‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत होणार दुरुस्ती : अजित पवार
निकषांत बदल करण्याचे दिले संकेत
18-Mar-2025
Total Views |
मुंबई: ( Chief Minister Majhi Ladki Bahin scheme will be amended ajit pawar ) महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांत बदल करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी दिले. “आर्थिक स्थिती चांगली असलेल्या काहीजणींनी या योजनेचा लाभ घेतला. आम्ही कुणाचे पैसे परत घेणार नाही. मात्र यामध्ये दुरुस्ती करावी लागेल,” असे पवार म्हणाले.
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेविषयी अजित पवार म्हणाले की, “निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार पैसे दिले जातील. अद्यापही पाच वर्षांचा कालावधी आहे. ही योजना आम्ही बंद करणार नाही. मात्र, ही योजना गरीब घटकांतील महिलांकरिता आहे. ती केवळ आर्थिक साहाय्यासाठी न ठेवता, यातून महिलांचे सबळीकरण केले जाईल. या योजनेसाठी दिला गेलेला पैसा भांडवलाद्वारे वापरला जाईल आणि राज्याची अर्थव्यवस्था सबळ होण्यासाठी वापरला जाईल, हे आम्ही पाहात आहोत.”