नवी दिल्ली : ( Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar rejected Congress privilege notice ) राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध काँग्रेस खा. जयराम रमेश यांनी दिलेला विशेषाधिकार प्रस्ताव फेटाळून लावला.
काँग्रेस राज्यसभा खा. जयराम रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव सादर केला होता, ज्यामध्ये त्यांनी ‘राष्ट्रीय पंतप्रधान मदत निधी’च्या कामकाजासंदर्भात माजी काँग्रेस अध्यक्षा आणि राज्यसभा खा. सोनिया गांधी यांच्यावर आरोप केल्याचा दावा केला होता.
हा प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी दि. २४ जानेवारी १९४८ रोजी ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’(पीआयबी) ने जारी केलेल्या एका प्रेस दस्तऐवजाचा हवाला देऊन फेटाळला. त्याचप्रमाणे शाह यांच्या वक्तव्यामुळे कोणतेही उल्लंघन होत नसल्याचीही टिप्पणी केली.
उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “आपण कागदपत्रांचे वाचन केले असून शाह यांच्या विधानात कोणतेही उल्लंघन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गृहमंत्री शाह यांच्या विरोधातील विशेषाधिकार प्रस्तावास मंजुरी नाकारण्यात आली आहे. अनेकदा अशा प्रस्तावांविषयी सदस्य प्रसारमाध्यमांकडे धाव घेतात. मात्र, त्यामुळे प्रतिमा खराब होते. त्यामुळे सभागृह (राज्यसभा) लोकांची प्रतिष्ठा खराब करण्याचे व्यासपीठ राहणार नाही,” असेही उपराष्ट्रपतींनी नमूद केले आहे.