ध्यान, प्राणायाम, वेगवेगळ्या मुद्रा, घरातील संस्कारांच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत, युवा पिढी घडवणार्या रुपेश बाविस्कर यांच्याविषयी...
चित्रकला महाविद्यालयाचे उच्च शिक्षण घेत दोन पदव्या घेणार्या नाशिकच्या एका ध्येयवेड्याने, स्वामी विवेकानंदांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे कार्य हाती घेतले आहे. रुपेश विलास बाविस्कर असे त्यांचे नाव. चित्र फक्त कागदावर न काढता, जिवंत माणसाचे आयुष्यच आपल्या पद्धतीने डिझाईन करण्याचे जगावेगळे काम रुपेश यांनी हाती घेतले आहे. २००४ सालापासून आजच्या घडीपर्यंत २० वर्षांच्या काळात रुपेश यांनी ध्यान, योगाच्या माध्यमातून शहरी व आदिवासी भागातील विद्यार्थी, विविध संस्था आणि लोकांसाठी त्यांचे गुरू महेंद्र वारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, दोन हजारांपेक्षा अधिक मार्गदर्शन करणारे सत्र घेतले आहेत. हे सत्र घेत असताना स्वत: पदरमोड करत कोणत्याही प्रकारच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता, विद्यार्थी घडविण्याचे काम ते निस्वार्थीपणे करत आहेत.
दरम्यान, रुपेश यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे दि. १० ऑक्टोबर १९८० रोजी झाला. त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, शिरपूर येथेच पूर्ण केले, तर पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाले. त्यानंतरही रुपेश यांनी आपले शिक्षण पुढे चालूच ठेवत, धुळ्याच्या ‘स्कूल ऑफ आर्ट’ महाविद्यालय आणि चोपडा येथील भगिनी महाविद्यालय येथे चित्रकलेची प्रत्येकी एक पदवी संपादन केली. परंतु, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, रुपेश यांना नोकरी करणे क्रमप्राप्त होते. म्हणून त्यांनी २००६ साली जिल्हा परिषदेत नोकरी पत्करत, त्र्यंबकेश्वर येथे परिचर म्हणून रुजू झाले. तर दुसरीकडे आजोबांनी दिलेले कलेचे बाळकडू रुपेश यांना स्वस्थ बसू देत नव्हते. मग आपली नोकरी सांभाळत रुपेश यांनी, अध्यात्मावर मार्गदर्शन करण्याचे काम सुरू केले. याकाळात, त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या सर्व आखाड्यांतील महंतांच्या सहवासात ते आले. त्यामुळे त्यांना अध्यात्माची गोडी लागली. आखाड्यातील साधू महंतांकडून, बर्याच गोष्टी त्यांना शिकता आल्या. त्यातूनच पुढे रुपेश यांनी, विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत मुलांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. यातून हजारो मुलांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले.
२०२२ साली त्यांची बदली नाशिक येथे झाली. तिथे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी रुपेश यांच्या कामाची दखल घेत, जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. आता दिव्य स्पर्श नावाने मार्गदर्शन करणार्या रुपेश यांना, त्यांची पत्नी योगिता व मुलगी अनघालक्ष्मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून ‘सुजलाम् महाराष्ट्र’ घडविण्यासाठी आदर्श युवक तयार करण्याचे काम करत आहेत. आजच्या आधुनिक युगात इंटरनेटच्या जाळ्यात तरुण अडकला असून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, युट्युब, नेटफ्लिक्स व इन्स्टाग्रामने त्यांना भुरळ घातली आहे. युवकांची ऊर्जा येथे खर्च होत राहिली, तर उद्याचा भारत नक्कीच आपल्या अपेक्षेनुसार घडणार नाही. तसेच, विद्यार्थी लहानसहान गोष्टीने हताश होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करतात, अशा बातम्या वाचल्यानंतर रुपेश हताश होतात. त्यामुळे विज्ञान व अध्यात्माच्या मदतीने वाट चुकलेल्यांना, योग्य मार्गावर आणण्याचे काम ते अहोरात्र करत आहेत.
याव्यतिरिक्त रुपेश रेकी मास्टर, ब्ल्यू व्हॉयलेट व्हीलर, डाऊझर, योग गुरू, मोटिवेशनल ट्रेनर, चित्रकार, कवी तसेच कलर व सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये अभिनयदेखील करतात. असे आगळवेगळे व्यक्तिमत्त्व असलेले रुपेश, कुठल्याही कार्याची सुरुवात आधी घरापासून करावी असे म्हणतात. म्हणूनच त्यांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांच्या समवेत, त्यांची दहा वर्षांची चिमुरडी अनघालक्ष्मीदेखील त्यांना मदत करते. रुपेश यांनी तिचा तृतीय नेत्र जागृत केला असून, ती आपल्या मन:शक्तीचा वापर करत डोळे बंद करून वाचन, लेखन, चित्र काढणे, त्यात रंग भरणे, स्केटिंग करणे, मोबाईल हाताळण्यासारखी प्रात्यक्षिके करून दाखवत, विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह जागृत करण्याचे काम करत आहे. तिची ही कला पाहूनच, अनेक विद्यार्थी ध्यानाच्या माध्यमातून अभ्यासाकडे वळल्याचे रुपेश सांगतात.
आजही रुपेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असून, नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवशी सामाजिक बांधिलकीची जपणूक करत, विविध कार्यशाळांचे आयोजन करत विद्यार्थ्यांना व समाजातील सर्वच घटकांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करतात. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कामामुळे जिल्हा परिषद नाशिक, विभागीय आयुक्तांच्या हस्ते ‘गुणवंत कर्मचारी पुरस्कारा’ने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, शरद पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, बोलक्या बाहुल्यांचा खेळ खेळणारे रामदास व अपर्णा पाध्ये, अष्टपैलू अभिनेते विजू खोटे यांसारख्या अनेक दिग्गज कलाकार व मान्यवरांच्या हस्ते रुपेश यांना, आपल्या कार्यासाठी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अशा बहुरंगी व बहुढंगी युवकाला त्याच्या अलौकिक कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
विराम गांगुर्डे
९४०४६८७६०८