नवी मुंबई: ( ABVP on Sexual harassment ) कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी येथे शनिवार, दि. २२ मार्च रोजी एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या योगेश पाटील नावाच्या पर्यवेक्षकाने परीक्षेदरम्यान लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवी मुंबई येथील वाशी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या शिष्टमंडळाने ‘रयत शिक्षण संस्था’ संचालित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्रशासकांशी भेट घेऊन प्राध्यापकाच्या निलंबनाची मागणी केली होती. मात्र, ‘रयत शिक्षण संस्थे’च्या अकार्यक्षमतेमुळे अद्यापही महाविद्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप ‘अभाविप’ नवी मुंबई यांच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीवर केला जात आहे.
या घटनेविरोधात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’, नवी मुंबईच्यावतीने दोषी प्राध्यापकाच्या निलंबनाची अधिकृत घोषणा महाविद्यालयाने त्वरित करावी, यासाठी महाविद्यालयाला पत्र देण्यात आले आहे. या प्राध्यापकाला त्वरित निलंबित न केल्यास ‘अभाविप’ या महाविद्यालय व्यवस्थापनेविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
पीडित मुलीला न्याय न मिळाल्यास ‘अभाविप’च्यावतीने तीव्र आंदोलन करणार
शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींनी भीतीच्या सावटाखाली शिकावे का? या घटनेविरोधात आवाज उचलणार्या विद्यार्थिनींना जर न्याय मिळत नसेल, तर महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही, तर ‘अभाविप’च्यावतीने ‘रयत शिक्षण संस्था’ आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल.
-गिरीश पळधे, अभाविप जिल्हा संयोजक, नवी मुंबई