अरविंद केजरीवालांचा बुरखा फाटला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
08-Feb-2025
Total Views | 91
पुणे : दिल्लीतील विजयाने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी दिली.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असून आपचा दारूण पराभव झाला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "दिल्ली विधानसभेवर २७ वर्षांनंतर भाजपचा झेंडा रोवला गेला, याचा आनंद आहे. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मनापासून अभिनंदन. दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवला आहे. या विजयाने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासने देऊन लोकांना भटकवत ज्याप्रकारे त्यांनी राज्य केले त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे. खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे. दिल्लीची जनता लोकसभेत मोदीजींवर विश्वास दाखवायची. पण विधानसभेत मात्र, आमची पीछेहाट झालेली आम्ही बघितली. मात्र, आता दिल्लीच्या जनतेने एक प्रचंड मोठा विजय दिलेला आहे. हे विकासाला आणि मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेले मत आहे. भाजपचे सरकार निश्चितपणे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"अण्णा हजारेंचा हात पकडून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून आपले राजकारण सुरु करणारे अरविंद केजरीवाल भ्रष्टाराचे आयकॉन बनले. याचे उत्तर आता दिल्लीच्या जनतेने दिले आहे," अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
दिल्लीचा मराठी माणूस मोदीजींच्या पाठीशी!
"लोकांनी मोदीजींना साथ देण्याचे ठरवले होते. या यज्ञामध्ये निखारी समिधा आमची पण आहे. त्यात दिल्लीचा मराठी माणूस मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला, याचा मला मनापासून आनंद आहे. दिल्लीमध्ये आपल्याला काहीच मिळणार नाही, हे राहुल गांधींना आधीच लक्षात आले होते. त्यामुळे हरल्यानंतर काय बहाणे सांगायचे याची आधीच त्यांनी तयारी करून ठेवली. एक है तो सेफ है हा नारा दिल्लीतसुद्धा चालला. लोकसभेनंतर संपूर्ण देशाने बटेंगे तो कटेंगे हा अनुभव घेतला. त्यामुळे एक है तो सेफ है चा नारा संपूर्ण देशाने स्विकारला आणि मोदीजींच्या या नाऱ्यावर देश एकत्र आला. हरियाणा, महाराष्ट्र आता दिल्ली आणि यापुढे येणाऱ्या राज्यांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळेल."
कुणाच्याच हाताने इतिहासाचे विकृतीकरण होऊ नये!
"छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच बोलले पाहिजे. लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारे इतिहासाचे वर्णन किंवा विकृतीकरण कोणाच्याच हाताने होऊ नये. राहुल सोलापूरकर यांनी याबाबत माफीसुद्धा मागितली आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई होईल."
लाडकी बहिण योजनेत नवीन निकष नाही!
"लाडकी बहिण योजनेत कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळी जे निकष होते त्यापेक्षा वेगळा ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होत आहे. काही लाडक्या बहिणींनी निकषाबाहेर गेल्याने स्वत: हा लाभ घेणे सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही कुणाचेही पैसे परत मागणार नाही. पण आम्हीसुद्धा जनतेच्या पैशाचे संरक्षक आहोत. आम्हालासुद्धा महालेखाकाराला उत्तर द्यावे लागते. त्यामुळे नियमाच्या बाहेर कुणाला फायदा पोहोचत असल्यास त्यांचा आक्षेप येणारच आहे. जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा बंद होईल. याची सुरुवात आम्ही केली असून त्यात कुठलेही नवीन निकष नाहीत," असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले.