जपानी भाषेत बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणार्या जपानी शिंकानसेनने, आपल्या अनोख्या हायस्पीड तंत्रज्ञानाने जगभरातील २४हून अधिक देशांतील वाहतूक व्यवस्था कायमची बदलून टाकली. जपानचा हाय-स्पीड रेल्वे प्रवास १९६४ साली, टोकियो ऑलिम्पिकच्या अगदी आधी, टोकाइदो शिंकानसेनच्या उद्घाटनाने सुरू झाला. या मार्गाने जपानची राजधानी टोकियो ओसाकाशी जोडली गेली. ३२० मैलांचा प्रवास अडीच तासांवर आला. यातूनच रेल्वे प्रवासात क्रांती घडली.
आज जपानमधील जवळजवळ दोन हजार मैलाचे जाळे देशातील चार मुख्य बेटांपैकी, तीन बेटांमधील प्रमुख शहरांना जोडतात. त्यात होन्शु, क्युशु आणि होक्काइडो या तीन बेटांचा समावेश आहे. हे हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क आशियातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात विस्तारलेले नेटवर्क आहे. ‘टोकाइदो शिंकानसेन’ ही जपानमधील पहिली बुलेट ट्रेन होती, जी आजही सर्वात व्यस्त मार्ग आहे. इतर प्रमुख मार्गांमध्ये ‘सान्यो शिंकानसेन’चा समावेश आहे, जो कान्साईला पश्चिम चुगोकू प्रदेशाशी जोडतो. ’तोहोकू शिंकानसेन’, जो कांटोपासून उत्तर तोहोकू प्रदेशापर्यंत पसरलेला आहे. कांटो आणि चुबू प्रदेशाला जोडणारा, ’जोएत्सु शिंकान्सेन’ आणि ’क्यूशू बेट’, क्यूशू शिंकान्सेन हे काही प्रमुख बुलेट ट्रेन मार्ग आहेत.
या द्वीपसमूहातील देशात सध्या कार्यरत असलेली सर्वात वेगवान ट्रेन, ’हायाबुसा शिंकानसेन’ आहे. ही ट्रेन तोहोकू आणि होक्काइडो मार्गांवर, ताशी १९९ मैलांपर्यंत वेगाने धावते. एखादी ट्रेन अपग्रेड केलेल्या ट्रॅकवर किमान १२४ मैल प्रतितास किंवा नवीन ट्रॅकवर १५५ मैल प्रतितास वेगाने धावते, तरच ती सामान्यतः हाय-स्पीड मानली जाते. २०हून अधिक देशांमध्ये आता हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क आहेत. शिंकानसेन ट्रेन दरवर्षी अंदाजे १५० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करतात. उल्लेखनीय म्हणजे, ६० वर्षांच्या ऑपरेशनमध्ये, एकही दुर्घटना किंवा अपघात झालेला नाही.
जपानच्या शेजारी देशांनीही हाय-स्पीड रेल्वेमध्ये प्रगती केली आहे. दक्षिण कोरियाने २००४ साली, सोल-बुसान ही पहिली हाय-स्पीड रेल्वेलाईन सुरू केली आणि आता त्यात दोन ऑपरेटर आणि एकूण ५४२ मैल लांबीच्या चार लाईन्स आहेत. २००७ सालापासून कार्यरत असलेली तैवानची हाय-स्पीड रेल्वे बेटाच्या उत्तर आणि दक्षिणेला जोडण्यासाठी २१७ मैलांचा ट्रॅक उभारते आहे. दरम्यान, चीनने अवघ्या दोन दशकात, जगातील सर्वात मोठे हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क तयार केले आहे. जपानची रेल्वे व्यवस्था एक चमत्कार असली, तरी चीन जगातील सर्वोत्तम हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये अग्रस्थानी आहे.
‘टोकाइदो शिंकानसेन’ चालवणारी सेंट्रल जपान रेल्वे कंपनी, आज जगातील सर्वात वेगवान ट्रेन असल्याचा अभिमान बाळगळते. जपानची ङ० सिरीज मॅग्लेव्हसह चाचणी दरम्यान ३७५ मैल प्रतितास वेगाने धावली आहे. ‘सुपरकंडक्टिंग मॅग्नेटिक लेव्हिटेशन’ तंत्रज्ञानामुळे, ट्रेनला कमी प्रतिकारसह जास्त स्थिरता मिळते. ही सिरीज २०२७ मध्ये सेवेत दाखल होण्याचा अंदाज आहे. शिंकानसेनचा जपानच्या आर्थिक विकासात मोठा वाटा आहे. हाय स्पीड ट्रेनचे नेटवर्कचे फायदे हे नेटवर्कसाठी निर्माण होणार्या नोकर्यांपासून, वेळेचा अधिक कार्यक्षम वापर, त्यातून निर्माण होणार्या वाढीव उत्पादकतेपर्यंत आहेत. यासोबतच स्थानिक व्यवसायांसाठी कच्चा माल आणि लोकांच्या वाहतुकीची वाढलेली उपलब्धता यापर्यंत हाय स्पीड ट्रेन आर्थिकदृष्ट्या अर्थपूर्ण आहेत. जपानने एक अतिशय तपशीलवार व्यवहार्यता अभ्यास केला आहे. त्यांच्या मूल्यांकनानुसार, आर्थिकदृष्ट्या परतावा दर सुमारे ११.८ टक्के आहे. म्हणून, आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प एक चांगला संकेत दर्शवितो.
जपानने जिथे जिथे बुलेट ट्रेन पोहचवली आहे, तिथे तिथे उत्पन्नात प्रचंड वाढ झाली आहे. जर सामान्य वाढ ६०-७० टक्के असेल, तर हाय-स्पीड रेल्वे धावणार्या भागात वाढ १५० टक्के आहे. ट्रेनचा वक्तशीरपणा एका मिनिटापेक्षाही कमी आहे. १९६४ साली बुलेट ट्रेन विकसित करणारा जपान हा पहिला देश होता. भारताला बुलेट ट्रेनच्या उभारणीत, जपान संपूर्ण सहकार्य करते आहे. लवकरच भारतातही पहिली बुलेट ट्रेन धावेल. या मार्गावर रेल्वे, ट्रान्झिट ओरिएंटेड विकास होईल. या प्रकल्पात ‘मेक इन इंडिया’चा सहभाग असल्याने, स्थानिक उद्योगाला फायदा होईल. या प्रकल्पामुळे भविष्यात अनेक संयुक्त उपक्रमही राबवले जातील.