मुंबई, दि.८ : प्रतिनिधी विक्रोळी आणि ट्रॉम्बे भागातील कोळी बांधवांनी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन ट्रॉम्बे जेट्टी विकसित करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी ट्रॉम्बे येथील मच्छीमार जेट्टीची पाहणी करून विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय उपयुक्त शर्वरी रणदिवे यांच्यासह विभागाचे अधिकारी आणि सागरी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
ट्रॉम्बे येथे एक जेटटी असून मच्छीमार बांधव मासेमारी करता जाण्या येण्यासाठी त्याचबरोबर पकडून आणलेले मासे उतरवण्यासाठी आणि नका नांगरण्यासाठी या जेट्टीचा वापर पूर्वीपासून करत आहेत. तथापि याकडे यापूर्वी पुरेशी लक्ष न दिले गेल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल गाळ साचला असून ओहोटीच्या वेळी मच्छीमार बांधवांना त्यांच्या होड्या दूरवर नांगरून, पकडून आणलेली मासळी छोट्या होडी मधून चिखलातून लोटत जेट्टीवर आणावी लागते आणि त्याचा कोळी बांधवांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. तसेच यामुळे त्यांना विविध शारीरिक आजारांनाही सामोरे जावे लागते. या कारणांमुळे कोळी बांधवांची तरुण पिढी इच्छा असूनही आपला परंपरागत व्यवसाय करत नाहीत. जर ट्रॉम्बे जेट्टीचा विस्तार केला तर २४ तास खाडीचे पाणी जवळ उपलब्ध आहे. त्याचा वापर होऊन कोळी समाजाची तरुण पिढी देखील मासेमारीच्या व्यवसायात उतरेल की ज्यामुळे मासेमारी व्यवसाय वाढवून कोळी बांधवांच्या उत्पन्नातही वाढ होईल असे नुकतेच झालेल्या भेटीत याभागात कोळी समाजाच्या शिष्टमंडळाने मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना सांगितले.
मुंबईतील विक्रोळी आणि ट्रॉम्बे येथील कोळी समाज बांधवांच्या समस्या आणि मागण्या समजून घेत प्रत्यक्ष फिल्डवर पाहणी करण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी ट्रॉम्बे जेट्टीला भेट दिली. ट्रॉम्बे येथे सध्या असलेल्या जेट्टीचा विस्तार करून या ठिकाणी ३०० मीटर लांबीची नवीन जेटी उभारण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी जाळी विणण्यासाठी शेड, प्रसाधनगृह, स्वच्छता गृह बांधण्यात येणार आहे. ६० कोटी ७५ लाख रुपयांच्या या कामाचा आराखडा तयार करून नाबर्डला सादर करण्यात आला आहे. नाबार्डच्या अर्थसहाय्यातून ही जेट्टी बांधण्यात येत आहे. या कामाचा मंत्री राणे यांनी सविस्तर आढावा घेतला.