व्यवस्थापनातील उच्चपदस्थांचे राजीनामे हे कंपन्यांच्या कामगिरीवर आणि एकूणच कार्यसंस्कृतीवर सर्वांगीण परिणाम करणारे ठरतात. विशेषकरुन ‘कोविड’ महामारीच्या काळात मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्यामुळे विविध कंपन्यांची अवस्था अधिक बिकट झाली होती. पण, सध्या अशा राजीनाम्यांची संख्या घटलेली दिसून येते. त्यानिमित्ताने व्यवस्थापन क्षेत्रातील मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्याचे प्रमाण आणि त्याचे परिणाम यांचा आढावा घेणारा हा लेख...
खासगी कंपन्यांसह कॉर्पोरेट क्षेत्रात सर्वोच्च स्थानी म्हणजेच, मुख्याधिकारी म्हणून काम करणार्या उच्चपदस्थांचे राजीनामे व नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण ही बाब अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण असते. व्यवसाय-व्यवस्थापनापासून विभिन्न धोरणात्मक निर्णय व व्यावसायिक नियोजन, स्थिरता, आर्थिक प्रगती इत्यादीवर कंपनीचे संचालन करणार्या व्यक्तीच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयामुळे मोठे व दीर्घकालीन परिणाम होतात. बरेचदा एखाद्या कंपनीच्या मुख्याधिकार्यांमध्ये वारंवार बदल झाल्यामुळे अथवा बदल करावे लागण्याचा परिणाम संबंधित कंपनीच्या गुणांकन वा व्यावसायिक पत इत्यादींवर देखील होताना दिसतो. त्यामुळेच व्यावसायिक कंपन्यांच्या मुख्याधिकार्यांचे राजीनामे व त्यांचे नोकरी सोडून जाणे, ही बाब व्यावसायिक संदर्भात दुर्लक्षून चालत नाही.
या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांत प्रातिनिधिक व नमुना पातळीवर खासगी कंपन्यांच्या मुख्याधिकारी वा प्रबंध संचालक या पातळीवरील मंडळींच्या राजीनाम्याची आकडेवारी व त्यांचे प्रमाण, यांचा गेल्या पाच वर्षांतील उपलब्ध तपशीलांचा विचार महत्त्वाचा ठरतो.
यासंदर्भात प्रारंभीच नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, २०२० साली राष्ट्रीय शेअर बाजाराशी नोंदीकृत अशा २ हजार, ५२८ कंपन्यांपैकी ११७ कंपन्यांच्या प्रबंध संचालक वा तुलनात्मक पदावर काम करणार्या उच्चपदस्थांनी राजीनामा दिला होता. त्यानंंतरच्या वर्षी म्हणजेच २०२१ साली याच श्रेणीतील २ हजार, २३५ कंपन्यांच्या १४२ मुख्याधिकार्यांनी एका वर्षात राजीनामे दिले होते.
वरीलप्रमाणे नमूद केलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराशी संलग्न असणार्या कंपन्यांच्या मुख्याधिकार्यांनी राजीनामा देऊन नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण आणि गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
वर्ष संबंधित कंपन्या मुख्याधिकार्यांचे राजीनामे
२०१९ १,६९८ १२९
२०२० १,७५२ १०९
२०२१ १,८७४ ११३
२०२२ २,०२१ १४२
२०२३ २,२७५ १२९
२०२४ २,५२८ ११७
वरील प्रातिनिधीक स्वरूपाच्या आकडेवारी व तपशीलातून स्पष्ट होणारी बाब म्हणजे, २०२२ साली या कालावधीत कंपन्यांच्या मुख्याधिकार्यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. यामागे ‘कोरोना’दरम्यान झालेली व्यावसायिक स्थित्यंतरे व त्यादरम्यान झालेले सर्वांगीण बदल हे होते, असे पण स्पष्ट झाले.
याच अनुषंगाने उच्च व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे, प्रचलित वा निवृत्त कंपनी संचालक, व्यवस्थापन तज्ज्ञ, वित्तीय क्षेत्रातील प्रमुख वा विभिन्न विषयतज्ज्ञ व सल्लागार यांच्या मते एकूणच व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रावर ‘कोरोना’नंतर मोठे बदल झाले आहेत. या बदलांचे वेगवेगळे आयाम पुढे आले व त्याचे दूरगामी व्यावसायिक परिणाम होत गेले. याच बदलत्या वा बदलेल्या व्यवासायिक परिणामांचा एक भाग म्हणून ‘कोरोना’ दरम्यान वा त्यानंतरच्या काळातील कंपनी मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्यांकडे बघून त्याचा नव्या संदर्भात अभ्यास करता येईल.
कॉर्पोरेट-व्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ व ‘इन-गव्हर्न’चे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम सुब्रमणियन यांच्यानुसार, ‘कोरोना’नंतर व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रात अनपेक्षित व मोठे बदल झाले. यामध्ये व्यवस्थापन शैली, ग्राहकांची मानसिकता, व्यावसायिक चढ-उतार, व्यवस्थापकांची निर्णय क्षमता, बदलती जोखीम, व्यावसायिक अस्थिरता व वैयक्तिक मानसिकता या आणि अशा महत्त्वाच्या कारणांमुळे मध्यंतरीच्या काळात कंपन्यांच्या मुख्याधिकार्यांमध्ये बदल होणे अपरिहार्य होते व त्यांचे त्यादरम्यानचे राजीनामे त्याचाच परिपाक होता. मात्र, आता व्यवसाय-व्यवस्थापन दोन्ही स्थिरावले असल्याचे श्रीराम सुब्रमणियन यांनी स्पष्ट केले आहे.
