मुंबई : कुणाल कामरा आणि माझे कालच बोलणे झाले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. शनिवार, २९ मार्च रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणारा कुणाल कामरा राऊतांच्या संपर्कात आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
संजय राऊत म्हणाले की, "कुणाल कामरा याच्याशी कालच माझे बोलणे झाले. आपण कायद्याला सामोरे जायला हवे, असे मी त्याला सांगितले. कुणाल कामरा अतिरेकी आहे का? तो अल कायद्याचा सदस्य आहे का? कुणाल कामरा हा या देशातील एक कलाकार आहे. देशद्रोही, दहशतवादी, फुटिरतावादी आहे का? मी त्याला सांगितले की, आपण कायद्याला सामोरे जायला हवे," असे ते म्हणाले.
"मी महाराष्ट्राचा संसदेचा सदस्य आहे. त्यामुळे मला कुणीही फोन करू शकतो. मी कुणाल कामराला एवढेच सांगितले की, त्याने मुंबईत येऊन पोलिसांसमोर येऊन आपले म्हणणे मांडावे. कंगणा राणावत हिला ज्याप्रकारे केंद्र सरकारने विशेष सुरक्षा दिली होती तशीच सुरक्षा कुणाल कामरालादेखील द्यायला हवी," असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जवळजवळ मुडदा पडला आहे. एकप्रकारे गुजरात पॅटर्न आणि उत्तर प्रदेश पॅटर्न इथे राबवला जातोय. मध्य प्रदेशातही तेच चालले. महाराष्ट्र थोडा वेगळा आहे असे आम्हाला वाटले होते.
कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच!
दरम्यान, याआधीही कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. तसेच कुणाल कामराला उबाठा गटाने सुपारी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राऊतांनी आपले कामराशी बोलणे झाल्याचे सांगितल्याने नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.