मुंबई (ओंकार मुळ्ये) : (AAP Result in Muslim Area) दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असून भाजप २७ वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. भाजप ४८ जागांनी आघाडीवर असून आपची गाडी सध्या २२ जागांवरच अडकून आहे. यंदाच्या निवडणुकीत 'आप'ची अवस्था फारच बिकट होणार असल्याचे यातून दिसते आहे. २०१३ पासून सातत्याने आपले वर्चस्व असलेल्या मुस्लिम भागातही 'आप'ला मते मिळत नसून, चांगलाच धक्का बसल्याचे पाहायला मिळते आहे.
हे वाचलंत का?: मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांचा दारूण पराभव
दिल्लीच्या मुस्तफाबाद जागेवर 'आप'ला दारूण पराभवाला सामोरे जावे लागू शकते. भाजपचे मोहन बिश्त हे आपचे आदिल अहमद खान यांच्यावर ३८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. हा फरक आणखी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसची मते कापल्याचा मुद्दाही येथे ऐरणीवर आला आहे. एआयएमआयएमचे उमेदवार ताहिर हुसेन यांचीही मुस्लिम मतांच्या विभाजनात भूमिका असल्याचे मानले जाते.
मुस्लिमबहुल जंगपुरा मतदारसंघातही भाजप आघाडीवर आहे. येथे भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी आपचे मनीष सिसोदिया यांना मागे टाकले आहे. मनीष सिसोदिया यांनी यापूर्वी पटपरगंजमधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जागा बदलून ते येथे आले. मात्र, त्यांचा लाभ येथे न झाल्याचेच दिसते आहे.
कस्तुरबा नगर मतदारसंघातही भाजप आघाडीवर आहे. कस्तुरबा नगरमधून भाजपचे नीरज बैसोया आघाडीवर आहेत. ते आपचे नरेश पहेलवान यांच्यापेक्षा साधारण १९ हजार मतांनी पुढे आहेत. शकूर बस्ती मतदारसंघातून भाजपचे करनैल सिंह पुढे आहेत, तर आपचे सत्येंद्र जैन यांना १९ हजार मतांनी मागे टाकले आहे.
दिल्लीची प्रसिद्ध ओखला जागा, जिथून अमानतुल्ला खान आमदार झाले होते; यंदाच्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा १५ हजार मतांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळतंय. मात्र या जागेवरील मुस्लिम मते आप आणि काँग्रेसमध्ये विभागली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.