राहूल गांधींनी २०२९ ची निवडणूक माझ्या विरोधात लढावी! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खुले आव्हान
08-Feb-2025
Total Views |
पुणे : राहूल गांधींनी कामठी विधानसभेतून २०२९ ची निवडणूक माझ्या विरोधात लढावी, असे खुले आव्हान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी त्यांनी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "काँग्रेसने कधीही जनतेच्या विकासाचा मार्ग निवडला नाही. दिल्लीचा निकाल हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचा विजय आहे. डबल इंजिन सरकराच विकास करू शकते, हे देशाच्या जनतेने स्विकारले आहे. जनतेला मोदीजींच्या नेतृत्वात विकास दिसत असल्याने देशाच्या ७५ टक्के भूभागावर भाजपचे सरकार आले आहे. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित राज्याचा संकल्प होणार आहे. दिल्लीचा हा विजय २७ वर्षांनंतरचा ऐतिहासिक विजय आहे. दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री राहणार आहे. जनतेने ज्या अपेक्षेने आम्हाला मते दिली ती अपेक्षा मोदीजीच पूर्ण करु शकतात, हा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या विकासाच्या संकल्पपत्रावर जनतेने आम्हाला मते मिळाली."
"उद्या किंवा परवा दिल्लीमध्ये ईव्हीएम मशीन खराब झाली होती, असे एक विधान काँग्रेसकडून येईल. तसेच सकाळी ९ वाजताचे महाराष्ट्राचे महान प्रवक्तेसुद्धा बोलायला सुरुवात करतील.परवा त्यांनी कामठी विधानसभेवर आक्षेप घेतला होता. राहुल गांधींनी कामठीचा अभ्यास करावा किंवा कधीतरी तिथून निवडणूक लढवावी. राहुल गांधींनी २०२९ ची निवडणूक कामठी विधानसभेत माझ्या विरोधात लढावी, असे माझे आव्हान आहे. कामठी विधानसभेत २५ वर्षांपासून भाजप जिंकते आहे आणि राहूल गांधी तिथे गडबड झाली असे सांगतात. राहुल गांधी माझ्या विरोधात लढल्यास मी जिंकून दाखवेन. माझी जनता आणि आमचे कार्यकर्ते प्रचंड निष्ठावान आणि प्रामाणिक आहे. दीड लक्ष परिवारांशी माझे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे कामठी विधानसभेविषयी राहुल गांधींनी बोलू नये. ते माझ्याविरोधात लढल्यास मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही," असेही ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच!
"ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच निर्णय होईल. फेब्रुवारी महिन्यात निर्णय झाल्यास मार्च, एप्रिल, मे पर्यंत निवडणूका होऊ शकतात, अशी अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आता खूप दिवस रिकाम्या राहू नये आणि लवकर निवडणूका व्हाव्या, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही महायूती म्हणून निवडणूका लढवू हे निश्चित केले आहे. परंतू, याबाबत एकदा आमच्या स्थानिक युनिटसोबत चर्चा करून निर्णय घेऊ," असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "भाजप पक्ष आणि मंत्र्यांचा समन्वय राहावा. त्या खात्याचे निर्णय समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाचा एक अधिकृत कार्यकर्ता आमच्या मंत्र्यांकडे नेमण्यात आला आहे. एकनाथ शिंदेजी हा एक सज्जन कार्यकर्ता आहे. त्यांनी अनेक त्याग केले आहेत. आमच्या सरकारमध्ये आम्ही सगळे चांगले काम करत आहोत. आमची महायूती मजबूत असून पुढचे २५ वर्ष महाराष्ट्रात सरकार चालवेल आणि देशात विकसित महाराष्ट्र करेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.