कलिंगमधील स्मृतिशिल्पांचा अन्वयार्थ!

    08-Feb-2025   
Total Views | 53


ODISHA
 
ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील रत्नगिरी येथे सध्या पुरातत्व विभागाकडून उत्खनन सुरू आहे. यानिमित्ताने भारतीय संस्कृतीतील बौद्ध धर्माचा समृद्ध वारसा उजागर झाला आहे. प्राचीन काळापासून ओडिशा हे व्यापाराचे केंद्र राहिले. रत्नगिरीचा हा वारसा इतर नगरांपेक्षा नेमका कसा वेगळा होता, याचा घेतलेला हा आढावा...
 
जगाला शांततेचा संदेश देणारा बौद्ध धर्म भारतीय मातीमध्ये जन्मलेला. म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर आजही आपल्याला बुद्धांचा विचार आढळतो. आधुनिक काळात जेव्हा जगासमोर सत्तेसाठी दोन विश्वयुद्धे लढली गेली, त्या वेळेस या संघर्षातून आपल्याला बुद्धांचाच विचार तारून नेईल, असे अनेकांना वाटले. ओडिशा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या भारतीय प्रवासी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “भारताने जगाला बुद्ध दिले, युद्ध नाही.” ओडिशा पूर्वी ‘कलिंग’ या नावानेसुद्धा ओळखले जात होते. याच ओडिशामधील जाजपूर जिल्ह्यात रत्नगिरी हे ठिकाण अनेक बुद्ध विहारांसाठी प्रसिद्ध आहे. ६० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा इथे उत्खननाचे कार्य सुरू झाले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या बौद्ध धर्मातील समृद्ध कालखंडाचा मागोवा यामुळे आपल्याला घेता येणार आहे.
 
रत्नगिरी ही नगरी गुप्त साम्राज्यातील नरसिंह बलादित्य यांच्या काळात वसवले गेल्याचे बोलले जाते. ओडिशातील रत्नगिरीचा शोध कसा लागला, यामागचा इतिहाससुद्धा रंजक आहे. १९०५ साली जाजपूरचे उपविभागीय अधिकारी मनमोहन चक्रवर्ती यांना या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात आले. तिथे आढळलेल्या शिलालेखावरून रत्नगिरीचा ऐतिहासिक वारसा दृष्टिक्षेपात आला. रत्नगिरीमध्ये उत्खननाची प्रक्रिया मात्र स्वातंत्र्यानंतर सुरू झाली. ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागा’च्या पहिल्या महिला संचालक देबाला मित्र यांच्या नेतृत्वात उत्खननाच्या कामाला सुरुवात झाली. १९५८ ते १९६१ या कालावधीत बुद्ध विहारांचे अनेक नमुने रत्नगिरी इथे आढळून आले. बुद्धांची वेगवेगळी शिल्पे, स्तुप यांच्या आधारे सदर भागातील वास्तू इसवी सन पाचवे शतक ते १२व्या शतकापर्यंत जुनी असल्याचा दावा देबाला मित्र यांनी केला. मित्र यांच्या संशोधनावेळी जवळपास ७०० स्तुप या परिसरात आढळून आले होते. रत्नगिरीतील समृद्ध वारशाची तुलना त्यांनी ‘नालंदा विद्यापीठा’तील वैभवाशी केली होती. मित्र यांच्या संशोधनानंतर मात्र पुढचा बराच काळ रत्नगिरीतील उत्खननप्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
 
नंतरच्या काळात पुरातत्त्व विभागाने धौली आणि जौगडा या भागातील ऐतिहासिक वारशाकडे जास्त लक्ष केंद्रित केले. मात्र, डिसेंबर २०२४ पासून पुरातत्त्व विभागाने पुन्हा एकदा रत्नगिरी येथे उत्खननाला सुरुवात केली. डी. बी. गरनायक यांच्या नेतृत्वात या उत्खननाला सुरुवात झाली. आतापर्यंत या उत्खननामध्ये तीन ते चार फूट मोठे बुद्धाचे मस्तक, पाच फुटांची बुद्धांची हस्तमुद्रा यासहित अनेक शिलालेख आढळून आले आहेत. यापूर्वी केलेल्या उत्खननात बुद्धांच्या अनेक मूर्त्या रत्नगिरी येथे आढळून आल्या. सदर उत्खननात साडेतीन फूट उंचीचे हत्तीचे एक छोटे शिल्पसुद्धा आढळून आले आहे.
 
