केंद्रीय अर्थसंकल्पा- पाठोपाठ रिझर्व्ह बँकेकडूनही मध्यमवर्गीयांना भेट
08-Feb-2025
Total Views | 26
2
मुंबई : RBI भारत सरकारने शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी झालेल्या अर्थसंकल्पातून कर कमी करत देशातील मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला होता. त्यापाठोपाठ आता रिझर्व्ह बँकेनेही शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या पतधोरण बैठकीत रेपो दरांत २५ बेसिस पाँईंट्सची कपात करत ६.२५ टक्क्यांवर रेपो रेट स्थिर ठेवला.
यामुळे बँकांची कर्जे स्वस्त होणार असून त्यामुळे आता भारतीय बाजारात गुंतवणुकीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही पहिलीच पतधोरण बैठक होती. “देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि भारतीय बाजारात मागणीला चालना देण्यासाठी या पतधोरण समितीत एकमताने निर्णय घेण्यात आला. यातून देशातील बदलत्या आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक सजगतेने लक्ष ठेवत आहे.
तरीही अर्थव्यवस्थेसाठी गरजेचे उपाय बँकेकडून योजले जातील,” याचा पुनरुच्चार मल्होत्रा यांनी केला. याशिवाय, “लोकानुनयी धोरणे न आखण्याचाही प्रयत्न बँकेकडून केला जाईल,” असे मल्होत्रा यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मत प्रदर्शित करत असताना मल्होत्रा यांनी अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणाची ग्वाही देत “कोरोनासारख्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था चांगली स्थिती टिकवून होती. वाढत्या महागाईसोबतच जागतिक अर्थसंकटाचा भारताने व्यवस्थित सामना केला,” अशा शब्दांत मल्होत्रा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमपणाचे कौतुक केले.
देशांतर्गत मागणीला चालना देण्यासाठी तसेच मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी करकपात करुन मध्यमवर्गाच्या खर्चाला चालना देण्याची मागणी उद्योगक्षेत्राकडून केली जात होती. त्यानुसार भारतीय अर्थसंकल्पात करकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. आता रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. आता रिझर्व्ह बँकेकडूनही मध्यमवर्गाला दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.