मुंबई, दि. १४ : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) डिजिटल क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले आहे. महापारेषणच्या मनुष्यबळ विकास विभागाने सर्व कामे डिजिटल पध्दतीने सुरू करण्यावर भर देऊन तब्बल सात ऑटोमेशन प्रकल्प पूर्ण केले आहेत. याबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी अभिनंदन केले आहे.
महापारेषनच्या एसएपी (SAP) या डिजिटल प्रणालीव्दारे सर्व अहवाल व सद्यस्थितीची माहिती एका क्लिकवर केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा गतीने व तात्काळ मिळणे सुलभ झाले आहे. ई-सर्व्हिस बुकच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आता वास्तविक स्थिती (रिअल टाईम डाटा) मिळणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे सांघिक कार्यालय बरोबर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ऑनलाईन रजा व्यवस्थापनामध्ये वर्ग-१ ते वर्ग-३ चे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑनलाईन रजा भरता येणार आहे. तसेच मोबाईल ऍपच्या माध्यमातून अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, संचालक यांना रजा नोंदी व मंजुरीकरण करणे सोयीस्कर झाले आहे. ऑनलाईन प्रॉपर्टी रिटर्न टप्पा-१ मध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्मचारी पोर्टलवर जाऊन मालमत्ताविषयक माहिती ऑनलाईन पध्दतीने भरता येणार आहे. यामध्ये आतापर्यंत तब्बल ६ हजार ७९३ कर्मचाऱ्यांनी माहिती भरली आहे.
महापारेषणची वाटचाल डिजिटल कडे : डॉ. संजीव कुमार
राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व अपर मुख्य सचिव (ऊर्जा)आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महापारेषणची वाटचाल वेगाने सुरु आहे. महापारेषणचे विविध प्रकल्प डिजिटल व ऑनलाईन पध्दतीने सध्या सुरु आहेत. ई-गव्हर्नन्स, ई-ऑफिसमुळे कामे गतीने व पारदर्शी पध्दतीने होण्यास मदत होणार आहे. माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता यांचा जास्तीत-जास्त वापर करून महापारेषण कंपनीला कायम अग्रेसर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.