मराठी साहित्याला संत कवयित्रींचा, लेखिकांचा समृद्ध वारसा लाभला आहे. आपल्या काव्यप्रतिभेतून या कवयित्रींनी जीवनाच्या विविध पैलूंवर अगदी नेमकेपणाने भाष्य केले. यापैकी काही आशयगर्भ काव्यपंक्तींची गीतांतही गुंफण झाली. अशाच काही निवडक कवयित्रींचा अक्षरप्रवास रसिकांसमोर उलगडून दाखवत आहेत, लेखिका तपस्या वसंत नेवे. नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आणि आगामी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर ‘शब्दव्रती’ या अनोख्या संकल्पनेबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’ने तपस्या नेवे यांच्याशी साधलेला हा संवाद...
- नुकत्याच संपन्न झालेल्या ‘मुंबई मराठी ग्रंथोत्सवा’त आपण ’शब्दव्रती’ हा अनोखा कार्यक्रम सादर केलात. तेव्हा ‘शब्दव्रती’ या शब्दाचा नेमका अर्थ आणि या कार्यक्रमाची संकल्पना, याविषयी काय सांगाल?
‘व्रत’ या शब्दाचा अर्थ म्हणजे भक्ती करणे किंवा एखाद्या गोष्टीची पूजा करणे. आपल्या जीवनात ज्यांनी शब्दांची उपासना केली, भक्ती केली, अशा लेखिका, कवयित्री म्हणजे ‘शब्दव्रती.’ या कार्यक्रमामध्ये ज्या कवयित्री आहेत, त्या कवयित्री शब्दांच्या अधीन गेल्या आहेत. त्यांच्या लेखणीतून जे शब्द प्रकट झाले, ते अमृतासमान आहेत. म्हणूनच या कार्यक्रमाचे नाव निश्चित केले ’शब्दव्रती’.
- ‘शब्दव्रती’च्या माध्यमातून संतसाहित्यापासून ते अर्वाचीन काळातील स्त्रीसाहित्याचा पट आपल्याला का मांडवासा वाटला?
‘कोविड’ महामारीत ‘लॉकडाऊन’च्या काळात आम्ही ऑनलाईन माध्यमातून एक कार्यक्रम सादर केला होता, ज्यात आम्ही बंडखोर स्त्री लेखिकांचा जीवनपट, त्यांचे साहित्य हा विषय लोकांसमोर ठेवला होता. यामध्ये विभावरी शिरूडकर यांच्या साहित्यापासून आम्ही सुरुवात केली. त्या वेळेस अशी गोष्ट लक्षात आली की, साहित्याच्या या प्रवाहामध्ये अनेक कवयित्रीसुद्धा आहेत. या कवयित्रींवर आपण एखादा कार्यक्रम सादर करायला हवा, असा विचार मी केला. मराठी काव्यविश्वात अनेक कवयित्रींनी आपले मौलिक योगदान दिले आहे. आजसुद्धा नीरजा, विशाखा विश्वनाथ यांसारख्या कवयित्री आपल्या प्रतिभेने काव्यविश्व फुलवत आहेत. कवितांचा शोध घेताना असे लक्षात आले की, काही कविता अशा आहेत, ज्यांची गाणीदेखील झाली आहेत. मग या गीतांचा मागोवा घेत मी पोहोचले थेट संतपरंपरेच्या विश्वात. संतसाहित्यातील मौखिक परंपरेमुळे ओव्या, अभंग या स्त्रियांच्या रोजच्या जगण्यातला एक भाग झाल्या होत्या. पुढे हेच शब्द संगीतबद्ध झाले. नामवंत गायकांनी याची गाणी गायली, म्हणूनच प्रामुख्याने ज्या कवितांची गाणी झाली, अशा कवयित्रींचा शब्दांचा प्रवास लोकांसमोर मांडायचा, असे मी ठरवले. आपण या सगळ्यांची गाणी ऐकलेली असतात, पण ते लिहिणारे हात कोणाचे आहेत, हे आपल्याला ठावूक नसते. म्हणूनच ही संकल्पना आकाराला आली की, संत कवयित्रींपासून ते मालिकांची शीर्षकगीते लिहिणार्या कवयित्रींपर्यंत मराठी साहित्यातील हा विस्तारित पट आपण लोकांसमोर मांडायला हवा.
- सादरीकरणाचा हा कार्यक्रम गटामध्ये सादर न करता, आपण एकपात्री करावा, असे का वाटले?
ज्या वेळेस आपण एखाद्या समूहाबरोबर कार्यक्रमांची आखणी करतो, तेव्हा वेळेसहित अनेक गोष्टी जुळून येणे अवघड असते. अशा वेळेस या कार्यक्रमाच्या सादरीकरणाला मर्यादा येतात. दुसर्या बाजूला आपल्याकडे एकपात्री कार्यक्रमांची समृद्ध परंपरा आहे. या सादरीकरणांमध्ये साहित्याचा पट मांडणार्या ज्या व्यक्तीचे नाव घेतले जाते, ते म्हणजे दिपाली केळकर. माध्यमांमध्ये वृत्तनिवेदिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. मी महाविद्यालयात असताना अनेक वेळा त्यांच्या कार्यक्रमाला गेले आहे. त्यावेळेस असे वाटायचे की, आपणसुद्धा अशा प्रकारे काम केले पाहिजे. सुदैवाने एका कार्यक्रमात मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. यानंतर ‘शब्दव्रती’ या कार्यक्रमासाठीसुद्धा त्यांनी मला प्रोत्साहन दिले.
