नवी दिल्ली: ( official history of the Maratha Empire should be published MP Udayanraje Bhosale demands to minister amit shah ) “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रकाशित करावा,” अशी मागणी भाजप खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे गुरुवार, दि. २७ मार्च रोजी केली आहे.
खा. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी “राज्य-केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिद्ध करावा,” अशी मागणी केली. त्याचप्रमाणे “विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पद्धतीने त्यांचा तसेच छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा अवमान होईल, असे भाष्य, टिप्पणी किंवा कृती करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळून समाजामध्ये दुफळी पसरते. या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी किमान दहा वर्षांची शिक्षा असणारा अजामीनपात्र विशेष कायदा पारित करावा,” अशीही मागणी खा. उदयनराजे यांनी यावेळी केली आहे.
“ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेबसिरिज, डॉक्युमेंटरीज यांचे चित्रीकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला साहाय्यभूत असलेली, इतिहासकार, संशोधक आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी. कमिटीच्या शिफारसी विचारात घेऊन सेन्सॉरशिप देण्यात यावी, जेणेकरून संभाव्य विरोधाभास टाळण्याचे आणि समाजस्वास्थ अबाधित राखणे शक्य होईल,” असेही खा. उदयनराजे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
औरंगजेबाची कबर ‘एएसआय’ यादीतून काढा : राहुल शेवाळे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर केंद्र सरकारच्यावतीने तोडण्यासाठी प्रक्रिया प्रारंभ करावी, यासाठी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्र शेखावत यांची गुरुवारी दिल्लीत भेट घेतली. “केंद्र सरकारच्यावतीने सोबतच खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीमधून बाहेर काढण्यात यावी,” अशी मागणी त्यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.