कावीळ झालेल्याला सगळे पिवळेच दिसते, असे म्हणतात. पण, संजय राऊतांना सगळीकडे ‘काळे’ दिसू लागले आहे. बहुधा त्यांना राजकीय कावीळ झाली असावी. ‘वर्षा’ बंगल्यावर रेड्याची शिंगे पुरली, अन्य कोणा मुख्यमंत्र्याला हा शासकीय बंगला फळू नये, म्हणून काळी जादू करण्यात आल्याची बडबड राऊतांनी केली खरी. वास्तविक दुसर्यावर खोटेनाटे आरोप करण्याआधी राऊतांनी स्वतःकडे आणि आपल्या ‘आका’च्या कारनाम्यांकडे डोळसपणे पाहायला हवे. ‘आका’ने कलानगर परिसरात उभारलेल्या ‘मातोश्री-२’ बंगल्याबाबतच्या सुरस कथांवर राऊतांनी अग्रलेख खरडावे. या आठमजली आलिशान बंगल्याबाबत अनेक सुरस कथा राजकारण्यांकडून ऐकायला मिळतात.
‘मातोश्री-२’ मध्ये म्हणे ठाकरे घरातील व्यक्तींशिवाय कोणालाच प्रवेश दिला जात नाही. ठाकरे म्हणजे उद्धव, रश्मी, आदित्य आणि तेजस. इतर कोणी सख्खे-चुलत वर्ज्यच! त्यातल्या त्यात वरुण सरदेसाई आणि त्यांची बहीण केतकी यांना वहिनींच्या परवानगीने ‘एन्ट्री’ मिळते. तेही माहेरकडचे म्हणून! बरे, संजय राऊतांसारख्या कुणा हौशा-गवशाने नजर चुकवून आत शिरण्याचा प्रयत्न केलाच, तर दारावर बंदुकधारी उभेच. ही सुरक्षा भेदणे महाकठीण. कारण, तिचे ‘रिपोर्टिंग’ थेट वहिनींकडे! एका जगप्रसिद्ध उद्योगपतीच्या कंपनीकडून ही खासगी सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली म्हणे. त्यामुळे संजय राऊत काय, मिलिंद नार्वेकरदेखील आत डोकावण्याची हिंमत करीत नाहीत, अशी राजकीय चर्चा! बाळासाहेब हयात असताना ‘मातोश्री’चे दार बंद झाले नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या पुत्राने आपल्या नव्या घराचे दरवाजे किमान ‘किचन कॅबिनेट’साठी तरी उघडे करायला हवे होते. पण, नाहीच. त्यांना कशाची भीती वाटत असावी? ‘मातोश्री-२’ बंगल्यात काही लपवून ठेवले आहे की काय, ज्यामुळे सुरक्षारक्षकांचे इतके भक्कम कडे तैनात करावे लागले. त्यामुळे ‘मातोश्री-२’चे हे बाहेरच्यांसाठी मृगजळच. खरं तर मृगजळ ही एक भ्रामक संकल्पना. पण, ‘मातोश्री-२’ अस्तित्वात असूनही ठाकरेंपलीकडच्यांसाठी ते जणू मृगजळच ठरावे. राऊतांसारख्या कोणा आपल्याच माणसाने काळी जादू करू नये, गुवाहाटीवरून आणलेली शिंगे पुरून ठेवू नयेत, म्हणून ही खबरदारी घेतली जात असावी का? राऊतांनीच शोध घ्यावा आणि अगदी नेहमीसारखेच ‘रोखठोक’ व्यक्त व्हावे!
काजव्याचा उजळ
जसा काजव्याचा उजळ त्याच्या अंगाभोवती, तसाच उद्धव ठाकरेंचाही. ‘बाळासाहेब ठाकरे’ नावाची कवचकुंडले त्यांनी स्वतःहून बाजूला केल्यामुळे शिवसैनिकांनीही उद्धवना बाजूला केले. जे सोबत राहिले, ते एकतर विशेष लाभार्थी होते किंवा ठाकरे आडनावाप्रती सहानुभूतीवाले. पण, उद्धव ठाकरेंच्या राजकारणाची भरकटलेली दिशा पाहून त्यांनीही कुस बदलली नसेल, तर नवलच. विधानसभा निवडणुकीनंतर पावलोपावली त्याचा प्रत्यय येतो आहे. पालिका निवडणूक जाहीर होताच, त्याची धग अधिक तीव्र होत जाईल. आता कितीही ठिगळ लावण्याचा प्रयत्न केला, तरी गळती रोखणे हाताबाहेर गेल्याची बाब उद्धवदेखील नाकारणार नाहीत.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. ‘झुकेंगे नही...’ म्हणणार्या उबाठा गटाला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. मतदारांनी असा दणका दिला की, बर्याच ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. मुंबई वगळता अनेक जिल्ह्यांमध्ये नावापुरते खंबीर नेतृत्वही उरले नाही. अन्य पक्षांतून आयात करावे, तर कुणी तयार होताना दिसत नाही. त्यात फोफावलेल्या पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्ष गटातटांत विखुरला गेला. बरे, वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी दखल घेणे अपेक्षित. पण, त्यांना घरातल्या कुरबुरी निस्तरताना वेळ नाही, ते बाहेर काय डोकावणार? त्यामुळे अस्वस्थांची फौज वाढत चाललेली दिसते. बरे, निवडून आलेल्या आमदारांमध्येही प्रचंड चलबिचल. सत्तापदे नाहीत, ना महामंडळांचा आधार, ना विकासनिधीची ताकद. त्यामुळे शर्यतीत आपण मागे पडत चालल्याची भावना त्यांच्यात वाढीस लागली आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजेल. त्यावेळी काय? असा सवाल माजी नगरसेवक, जिल्हा परिषद वा पंचायत समित्यांच्या सदस्यांना सतावतो आहे. या निवडणुकीत आपल्यामागे कोणाचा तरी हात असावा, जेणेकरून त्यांच्या मदतीने मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यात, मतदारांना खुश करण्यात यश मिळेल, अशी मानसिकता. त्यातील काहींनी पडद्यामागे गणिते जुळवली, काहींची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. एकदा का निवडणूक जाहीर झाली, की ते टप्प्यात कार्यक्रम करतील. तोवर सुज्ञास सांगणे न लगे!