वरील मजकूर व आकडेवारी ही राष्ट्रीय शेअर बाजाराशी संबंधित अशा कंपन्यांची असली तरी, ज्या कंपन्या राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदीकृत नाहीत, अशा कंपन्यांची परिस्थिती देखील थोड्या फार फरकाने अशीच आहे. यामध्ये तर काही मोठ्या व प्रस्थापित कंपन्यांचा देखील समावेश आहे. या कंपन्यांपैकी तर काही कंपन्या या परंपरागतरित्या परिवार नियंत्रित-संचालित असतात, हे विशेष. अर्थात, या कंपन्यांमधील अनुभव पण वेगळे नसतात. उच्च-व्यवस्थापन पातळीवर उमेदवारांची निवड करण्याचे काम करणार्या ‘रुसेल रेनॉल्ड्स असोसिएट्स’चे व्यवस्थापकीय संचालक पंकज अरोरा यांच्या मते, बदलत्या व्यवसायचक्र व उद्योगातील नवी गुंतवणूक यामुळे नव्या व मध्यम आकाराच्या कंपन्यांना व्यवसायवाढीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यांना प्रसंगी विदेशी कंपन्यांमध्ये संधी व आकर्षक पगार मिळत असल्याने आपल्याकडील अनेक प्रस्थापित कंपन्यांचे मुख्याधिकारी या कंपन्यांकडे वळणे स्वाभाविक ठरते.
‘ब्रिटानिया’चे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक विनीता बाली त्यांच्या अनुभवातून नमूद करतात की, बरेचदा विविध कंपन्यांच्या मुख्याधिकार्यांना विदेशी व्यवसाय, तंत्रज्ञान व गुंतवणूक असणार्या कंपन्यांचे विविध कारणांनी आकर्षण वाटते. त्यामुळेसुद्धा प्रस्थापित कंपन्यांचे मुख्याधिकारी अशा विशेष कारणांनी आपली प्रचलित नोकरी सोडून इतर कंपन्यांमध्ये जातात.
राष्ट्रीय शेअर बाजाराशी निगडित कंपन्यांच्या संदर्भात ‘कॉर्न फेरी’ या कंपन्यांमधील उच्चपदस्थ व मुख्याधिकारी यांच्या क्षेत्रात कार्यरत व्यवस्थापन सल्लागार कंपनीचे प्रमुख नवनीत सिंह यांच्या मते, कंपनी वा कॉर्पोरेट क्षेत्रात मुख्याधिकारी असणार्यांना पद, पैसा, प्रसिद्धी इत्यादी सर्व हवे असते. यासाठी अधिक परिश्रम व मोठी जोखीम घेण्याची त्यांची तयारी असते. या मंडळींचा सर्वसाधारणपणे वयोगट असा असतो की, ते त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या इच्छा व अपेक्षेनुरूप बदल सहजपणे करू शकतात. याची परिणिती अशा मुख्याधिकार्यांचे राजीनामे व नोकरी बदलण्यात व त्यासाठी राजीनामे देण्यात होते. मात्र, बरेचदा व विशेषत: वयाची चाळिशी ओलांडणारे उच्चपदस्थ व्यवस्थापक त्यांच्या आयुष्य व कारकिर्दीत स्थिरतेला व स्थैर्य आणि कामाच्या सुलभतेला प्राधान्य देतात. त्यामुळे ही मंडळी विचारपूर्वक नोकरी बदलतात वा नोकरी बदलण्याचे टाळतात. याकडे ‘कॉर्न फेरी’चे नवनीत सिंह यांनी नेमके लक्ष वेधले आहे. याचेच प्रत्यंतर अशा मुख्याधिकार्यांच्या वाढत्या स्थिरतेमध्ये दिसून आले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदीकृत कंपन्यांच्या २०२४ साली ज्या मुख्याधिकार्यांनी राजीनामे दिले, त्यांचे उद्योग-व्यवसायनिहाय विश्लेषण वेगळ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. यासंदर्भात अधिकृतपणे उपलब्ध माहितीनुसार, २०२४ साली नोकरी सोडणार्या मुख्याधिकार्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे २३ मुख्याधिकारी हे ग्राहकोपयोगी उद्योग क्षेत्रातील होते. त्याखालोखाल उद्योग-व्यवसायानुसार उपलब्ध संख्या म्हणजे, २०२४ साली वित्तीय सेवा संस्था क्षेत्रातील २०, उत्पादन क्षेत्र १८, बांधकाम १७, अन्नप्रक्रिया नऊ, सेवा क्षेत्र सात, युटिलिटीज क्षेत्र सात, ऊर्जा उद्योग पाच, संगणक क्षेत्र पाच, संदेशवहन दोन व आरोग्य सेवा क्षेत्र दोन याप्रमाणे आपल्या नोकरीमध्ये बदल केला आहे. ही आकडेवारी पुरेशा प्रमाणात बोलकी आहे.
यातून देशांतर्गत विविध कंपन्यांच्या मुख्याधिकारी वा सर्वोच्च पदावरील व्यक्तींच्या नोकरी बदलण्याच्या संदर्भातील मुख्य बाब म्हणजे, उद्योग-व्यवसाय क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. या बदलांना आर्थिक-औद्योगिक व व्यवसायवृद्धी या पैलूंप्रमाणेच मुख्याधिकारी वा तत्सम उच्च पदावरील व्यक्तींसाठी त्यांच्या अधिकार वृद्धी, करिअर वृद्धी, आकर्षक पद-पगारवाढ व प्रसंगी सध्यापेक्षा अधिक आकर्षक पगारमान व प्रतिष्ठापर सोयी इत्यादी नेहमीच महत्त्वाच्या ठरल्या, तरी त्यांना पण स्थिरतेसह असणारी कामगिरी हवी असते, हाच संदेश वरील विवेचनातून मिळतो.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६