भारतात असलेल्या प्रतिभेच्या तुलनेत पूर्वी क्रीडाक्षेत्र काहीसे मागेच होते. मात्र, ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून शालेय स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भारतामधील प्रतिभा दिसून येत आहे. ‘खेलो इंडिया’मुळे देशातील युवा प्रतिभेला चालना मिळत आहे. ‘खेलो इंडिया’च्या यशाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांचे मनोगत...
सात वर्षांपूर्वी २०१८ साली ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धा’ सुरू करून, आम्ही एका चळवळीची मशाल पेटवली. तेव्हापासून आतापर्यंत केलेल्या वाटचालीकडे ज्यावेळी मी मागे वळून पाहतो, त्यावेळी माझा ऊर अभिमानाने भरून येतो. हा अभिमान केवळ जिंकलेल्या पदकांच्या संख्येसाठीच नाही, तर ज्याप्रकारे ‘खेलो इंडिया’ने आपल्या देशामध्ये क्रीडा क्षेत्राचा कायापालट केला आहे, त्यासाठीदेखील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, ‘खेलो इंडिया’ ही संकल्पना उदयाला आली. ही संकल्पना केवळ पदके जिंकण्यापुरती मर्यादित कधीच नव्हती, तर क्रीडा क्षेत्रासाठी एक देशव्यापी चळवळ उभारण्यासाठी होती. एक अशी चळवळ ज्यामुळे, प्रत्येक बालकाला खेळण्याची आणि स्वतःचा सर्वंकष विकास करण्याची संधी उपलब्ध होईल. आज या चळवळीचे, एका बहुआयामी राष्ट्रीय कार्यक्रमात रुपांतर झाले आहे. ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धांच्या १६ आवृत्त्यांमध्ये पसरलेल्या या कार्यक्रमाद्वारे, युवा प्रतिभेची जोपासना होत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत आणि जगात आपला ठसा उमटवणारा क्रीडा क्षेत्रातील सामर्थ्यवान देश बनण्याच्या महत्त्वाकांक्षी लक्ष्याचा पायाही घातला जात आहे.
पहिल्या ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धां’नी(केआयएसजी), भारताच्या तळागाळाच्या स्तरापर्यंत क्रीडा क्रांतीचा पाया रचला. शालेय स्तरावरील स्पर्धांमध्येच, प्रचंड गुणवत्तांची निवड करत ‘केआयएसजी’ने युवा खेळाडूंचे संक्रमण आंतरशालेय स्पर्धांकडून, राष्ट्रीय आणि तिथूनच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांपर्यंत घडवणारा एक संरचनात्मक मार्ग निर्माण केला. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाच्या माध्यमातून, हजारो प्रतिभावान खेळाडूंना निवडण्यात आले असून, त्यांच्या प्रतिभेची जोपासना करण्यात आली आहे. यापैकी काही खेळाडूंनी तर अगदी ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये, भारताचे प्रतिनिधित्वदेखील केले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, ‘खेलरत्न पुरस्कार’ विजेती मनू भाकर आहे. जिने शालेय क्रीडा स्पर्धांपासून, विद्यापीठ क्रीडा स्पर्धांपर्यंत मजल मारली आणि त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये, दोन कांस्य पदक विजेती खेळाडू बनण्याची कामगिरी केली.
‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धां’चा ‘खेलो इंडिया क्रीडा चौकटी’मध्ये विस्तार करून, तळागाळात असलेल्या प्रतिभेचा शोध अधिक भक्कम झाला आहे. शाळा म्हणजे सुप्तावस्थेत असलेल्या प्रतिभेचे भांडार आहेत आणि या युवा प्रतिभेचा शोध घेऊन, त्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आणि त्यांना आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवण्यासाठी योग्य प्रकारचे स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव देण्यात, ‘खेलो इंडिया’ने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. आज शाळा आणि विद्यापीठ स्तरावरील ‘खेलो इंडिया’चे अजिंक्यवीर, अतिशय उच्च पातळीवर पदके जिंकत आहेत आणि हा या कार्यक्रमाच्या प्रभावीपणाचा एक दाखला आहे.
