‘कुतूहल’ ही एक अशी गोष्ट आहे, जी एखाद्या व्यक्तीला सतत नवीन काहीतरी विचार करायला प्रवृत्त करत असते. अशाच काही गोष्टींचे कुतूहल सतत वाटत होते, भक्ती म्हणजे नक्की काय? एखादी बाई जिचे वर्षभर गुडघे दुखत असतात, ती अनेक किलोमीटर वारीमधून चालत माऊलीपर्यंत कशी पोहोचते? दुखण्यावर औषध घेणारी मंडळी तब्येतीची कुठलीही तक्रार न येता अखंड गिरनार कसा चढून जातात? साधा पंख्याचा वारा सहन न होणारी माणसे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अमरनाथाचे दर्शन घ्यायला कसे जातात? असे काय आहे की, जे या सगळ्या भक्तांना आपल्या देवाशी घट्ट जोडून ठेवते? काहीही झाले तरी त्यांची श्रद्धा आढळ राहते? याच गोष्टींचा विचार करताना आपली मंदिरे डोळ्यासमोर येतात. श्रद्धा आणि मंदिर यांचा परस्पर संबंध शोधताना अनेक वेगवेगळे पैलू आपसूकच समोर येत गेले. या वेगवेगळ्या पैलूंचा आणि भारतातल्या फारशा परिचित नसलेल्या मंदिरांचा सर्वांना परिचय करून देण्यासाठीचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच ही ‘जिज्ञासा’ लेखमाला...
इंद्रनील सदानंद बंकापुरे ‘पत्रकारिता आणि संवाद’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पुण्यामधील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथून ‘इंडोलॉजी’ या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. तिथे ‘मंदिर स्थापत्य आणि मूर्ती विज्ञान’ या विषयांची भुरळ पडली आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास सुरू झाला.
भारताच्या चारही कोपर्यांपर्यंत मागच्या दोन हजार वर्षांत अनेक मंदिरे उभारली गेली. शिव, शक्ती, विष्णू, गणपती आणि सूर्य अशा पाच प्रमुख देवतांबरोबरच अनेक वेगवेगळ्या देवता या मंदिरांमध्ये अधिष्ठात्री देवता म्हणून स्थानापन्न आहेत. मध्ययुगामध्ये परकीय आक्रमकांकडून काही हजार मंदिरे उद्ध्वस्त केली गेली. त्यातली अनेक मंदिरे पुन्हा उभारलीदेखील गेली. मंदिरांचा विध्वंस हा फक्त तिथे जमा असलेल्या संपत्तीची लूट करण्यापुरता मर्यादित नसून, भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे लक्षण नष्ट करण्यासाठी आणि पर्यायाने इथल्या समाजाला ताकद देणार्या स्रोताचा नाश व्हावा, यासाठी घेतलेला विचारपूर्वक निर्णय होता. मंदिरे तोडली, मूर्ती भग्न झाल्या. पण, त्यातले सौंदर्य नष्ट करता आले नाही. आज भारताच्या कानाकोपर्यात अशी अनेक सुंदर मंदिरे आहेत, जी फारशी कुणाला माहीत नाहीत. ती आपल्यात दगडी भिंतींमध्ये शेकडो वर्षांचा इतिहास, कथा, कलाविचार, तत्त्वज्ञान, विज्ञान यांना सामावून वसलेली आहेत आणि वाट बघत आहेत, तुमच्या माझ्यासारख्या या मंदिरांवरती प्रेम करणार्या जिज्ञासू लोकांची. या लेखमालेतून अशा अनेक मंदिरांचा परिचय आपण करून घेणार आहोत.
हिंदू मंदिरे ही फक्त जाऊन नमस्कार करून येण्याइतकी मर्यादित नाहीत, तर ती प्रतिभावान विचारांचे प्रतिबिंब म्हणून आपल्यासमोर आहेत. मंदिरे आपल्याला काय देतात?
मंदिरे भरकटलेल्यांना मार्ग दाखवतात, कलाकारांना प्रोत्साहन देतात, श्रद्धाळूंना विश्वास देतात, विज्ञाननिष्ठांना प्रश्न देतात, भक्तांना समाधान देतात, असे प्रत्येकाला काही ना काही ही मंदिर हे नक्की देतात.
आपली मंदिरे धर्माबरोबरच समाजजीवनाच्या केंद्रस्थानीदेखील आहेत. आजही अनेक मंदिरांच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. या मंदिरांमध्ये आपल्याला सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक विचार, धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवास, ऐतिहासिक माहिती, सामाजिक आणि आर्थिक घडामोडी अशा अनेक गोष्टींचा परिचय होतो. त्या त्या कालखंडामध्ये या सर्व गोष्टी कशा असतील, याची प्रचितीदेखील या मंदिरातून होते आणि म्हणूनच ‘वारसा पर्यटन’ हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्यासमोर येतो.
