स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेचे मुख्य सचिवांना पत्र; पुणे पोलिसांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
27-Mar-2025
Total Views | 20
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील पीडितेने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले असून त्यात पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या घटनेला आणखी नवे वळण मिळाले आहे.
“पुरुष वैद्यकीय अधिकारी ईच्छा नसताना माझी वैद्यकीय चाचणी करायचे. अनेक पुरुष पोलिस अधिकाऱ्यांना माझ्यावर कसा अत्याचार केला हे सांगावे लागले. आरोपी दत्ता गाडेने माझ्यावर दोनवेळा बलात्कार केला. त्याने तिसऱ्यांदा बलात्काराचा प्रयत्न केल्याने मी पूर्ण ताकदीने विरोध केला. त्यानंतर दत्ता गाडे पळून गेला,” असे पीडितेने या पत्रात म्हटले आहे.
तसेच “तीन वकीलांची नावे सूचवून त्यातील एका वकीलाचे नाव निवडण्यास मला पुणे पोलिसांनी सांगितले. परंतू, मी असीम सरोदे यांनी नेमणूक करण्याची मागणी केल्यानंतर एक दिवस उशीर झाल्याचे सांगत पोलिसांनी परस्पर ॲड. अजय मिसार यांची नियुक्ती केली. अॅड. अजय मिसार यांच्यावर आताच आक्षेप घ्यायची गरज नाही. परंतू, माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे, असा आरोपही पीडितेने केला आहे.