या स्पर्धांची सुरुवात झाल्यापासून ‘खेलो इंडिया’ने, या खेळांच्या १६ आवृत्त्यांचे आयोजन केले आहे. यामध्ये सहा युवा क्रीडा स्पर्धा, चार विद्यापीठ स्पर्धा, पाच हिवाळी स्पर्धा आणि एक पॅरा क्रीडा स्पर्धेचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेने भारताच्या क्रीडा परिदृश्यात, नव्या आयामांची भर घातली आहे. शालेय क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर होणार्या युवा क्रीडा स्पर्धा, युवा क्रीडापटूंसाठी आता अतिशय महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा बनल्या असून, भारताच्या भावी ऑलिम्पिकपटूंसाठी आपल्या गुणवत्तेकडे लक्ष वेधण्याचे स्थान बनू लागल्या आहेत. या विस्तारामुळे स्पर्धेच्या विविध स्तरांवरील खेळाडूंचे, विनासायास संक्रमण सुनिश्चित झाले आहे. ज्यामुळे भारताच्या क्रीडापटूंची एक फळी भक्कम होऊ लागली आहे.
‘खेलो इंडिया’ आता खेळाडूंची निवड करण्याचा एक कार्यक्रम न राहता, त्यापलीकडे तिची ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये आता कॉर्पोरेट्स, राज्य सरकारे, खासगी शिक्षण संस्था आणि तळागाळातील संघटना, यांसारख्या अनेक हितधारकांचा समावेश आहे. खासगी क्षेत्राच्या भूमिकेत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रायोजकत्व, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि खेळाडू मार्गदर्शन यांच्या माध्यमातून, कॉर्पोरेट्स आता क्रीडा विकासात गुंतवणूक करू लागल्या आहेत. सरकार ‘वन कॉर्पोरेट वन स्पोर्ट’ हा उपक्रम, ‘नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन’ आणि कॉर्पोरेट आस्थापनांच्या भागीदारीच्या माध्यमातून लक्ष्यित पाठबळ सुनिश्चित करून, क्रीडा क्षेत्रातील कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग आणखी वाढवण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
प्रादेशिक क्रीडा प्राधान्यक्रमांच्या आधारे ‘खेलो इंडिया’ केंद्रांचे(घखउ) प्रस्ताव देऊन, स्थानिक गरजांसोबत ताळमेळ साधणारा क्रीडा विकास सुनिश्चित करून, राज्य सरकारांनीदेखील पुढाकार घेतला आहे. त्याशिवाय देशाच्या विविध झोनमध्ये ‘ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रे’(ओटीसी) स्थापन करण्याचे नियोजन आहे. या जागतिक दर्जाच्या केंद्रातून, पॅरा-क्रीडा आणि देशी खेळांसह अतिशय उत्तम प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, ही केंद्रे अत्याधुनिक क्रीडा सुविधा, स्पोर्ट्स सायन्स आणि स्पोर्ट्स मेडिसीन यांनी सुसज्ज असतील. त्याबरोबरच उच्च दर्जाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी, खेळाडूंना प्राधान्यक्रमाच्या खेळांमध्ये पाठबळ देण्यासाठी, राज्य उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.
समावेशकता हा ‘खेलो इंडिया’चा मूलमंत्र आहे आणि ‘अचिव्हिंग स्पोर्ट्स माईलस्टोन बाय इन्स्पायरिंग विमेन थ्रू अॅक्शन’अर्थात अस्मिता लीगसारख्या उपक्रमांनी, महिलांना क्रीडा क्षेत्रात सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २०२१ सालापासून प्रारंभ झालेल्या ‘अस्मिता’ने, ८८०हून अधिक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. याचा फायदा मीराबाई चानूसारख्या, ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह एक लाखाहून अधिक महिला खेळाडूंना झाला आहे.