आठव्या आणि दहाव्या शतकामध्ये कलिंगच्या भूमीवर भौमकारा साम्राज्याचे राज्य होते. या काळात बौद्ध धर्माला सर्वाधिक राजाश्रय मिळाला. थेरवदा, महायान या पंथांच्या विचारांचा प्रसार रत्नगिरी इथूनच व्हायला सुरुवात झाली. बौद्ध धर्मातील पंथांच्या विचारविश्वाचे होणारे आदान-प्रदान, विविध देशांतील संन्यासी, तत्त्वज्ञ यांचा असणारा वावर म्हणून या जागेला ’रत्नगिरी’ असे संबोधले जात होते. ज्ञानरूपी रत्नांचा सन्मान हा भारतात कशा प्रकारे केला जात होता, याचे हे उत्तम उदाहरण आहे. साधारणपणे इसवी सन सहाव्या शतकात चिनी विद्वान ह्युएन-त्सांग याने रत्नगिरीला भेट दिल्याचे बोलले जाते. ‘ओडिशा इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम अ‍ॅण्ड साऊथईस्ट एशियन स्टडीज’चे सचिव सुनिल पटनाईक याबद्दल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “रत्नगिरीच्या परिसरात नव्याने सापडलेले मठ आठव्या शतकातील आहेत. इथे सापडलेले गौतम बुद्धांचे शिल्प भारतातील इतर कुठल्याही बौद्ध शिल्पापेक्षा अत्यंत वेगळे आहेत. बौद्ध धर्मातील अत्यंत समृद्ध असा हा वारसा भारताबाहेरसुद्धा गेला.
 
मागची दोन हजार वर्षे ओडिशातील भूमीतून भारतीयांचा जलमार्गाने दक्षिण आशियातील राष्ट्रांसोबत व्यापार सुरू असे. बाली, जावा, बर्मा (आजचे म्यानमार) या देशांसोबत दागिन्यांचा, मसाल्यांचा वापर सुरू होता. त्रपुसा आणि बहालिका हे दोन भाऊ ओडिशातील व्यापारी होते. ‘बुद्धवंश’ या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, दोघेही गौतम बुद्धांचे पहिले शिष्य होते. त्यांच्या माध्यमातून गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार श्रीलंका आणि म्यानमार इथे झाला होता. भारताच्या या समृद्ध वारशाला मात्र दुर्दैवाने गालबोट लागले. १३व्या शतकात आणि त्यानंतर सुरू झालेल्या परकीय आक्रमकांनी हे ज्ञानसंचित नष्ट करायला सुरुवात केली.“ आता सुरू असलेल्या उत्खननातून ओडिशामधील बौद्ध धर्म आणि त्यायोगे दक्षिण आशियामध्ये झालेल्या त्याचा प्रसार यासंदर्भातील संशोधनाला गती मिळेल, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. काही अभ्यासकांच्या मते, नैसर्गिक कलिंगच्या भूमीत सापडलेली स्मृतिशिल्पे भारतीय संस्कृतीतील बौद्ध धर्माच्या योगदानावर प्रकाश टाकणारी आहेत. वास्तुशिल्प, शिलालेख यांच्या माध्यमातून गौरवशाली इतिहासाचा एक विस्तारित पट आपल्यासमोर यानिमित्ताने उभा राहतो आहे.
 
रत्नगिरीचे हे वैभव बघण्यासाठी अनेक पर्यटक ओडिशाला भेट देत आहेत. रत्नगिरीबरोबरच ललितगिरी आणि उदयगिरी या दोन बौद्ध संकुलांचे दर्शन घडवणार्‍या ऐतिहासिक केंद्रांचासुद्धा विकास केला जात आहे. ऐतिहासिक वारसा जतन करताना भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक नवे अध्याय आपल्यासमोर उलगडत जात आहेत. समृद्धीचा आणि गौरवाचा हा वारसा येणार्‍या काळात आपल्यासाठी दीपस्तंभ असेल, यात शंका नाही.
 
उत्खननातून भारतीय संस्कृतीच्या भव्यतेचे दर्शन!
 
ओडिशातील रत्नगिरी येथील या परिसराला मी स्वतः भेट देऊन आलो आहे. उत्खननाच्या प्रकल्पामुळे बौद्ध धर्माचा अत्यंत समृद्ध वारसा आपल्यासमोर उलगडत जातो आहे. गुरू पद्मसंभवा यांच्या शिकवणुकीचा प्रभाव या भागात आपल्याला जास्त असल्याचे दिसून येते. त्या काळात असलेला बौद्ध धर्म आजच्या तुलनेत अत्यंत वेगळा होता. त्यातील ज्ञानशाखांची माहिती आपल्याला या उत्खननातून मिळू शकते. सरकारच्या मदतीने या वारशाचे पुनरुज्जीवन केले जात आहे, ही बाब कौतुकस्पाद आहे. देशविदेशातील पर्यटक यानिमित्ताने या स्थळाला भेट देतील.
 
- शंतनु परांजपे, इतिहास अभ्यासक
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121