मंदिरांना केंद्रस्थानी ठेवून धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनासाठी भारतामध्ये येणार्या परदेशी पर्यटकांची संख्यादेखील मागच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. फक्त प्रमुख मंदिरांमधून दरवर्षी काही हजार कोटी रुपये भारताच्या अर्थचक्रामध्ये येतात. म्हणजेच, आपण ज्या वेळेला आडवाटेवरच्या मंदिरांना भेट देतो, त्यावेळी आपण फक्त ते मंदिर किंवा गाव यांना नाही, तर आपल्या देशाच्या अर्थचक्राला हातभार लावत असतो. आज मंदिरांवर आधारित अर्थव्यवस्था किती परिणामकारक आहे, याची प्रचिती आपल्याला वाराणसी, अयोध्या, तुळजापूर, कोल्हापूर, तंजावर, बदामी अशा अनेक ठिकाणी भेट दिल्यावर लक्षात येते. वारसा पर्यटन आणि देश बांधणी हे हातात हात घालून जाणारे दोन मुद्दे आहेत, हे आता आपल्याला लक्षात आले असेल.
साधारण हजार वर्षांपूर्वी भोज नावाच्या राजाने ‘तत्त्वप्रकाश’ नावाचा एक सुंदर ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्याने कलेची समर्पक व्याख्या काय असेल, याबद्दल चर्चा करताना त्याने एक श्लोक लिहिला आहे,
व्यञ्जयति कर्तुशक्तिं कलेसि तेनेह कर्थिता सा।
अर्थ - ईश्वराच्या कर्तृत्वशक्तीचा जो आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो, तीच कला होय.
आपले प्राचीन भारतीय स्थपती, कलाकार आणि तत्त्वज्ञ मंदिरांच्या बाबतीत हा श्लोक यथार्थपणे खरा ठरवतात. कलेच्या आधाराने संस्कार आणि संस्कारांच्या आधाराने संस्कृती, असा प्रवास मंदिरांमध्ये आपल्याला अनुभवता येतो. एखादा समाज संस्कारक्षम असला की, मातृभूमीचा विकास आणि विचार हा कायमच संपूर्ण आयुष्यभर प्रत्येकाच्या मनात आणि कृतीत अधोरेखित झालेला असतो.
या लेखमालेचा अजून एक उद्देश आहे. आपण सुरुवातीला चर्चा केली त्याप्रमाणे, कुतूहल किंवा जिज्ञासा मनामध्ये जागी झाली की, प्रश्न आपोआप पडायला लागतात. एकदा प्रश्न पडायला लागले की, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी अभ्यास सुरू होतो. अभ्यास झाला की, त्याचे मनन होते आणि मग सुरू होतो आत्मबोधापर्यंतचा प्रवास. नवीन जाणीवांचा प्रवास प्रत्येक वाचकाला अनुभवता यावा म्हणून हा लेखमाला प्रपंच.
आपण या लेखमालेमध्ये काश्मीर, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, त्रिपुरा अशा वेगवेगळ्या राज्यांमधल्या सुंदर मंदिरांची - वारसा स्थळांची ओळख करून घेणार आहोत. त्या ठिकाणी जाताना काय काळजी घ्यावी? काय तयारी करावी? याचादेखील समावेश लेखांमध्ये करायचा आपला प्रयत्न असेल. याचबरोबर त्या मंदिरांचे तत्त्वज्ञान आपल्याला समजावे यासाठीदेखील आपण प्रयत्नशील असू.
‘जिज्ञासा’ या मंदिरांच्या माहिती देणार्या मालिकेत आपण त्या जागेचे स्थानमाहात्म्य, तिथे होऊन गेलेल्या राजसत्ता, मंदिरांमधली देवता, मंदिरांचे स्थापत्य, काही संदर्भ ग्रंथ, तिथे असणारी काही शिल्प, भेट देण्याच्या अनुषंगाने सूचना असे अनेक पैलू प्रत्येक लेखात घेतो आहोत. अपेक्षा आहे हा प्रामाणिक प्रयत्न आपला सुज्ञवाचक वर्ग नक्की स्वीकारेल.
या संपूर्ण मालिकेत ज्या काही चुका होतील त्या माझ्या आहेत आणि जे काही आवडेल, भावेल ते सर्व आपले गुरूजन आणि अज्ञात स्थपती यांचे आहे.
या लेखमालेची सुरुवात आपण भारताचा नंदनवन असणार्या काश्मीरमधल्या मार्तंड मंदिरापासून करणार आहोत. (क्रमश:)
इंद्रनील सदानंद बंकापुरे
(लेखक मंदिर आणि
मूर्ती अभ्यासक आहेत.)
7841934774