त्यांचे रक्त आणि वारसा!

    07-Feb-2025   
Total Views | 57
 
bangbandhu 
 
बांगलादेशच्या मुसलमानांचा इमान काय वर्णावा? दि. ५ फेब्रुवारी रोजी हे ‘२४ रिव्होल्युशनरी स्टुडंट-जनता’ संघटनेचे कट्टरपंथी बांगलादेशाचे संस्थापक वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या घरात घुसले. त्यांनी ते घर तोडले, फोडले, उद्ध्वस्त केले आणि जाळून त्याची राख केली. कृतघ्न, स्वार्थी आणि नीतिहीन अशीही बांगलादेशी कट्टरपंथी पिलावळ!
 
त्यांनी असे का केले? तर, शेख हसीना यांना सध्या भारताने आश्रय दिला आहे. बांगलादेश अवामी लीग पक्षाच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरावे आणि न्याय मागावा, असे शेख हसीना यांनी आवाहन केले. मात्र त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरण्याआधीच ‘२४ रिव्होल्युशनरी स्टुडंट-जनता’ या संघटनेच्या नावावर कट्टरपंथी बांगलादेशी मुसलमानांनी बुलडोझर रॅली काढली. त्यांनी शेख हसीना यांचे पिता मुजीबुर रहमान जिथे वास्तव्यास होते, त्या ऐतिहासिक घरालाच लक्ष्य केले.
 
तसेही या लोकांची हीन मानसिकता सगळ्या जगाने यापूर्वीही पाहिली आहेच. बांगलादेशामध्ये सत्तांतर होताना बांगलादेशाचे मुस्लीम युवक रस्त्यावर उतरले. लुटालूट करताना त्यांनी आजीच्या वयाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे अंतर्वस्त्र गर्वाने मिरवलेे. बांगलादेशाचे पूर्णत: नैतिक अध:पतन झाले आहे. काल परवाच बांगलादेशवर सध्या सत्ताधारी असलेल्या युनूस सरकारने निर्देश नव्हे फतवाच काढला की, सरकारी रेडिओ आणि टीव्ही चॅनल्सवर आता पाकिस्तानच्या विरोधात काहीही प्रसारित केले जाणार नाही. तसेच, १९७१च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामा’च्या वेळी पाकिस्तानी सैन्याने जे काही अत्याचार केले, त्याबद्दल काहीही बोलले जाणार नाही. पाकिस्तानी नेते मोहम्मद अली जिना, जुल्फिकार अली भुटो, अयूब खान आणि टिक्का खान यांच्याविरोधात एक शब्दही प्रसारित करू नये.
 
बांगलादेश मुक्तिलढ्यादरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी ३० लाख बांगलादेशीयांची हत्या आणि चार लाख बांगलादेशी महिलांवर सामूहिक अत्याचार केला होता. अत्याचाराने एक कोटी बांगलादेशी विस्थापित झाले होते. मात्र, युनूस सरकारने यासंदर्भात कोणत्याही आठवणी जागृत ठेवण्यास नकार दिला आहे. युनूस सरकार कट्टरपंथीयांच्या हातचे बाहुलेच बनले आहे. भारताचा तिरस्कार आणि अत्याचार करणार्‍या पाकिस्तानचा पुळका, बांगलादेशातल्या कट्टरपंथीयांना का यावा? अत्याचार करणार्‍या पाकिस्तानचे ते समर्थन का करतात? बांगलादेशमध्ये पाकिस्तानला समर्थन करणारे आणि हिंदूंचा नरसंहार करणारे हे जे कट्टरपंथी आहेत, त्यांचे रक्त बांगलादेशी आहे का? या संशयाला वाव आहे. कारण, १९७१ सालच्या युद्धासंदर्भात अनेक संशोधने करण्यात आली. त्यानुसार त्याकाळात दररोज ट्रकच्या ट्रक भरून पूर्व पाकिस्तानच्या शेकडो महिलांना पाकिस्तानी सैनिकांच्या कॅम्पवर जबरदस्तीने पाठवले जात असत. पाकिस्तानी सैनिक त्यांंच्यावर सामुदायिक अत्याचार करत.
 
युद्धानंतर बांगलादेशमध्ये पीडितांना आरोग्य सेवा देण्यासाठी गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डॉक्टर जेफ्री डेविस यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले, “युद्धानंतर बंदी बनवल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना सांगितले होते की, पाकिस्तानच्या सेनेचा तत्कालीन सेनाप्रमुख टिक्का खान याने सैनिकांना बांगलादेशी महिलांवर सामूहिक अत्याचार करायला सांगितले. कारण तसे केले, तर बलात्कारामुळे जन्मलेल्या महिलांच्या पोटी पाकिस्तान्यांची मुलं जन्म घेतील. अख्खी एक पिढी पाकिस्तानी रक्ताची असेल.” जेफ्री डेविस यांच्या म्हणण्यानुसार, ते एका दिवसात शेकडो बलात्कारित महिलांचे गर्भपात करत होते. भयंकर! या अनुषंगाने वाटते की, बांगलादेशमध्ये जे पाकिस्तानी समर्थक तिथे हिंदूंवर अत्याचार करतात, त्यांचे रक्त बांगलादेशचे नसेल, ते पाकिस्तानचेच असणार! असो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा केला, हे ऐकत आलो आहोत. त्यावेळच्या राजकीय परिक्षेपात बांगलादेशला स्वतंत्र ठेवणे योग्यही असेल. पण, त्यावेळी बांगलादेशातील हिंदूंचा मोठा गट फुटून नवा हिंदू बांगलादेश बनवण्याचा विचार करत होता. त्यावेळी त्यांना भारतातून मदत मिळाली असती तर? बांगलादेशला स्वातंत्र्य देऊन काय मिळवले? दुसरा पाकिस्तान? अर्थात, या जर-तरच्या गोष्टींना अर्थ नाही. मात्र, आज बांगलादेशातील पाकिस्तानी कृतघ्न रक्ताला आणि युनूस सरकारलाही जागृत झालेल्या हिंदूंचा नवा भारत त्यांची जागा दाखवेल, हे निश्चित!
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121