदावर काम करताना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना अनेकदा अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. अनेकदा लोक रस्ता खोदून ठेवतात, तर कधी धमक्याही देतात. अनेकदा कारवाईला गेल्यानंतर महिला जेसीबी समोर उभ्या राहतात आणि कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. वसार, भाल यांसारख्या गावात कोणतेही अधिकारी कारवाईसाठी धजावत नव्हते. पण, त्या भागातदेखील हेमा यांनी जाऊन कारवाई केली आहे. एकदा कारवाईसाठी गेल्यानंतर विळा काढण्यात आला होता. पण, हेमा या घाबरून गाडीत जाऊन बसल्या नाहीत. त्यांनी त्या प्रसंगाला तोंड दिले आणि ती कारवाई करूनच त्या परतल्या. हेमा यांनी साहाय्यक आयुक्त पदावर काम करावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांना तशी सूचनाही मिळाली. ती सूचना घेऊन त्या वडिलांकडे गेल्या. पण, त्या घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांचे वडील गेले होते. काम करताना अनेक अडचणी येत असल्या, तरी माझे वडील मला पाहत आहेत. त्याचा विचार करून मी काम करत असल्याचे हेमा सांगतात.
आतापर्यंत जे यश मिळविले आहे, त्यांचे श्रेय त्या आपल्या आई-वडील, भाऊ उमेश, पती राजपाल, मुलगा सतीश आणि सून ऐश्वर्या यांना देतात. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव असल्याचे हेमा आवर्जून सांगतात. आपण त्यांची मानस कन्या असून विवाहाच्या वेळी कन्यादान देखील पाटील दांपत्याने केले होते. हेमा यांना कबड्डीची आवड होती. त्यात त्यांना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे इच्छा होती. तशी संधीही त्यांना आली. पण, तो काळ वेगळा होता. त्यावेळी हेमा यांना घरापासून लांब जाण्याची परवानगी कुटुंबीयांनी दिली नाही आणि कबड्डीत राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची त्यांची संधी हुकली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे. त्यांचा आम्हालाही पाठिंबा आहे. त्यामुळेच आम्ही हे काम सक्षमपणे करत आहोत. आतापर्यंत जे काम केले आहे, त्यावर मी समाधानी असल्याचे हेमा सांगतात. “आयुष्यात एक संधी हुकली म्हणून खचून न जाता पुढील संधी प्राप्त करण्यासाठी झटत राहा. शिकायला आणि पुढे जायला वयाची अट बाळगू नका,” असा संदेश ‘जागतिक महिला दिना’निमित्ताने हेमा महिलावर्गाला देतात.