मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली भुलेश्वर काळबादेवी परिसरातील रहिवासी आणि सुवर्णकार संघटनांची संयुक्त बैठक गुरुवार, २७ मार्च रोजी महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडली. यावेळी रहिवासी भागातील सुवर्णकार उद्योग औद्योगिक परिसरात स्थलांतरित करा, अशी मागणी करण्यात आली. महापालिकेच्या 'सी' विभाग अंतर्गत भुलेश्वर / काळबादेवी परिसरात सुवर्णकारांना त्यांच्या व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, ‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त विष्णू विधाते, सर्व संबंधित अधिकारी यांच्यासह सुवर्णकार संघटनांचे आणि रहिवासी संघटनांचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त भूषण गगराणी यांनी रहिवासी संघटना तसेच सुवर्णकार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच याप्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशान्वये दोन्ही बाजू ऐकून घेण्यासाठी ही समन्वय बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत भुलेश्वर रेसिडेन्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींनी रहिवासी जागेत आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगाने मुद्दे मांडत रहिवासी भागात चालणारे सुवर्णकार उद्योग हे औद्योगिक परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी केली. तर सुवर्णकार संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यवसाय चालविताना सुरक्षा आणि पर्यावरणीयदृष्ट्या करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. दरम्यान, दोन्ही बाजुंचे सविस्तर म्हणणे ऐकून घेत याबाबतचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे उपआयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी स्पष्ट केले.