काँग्रेसने देशात नैराश्याचे धोरण राबविल्याचा पंतप्रधानांचा घणाघात
07-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली : “समान नागरी कायदा’ (युसीसी) ही संविधाननिर्मात्यांची भावना असून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत दिली. राष्ट्रपती अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्ताव राज्यसभेत चर्चेअंती मंजूर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेस उत्तर दिले.
पंतप्रधान म्हणाले की, “भारतीय संविधान लागू झाल्याचे ७५वे वर्ष देश साजरे करत आहे. संविधानकर्त्यांच्या देशासाठी ज्या भावना होत्या, त्यांची पूर्तता करणे हे देशवासीयांचे कर्तव्य आहे. संविधान कर्त्यांच्या भावनेतूनच प्रेरणा घेऊन केंद्र सरकार आपली वाटचाल करत आहे. त्यामुळे काही लोकांना वाटू शकते की ‘युसीसी’, ‘युसीसी’ अशी चर्चा का होत आहे. मात्र, संविधानसभेतील चर्चा जे ऐकतील, त्यांना लक्षात येईल, तीच भावना प्रत्यक्षात आणली जात आहे. त्या भावना पूर्ण करण्यात काहींना राजकारण आड येत असेल. मात्र, त्या भावनेचे मूर्त रूप देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे,” असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.
“स्वातंत्र्यानंतर केवळ एका कुटुंबास प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे राष्ट्राचा विकास आणि आर्थिक उभारणीकडे दुर्लक्ष केले,” असा आरोप पंतप्रधानांनी केला. ते पुढे म्हणाले, “जगातील अनेक देशांनी विकसनशील ते विकसित असा प्रवास साध्य केला. भारतात मात्र काँग्रेस आणि त्यांच्या व्यवस्थेने नकारात्मकता आणि नैराश्य निर्माण केले होते. लायसन्स राजमुळे तर सर्वसामान्य नागरिकांना लग्नकार्यासाठी साखर खरेदी करण्यासाठीही लायसन्स लागत असे. त्याचप्रमाणे, पायाभूत सुविधांच्या विकासाकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे,” असा टोला पंतप्रधानांनी यावेळी लगावला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काँग्रेसच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर देश सुटकेचा निःश्वास सोडत आहे आणि उंच भरारी घेत आहे. आम्ही ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देत आहोत. उत्पादन वाढवण्यासाठी ‘पीएलआय योजना’ सुरू केली आहे. ‘एफडीआय’शी संबंधित सुधारणा केल्या आहेत. भारत दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. आज भारत त्याच्या संरक्षण उत्पादनासाठी ओळखला जातो. गेल्या दहा वर्षांत निर्यात दहा पट वाढली आहे. भारतात सौरऊर्जा आणि मॉड्यूल उत्पादनातही दहा पट वाढ झाली आहे. भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश आहे,” असे ते म्हणाले.
विकसित भारताच्या संकल्पनेत सर्वांनी सामील व्हावे
“गेल्या दहा वर्षांत खेळण्यांची निर्यात तीन पटीने वाढली आहे. पहिल्यांदाच खादी आणि ग्रामोद्योगांची उलाढाल १.५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. जे लोक विकसित भारताच्या संकल्पापासून स्वतःला दूर ठेवतात, देश त्यांना दूर ठेवेल. सर्वांना सामील व्हावे लागेल. तुम्ही स्वतःला दूर ठेवू शकत नाही. देशातील तरुणांनी या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. जेव्हा देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू लागला आहे, तेव्हा आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. तीव्र विरोध, अत्यंत निराशावाद आणि इतरांची रेषा लहान करणे, हे विकसित भारताच्या संकल्पात अडथळे आहेत,” असेही पंतप्रधानांनी म्हटले.