मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन!
07-Mar-2025
Total Views | 43
मुंबई : मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे ९४ व्या वर्षी निधन झाले. प्रेमाताई नावाने ओळखल्या जाणाऱ्या साखरदांडे या प्रसिद्ध संगीत कंपनी हिज मास्टर्स व्हॉइस (एचएमव्ही) चे वसंतराव कामेरकर यांची कन्या होत्या. अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबातच होता—त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते याही अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या.
प्रेमा साखरदांडे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत रंगभूमी, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत ठसा उमटवला. शिक्षण आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले. त्या मुंबईतील शारदा सदन शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर निवृत्त झाल्या. मात्र, अभिनयावरील त्यांचे प्रेम अखेरच्या दिवसांपर्यंत कायम राहिले.
त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. स्पेशल २६, द इम्पॉसिबल मर्डर, सावित्री बानो, मनन, माझे मान तुझे झाले, बेट, फुल ३ धमाल यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. तसेच प्रपंच या गाजलेल्या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. नाटक आणि जाहिरात क्षेत्रातही त्यांचा मोठा वाटा होता.
साखरदांडे यांचे संपूर्ण आयुष्य अभिनय आणि शिक्षणासाठी समर्पित होते. त्यांच्या कन्या क्षमा साखरदांडे यांनीही अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी आणि प्रतिभावान अभिनेत्री हरपली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!