मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (West Bengal Election) पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी) हिंदूंना मतदार यादीतून वगळू इच्छित असल्याचा आरोप भाजपने केला आहे. टीएमसीला मत न देणाऱ्या हिंदू व भाषिक अल्पसंख्याकांना मतदार यादीतून काढून टाकायचे असा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा डाव असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या नव्या प्रचारानंतर भाजपने हे आरोप केले आहेत.
भाजपने असा दावा केला आहे की, कथित 'बनावट मतदार' शोधण्यासाठी टीएमसीचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात घरोघरी फिरत आहेत. हा आदेश त्यांना खुद्द ममता बॅनर्जी यांनी दिला असून दहा दिवसांत हे काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. असे असताना, टीएमसी ज्या मतदारांना वगळू इच्छिते त्या मतदारांचा पुन्हा मतदार यादीत समावेश करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. कोलकात्याच्या भवानीपूर विधानसभेत सध्या ही लढत सुरू आहे, जिथे ममता बॅनर्जींना एकही पोटनिवडणूक जिंकता आली नव्हती.