ज्यांना अनेकदा अतिरिक्त पाठबळाची गरज असते, अशा ग्रामीण भारतातल्या आणि लहान शहरांमधल्या खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या आवश्यकतेवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच भर दिला आहे. पैशाच्या अडचणीमुळे प्रतिभा मागे पडणार नाही, हे आम्ही ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून सुनिश्चित केले आहे. ‘खेलो इंडिया’ अंतर्गत आयोजित केलेल्या महिलांच्या फुटबॉल लीग स्पर्धातर, अरुणाचल प्रदेशमधील मोनिगॉन्गसारख्या दुर्गम भागांपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे यापूर्वी कधीही संघटित क्रीडा उपक्रमांचे आयोजन न झालेल्या भागांचाही, क्रीडाविषयक सहभाग वाढू लागला आहे.
पॅरा-खेळाडूंना ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’ने, एक समावेशक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ज्याच्या माध्यमातून अनेक खेळाडू आता, पॅरालिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धांसाठी पात्र ठरले आहेत. याव्यतिरिक्त, या उपक्रमाने योगासन, मल्लखांब, कलारीपयट्टू, थांग-ता आणि गटका यासारख्या स्वदेशी खेळांना, मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आहे. ‘खेलो इंडिया’ने युवा आणि विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा समावेश करून, त्यांचे जतन आणि संवर्धन सुनिश्चित केले आहे. स्वदेशी खेळांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या दिशेने, काम करण्याच्या उद्देशाने कबड्डी आणि खो-खो सारख्या पारंपरिक खेळांसाठी, भारताशी संबंधित आंतरराष्ट्रीय महासंघ स्थापन करण्याचे प्रयत्न केले जातील.
प्रशिक्षणाला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी, आम्ही ‘पास्ट चॅम्पियन अॅथलिट्स’(झउई) अर्थात माजी विजेते खेळाडू निवडून, त्यांना एक हजारपेक्षा जास्त ‘खेलो इंडिया सेंटर्स’ (केआयसी)वर मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले. त्याबरोबरच पतियाळाच्या राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील मोफत प्रमाणीकरण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, हे माजी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू आता भारताच्या प्रशिक्षण परिसंस्थेमध्ये योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि कौशल्य याचा फायदा भावी पिढीला मिळत आहे.
भारताची आगेकूच सुरू असताना, ‘खेलो इंडिया’ चळवळ हा केवळ एक क्रीडा विकास कार्यक्रम नाही, तर २०३६ साली भारतात ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या आणि या स्पर्धांमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळवण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी सुसंगत असलेला, एक धोरणात्मक उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणे हा या दृष्टिकोनातील, एक महत्त्वाचा पैलू आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी दावेदारी करण्याच्या आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भारतात आणण्याच्या राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या प्रयत्नांना पाठबळ दिले जात आहे.
२०३६ सालाकडे लक्ष ठेवून असताना, ‘खेलो इंडिया’चा प्रभाव केवळ पदकांच्या संख्येतूनच नव्हे, तर या उपक्रमाने लक्षावधी लोकांच्या आयुष्यांमध्ये घडवलेले परिवर्तन, तळागाळात घडवलेली क्रीडा क्रांती आणि भारतीय समाजात क्रीडा आणि तंदुरुस्ती यांची रुजवलेली संस्कृती, यांच्या माध्यमातून मोजला जाईल. सातत्याने होत असलेली गुंतवणूक, सहकार्य आणि नवोन्मेष यांच्या माध्यमातून, भारत लवकरच क्रीडा क्षेत्रातील जागतिक महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल करत आहे.
डॅा. मनसुख मांडविया
(लेखक केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा व कामगार आणि रोजगार मंत्री आहेत.)