संजय राऊत, रोहित पवार गोत्यात - हक्कभंग प्रस्ताव स्वीकारले; मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे प्रकरण
06-Mar-2025
Total Views | 49
मुंबई: ( Sanjay Raut Rohit Pawar in trouble Minister Jayakumar Gore case ) 'उबाठा'चे खा. संजय राऊत आणि शरद पवार गटाचे आ. रोहित पवार पुन्हा गोत्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत विधानसभा अध्यक्षांनी ते हक्कभंग समितीकडे पाठवले आहेत.
संजय राऊत आणि रोहित पवार यांनी बुधवार, दि. ५ मार्च रोजी मंत्री जयकुमार गोरे यांच्याविषयी माध्यमांमध्ये बदनामीकारक माहिती दिली. गोरे यांनी एका महिलेला नग्न अवस्थेतील फोटो पाठवले होते. हे प्रकरण २०१९ मध्ये न्यायालयात निकाली निघाले असले, तरी मंत्री झाल्यानंतर गोरे पुन्हा त्रास देत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यावर जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “माझ्यावर २०१७ मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षे खटला चालल्यानंतर २०१९ मध्ये न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने माझा मोबाईल आणि इतर पुरावे तपासून निकाल दिला होता. लोकशाहीत न्यायालय सर्वोच्च असते, त्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा होणे चुकीचे आहे.”
“माझ्या वडिलांचे सात दिवसांपूर्वी निधन झाले. मी अस्थीविसर्जनही करू शकलो नाही, कारण विरोधकांनी मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण होईल, याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, अशा गोष्टी राजकारणात घडतात. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. त्यामुळे मी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. तसेच, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. जर मी महिलेचा छळ केला असेल, तर पोलिसांनी तपास करावा. तपासात दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी”, अशी मागणी गोरे यांनी केली.
विधानसभेत काय घडले?
विरोधकांकडून माध्यमांमध्ये बदनामी केली जात असल्याने मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेतील आयुधांचा वापर केला. खा. संजय राऊत, आ. रोहित पवार आणि लय भारी युट्युब चॅनलविरोधात त्यांनी हक्कभंग दाखल केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवार, दि. ६ मार्च रोजी हा हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत हक्कभंग समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला.