चिकू महोत्सवामुळे ग्रामीण पर्यटनाचा विकास होणार! मंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन
08-Feb-2025
Total Views | 45
पालघर : चिकू महोत्सवामुळे ग्रामीण पर्यटनाचा विकास होणार आहे, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे २ दिवसीय ‘चिकू महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, संदीप राऊत, शारदा पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
मंत्री अतुल सावे म्हणाले की, "चिकू आणि त्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ, पारंपरिक वारली चित्रकला आणि स्थानिक ग्रामीण संस्कृतीचा अद्वितीय अनुभव या महोत्सवात मिळत आहे. आपल्या उत्पादनांचे सादरीकरण करण्याची स्थानिक शेतकऱ्यांना ही एक उत्तम संधी आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून चिकू उत्पादकांना बाजारपेठ मिळेल. यासोबतच ग्रामीण पर्यटनाचा मोठा विकास होण्यास मदत होईल," असे ते म्हणाले.
"रूरल एंटरप्रुनर्स वेल्फेअर फाउंडेशन (REWF) यांच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे यंदा ११ वे वर्ष असून येणाऱ्या काळात या भागाचा विकास वेगाने होईल. या विकास कामात नागरिकांचा सहभाग असायला हवा. काही काळात पालघर जिल्हा हा चौथी मुंबई होणार आहे. चिकूच्या माध्यमातून अनेक वस्तू तयार करण्यात येत असल्याने उद्योजकांची आर्थिक स्थिती सुधारेल," असेही ते म्हणाले.