‘शब्दव्रती’ या कार्यक्रमात निव्वळ गोष्टी किंवा किस्से सांगणे, यांपेक्षा लोकांनी त्या गाण्यातील काही ओळी ऐकल्या, तर हा कार्यक्रम अधिक प्रभावी होईल, असे मला वाटले. या माध्यमातून आपल्याला कार्यक्रमातील एकसुरीपणासुद्धा टाळता येतो. ही गाणी जेव्हा लोक ऐकतात, तेव्हा लोक त्या काळात प्रवेश करतात. लोकांच्या मनात त्या गाण्याने सोडलेली छाप, त्याच्या जोडीला नव्याने लेखिकांबद्दल मिळालेली माहिती या दोहोंच्या मिश्रणातून कार्यक्रम बहरतो.
- ‘शब्दव्रती’ या कार्यक्रमासाठी आपण कवयित्रींची निवड कशी केली?
मराठी साहित्याला कवयित्रींचा समृद्ध वारसा लाभला आहे. शांताबाई शेळके असो किंवा माजी संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे, यांच्या शब्दांमुळे मराठी कवितेचे विश्व समृद्ध झाले आहे. शाळेतील पाठ्यपुस्तकांपासून ते मराठी साहित्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला असंख्य कवयित्री भेटत गेल्या. प्रत्येक कवयित्रीची शैली वेगळी आहे, असे आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच मी ठरवले की, आपण अशा कवयित्रींची निवड करायची, ज्यांच्या कवितांची पुढे गाणी झाली. कारण, या संकल्पनेवर आधारित कवयित्रींना घेऊन असा कार्यक्रम मराठीमध्ये यापूर्वी तरी सादर झाला नव्हता. भावगीते, चित्रपटगीते, मराठी मालिकांची शीर्षकगीते लोकांपर्यंत पोहोचलेली असतात; त्यामागच्या कविता पुस्तकांच्या पानांमध्ये बंदिस्त असतात. संजीवनी मराठे, वंदना विटणकर यांची गाणी लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत; परंतु या कवयित्रींना ओळख नसते. म्हणूनच या कवयित्रींची ओळख व्हावी, असा विचार मनात ठेवून हा सादरीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला.
- ‘शब्दव्रती’ या कार्यक्रमाचे वेगळेपण कशात आहे?
‘शब्दव्रती’ या कार्यक्रमाचे वेगळेपण हे या कार्यक्रमाच्या विषयात आहे, असे मला वाटते. ज्यांच्या कवितांची गाणी झाली, अशा कवयित्रींची रसिक प्रेक्षकांना ओळख करून देणे, त्यांच्या वेगळ्या कवितांचे सादरीकरण मी या कार्यक्रमात करते. गाण्यांच्या संदर्भातील काही वेगळे किस्से या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना ऐकायला मिळतात. ‘शब्दव्रती’चा हा कार्यक्रम भविष्यात मला दृकश्राव्य माध्यमातून लोकांच्या समोर आणायचा आहे. कारण, प्रत्येक ठिकाणी सादरीकरणासाठी वयोगट वेगळा असतो. उदाहरणार्थ, तरुण मुलामुलींना केवळ ही गाणी किंवा किस्से ऐकवून चालणार नाही, तर त्यांच्यासमोर दृकश्राव्य माध्यमातून झालेले सादरीकरण जास्त चांगल्या प्रकारे पोहोचेल. ‘लाईव्ह म्युजिक’च्या माध्यमातूनदेखील हा कार्यक्रम जास्त प्रभावी ठरेल, असे मला वाटते. हल्ली आपण म्हणतो की, वाचन कमी झाले आहे, त्यामुळे ‘शब्दव्रती’सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तरुण पिढीपर्यंत साहित्य पोहोचवू शकतो. येणार्या पिढीला लेखिका, कवयित्री यांची नावे आणि त्यांचे साहित्यसृष्टीसाठी असलेले अमूल्य योगदान लक्षात येईल.
- एकपात्री साहित्यिक कार्यक्रमाची कल्पना अनोखी आहेच. यानिमित्ताने आपल्या रंगभूमीच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल.
अभिनय क्षेत्राशी मी फार पूर्वीपासून जोडली गेले होते. लहान असताना मी सुधा करमरकर यांच्या अनेक बालनाट्यांमध्ये चार ते पाच वर्षे काम केले होते. तेव्हा रोज तालमीसाठी कल्याण ते ठाणे हा प्रवास सुरू असायचा. वझे केळकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये मी भाग घेतला. अनेक नाट्यसंस्थांमार्फत मी एकांकिका केल्या. आदरणीय मच्छिंद्र कांबळी यांच्यासोबत मी ’लग्नकर्ता विघ्नहर्ता’ नावाचे पहिले व्यवासायिक नाटक केले. त्यानंतर संजय नार्वेकर यांच्यासोबत ’लोचा झाला रे’ नाटकाचे काही प्रयोग केले. त्यानंतर २०२२ साली ‘वासूची सासू’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आले होते; त्यात मला काम करण्याची संधी मिळाली. नाटक हे एका अर्थाने माझे पहिले प्रेम होते, असे म्हणायला हरकत नाही. रंगभूमीमुळे आपसूकच वाचनाची गोडी लागली. कालांतराने मी ‘ग्रंथालय आणि माहिती शास्त्र’ पदव्युत्तर पदवी घेतली आणि सध्या मी अंबरनाथ नगर परिषद संचालित ‘शिवप्रेरणा ग्रंथालय, अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र’ येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे.